महायुतीचे जागावाटप अद्याप जाहीर झालेले नसताना बुलढाण्यात आज नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेसाठी आज अपक्ष अर्ज भरला. यामुळे शिंदे गटासह युतीच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. अर्ज भरल्यानंतर संजय गायकवाड माध्यमांशी बोलताना म्हणाले, “लोकसभेचा अर्ज भरल्यानंतर छान वाटत आहे. आयुष्यात पहिल्यांदाच लोकसभेचा अर्ज भरला. महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. सहा महिन्यापासून माझे काम पाहता बुलढाणावासियांना मी खासदार व्हावे, असे वाटत होते. त्यामुळं कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून उमेदवारी अर्ज दाखल केला.”

मावळते खासदार प्रतापराव जाधव यांच्या नावाची घोषणा आज होण्याची शक्यता असतानाच आज गायकवाड यांनी तातडीने अर्ज दाखल केला. त्यांनी अपक्ष म्हणून एक अर्ज दाखल केला आहे. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी म्हटले की, मुख्यमंत्री शिंदे हे संजय गायकवाड यांना समज देतील. या विधानावर प्रतिक्रिया देताना गायकवाड म्हणाले की, माझ्या उमेदवारीबाबत मी मुख्यमंत्र्यांना अद्याप काही सांगितलेलं नाही. मुख्यमंत्र्यांचा मी सन्मान करतो, आमचं नातं अतिशय वेगळं आहे. त्यांचा शब्द माझ्यासाठी अंतिम राहिल. पण आमचं बोलणं झालेलं नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय गायकवाड यावेळी म्हणाले, “शिवसेना आणि भाजपात कोणताही बेबनाव नाही. मला अर्ज भरायचाच होता, म्हणून मी भरला. पक्षातून मला कुणीही अर्ज भरण्यासाठी सांगितलेलं नाही. मी कुणाशीही चर्चा केलेली नाही. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तर फक्त हा अर्ज भरला. यातून महायुतीमध्ये कोणताही भूकंप वैगरे काही होणार नाही. मी कोणतंही काम करायचं म्हणून करत नाही. निवडणूक लढवायची असेल तर पूर्ण ताकदिनं लढली पाहीजे.”