राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणात मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सुरूवातीला हाती आलेल्या कलानुसार राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपा आघाडीवर आहे. तर, छत्तीसगड आणि तेलंगणात काँग्रेसला बहुमत मिळताना दिसत आहे. तेलंगणा काँग्रेस आणि भारत राष्ट्र समिती ( बीआरएस ) मध्ये प्रमुख लढत होती.
सलग तिसऱ्याला सत्तेवर येण्याचा आशा बाळगणाऱ्या बीआरएसला तेलंगणात मोठा धक्का बसताना दिसत आहे. काँग्रेस ६० तर बीआरएस ३९ जागांवर आघाडीवर आहे. कर्नाटकनंतर दक्षिणेकडील आणखी एका राज्यात काँग्रेस मजबूत होताना दिसत आहे. “तेलंगणात काँग्रेसला ७० हून अधिक जागा मिळतील,” असा विश्वास तेलंगणा काँग्रेसचे निरीक्षक माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
माणिकराव ठाकरे म्हणाले, “मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियंका गांधी यांनी जनतेला काँग्रेसची धोरणं समजून सांगितली. राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा खूप चांगला परिणाम झाला आहे. के. चंद्रशेखर राव ( केसीआर ) तेलंगणात सम्राटासारखे वागले. काँग्रेसने तेलंगणाला राज्याचा दर्जा दिला. तेलंगणाचा विकास व्हावा, अशी प्रत्येकाची इच्छा होती. पण, तो विकास झाला नाही.”
“केसीआर यांनी फार्महाऊसमधून सरकार चालवत फक्त जाहिरातींवर पैसे खर्च केले. कुणालाही रोजगार दिला नाही. पण, काँग्रेसने विचारपूर्वक काम केलं. जनतेनं काँग्रेसवर विश्वास टाकला. त्यामुळे आता तेलंगणात काँग्रेस विजयी होईल,” असेही माणिकराव ठाकरेंनी म्हटलं.