Telangana Revanth Reddy Political Journey : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजयाच्या दिशेने वाटचाल करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांना विजयाचे शिल्पकार मानले जात आहे. ३० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडल्यानंतर अनेक एग्झिट पोल्सनी तेलंगणात काँग्रेसची सत्ता येईल, असे भाकीत वर्तवले होते. त्याप्रमाणे आज (३ डिसेंबर) निकालाचे आकडे येताना दिसत आहेत. या दरम्यान रेवंत रेड्डी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मुख्यमंत्री केसीआर यांचे एकेकाळचे सहकारी व त्यांचेच कट्टर विरोधक अशी ओळख असलेल्या रेड्डी यांनी कामरेड्डी मतदारसंघातून थेट मुख्यमंत्री केसीआर यांनाच आव्हान दिले आहे. केसीआर आणि रेड्डी दोघेही दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवीत आहेत.

अभाविपपासून सुरुवात अन् टीडीपीमार्गे काँग्रेसमध्ये

महबूबनगर जिल्ह्यातील कोंडारेड्डी पल्ली येथे जन्म झालेले ५४ वर्षीय रेवंत यांचे पूर्ण नाव अनुमुला रेवंत रेड्डी असे आहे. उस्मानिया विद्यापीठातून पदवी मिळवताना त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) माध्यमातून महाविद्यालयीन राजकारणात पाऊल ठेवले. २००६ साली त्यांनी जिल्हा परिषदेसाठी अपक्ष निवडणूक लढविली आणि ती जिंकलीही. पुढच्याच वर्षी २००७ साली आंध्र प्रदेशच्या विधान परिषदेवर अपक्ष म्हणून निवडून आले.

आंध्र प्रदेश विधान परिषदेत काम करताना तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख व मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्यातील नेतृत्वगुण हेरून त्यांना टीडीपीमध्ये काम करण्याची ऑफर दिली. २००९ साली रेड्डी यांनी टीडीपीच्या तिकिटावर कोंडगल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि काँग्रेसचे मातब्बर आमदार गुरुनाथ रेड्डी यांचा पराभव केला.

टीडीपीशी दुरावा आणि काँग्रेसशी जवळीक

२०१४ साली झालेल्या निवडणुकीतही रेवंत रेड्डी यांनी टीडीपीकडून विजय मिळविला. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी त्यांना विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्त केले होते. मात्र, या काळात त्यांचे चंद्राबाबू नायडू यांच्याशी बिनसले आणि त्यांनी काँग्रेसशी जवळीक साधली. त्यामुळे संतापलेल्या नायडू यांनी २०१७ साली त्यांची विधिमंडळ पक्षनेता पदावरून हकालपट्टी केली. काही दिवसांनंतर रेवंत रेड्डी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढच्याच वर्षी म्हणजे २०१८ साली त्यांनी कोंडगल विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली; मात्र यावेळी त्यांचा पराभव झाला.

२०१९ साली मोदी आणि केसीआर लाटेतही बनले खासदार

काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आणि २०१८ साली पराभव झाल्यानंतरही रेवंत रेड्डी यांनी संघटनेमध्ये पूर्ण ताकदीने काम केले. २०१९ साली काँग्रेसने त्यांना मल्काजगिरी या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यांनी तेलंगणा राष्ट्र समितीच्या (आता भारत राष्ट्र समिती) उमेदवाराचा पराभव करीत पहिल्यांदाच लोकसभेत प्रवेश केला. २०२१ साली काँग्रेसने तुलनेने नवीन असलेल्या रेवंत रेड्डी यांच्या खांद्यावर तेलंगणा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यामुळे काँग्रेसमधील जुन्याजाणत्या नेत्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी होती. मात्र, २०२२ साली राहुला गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे योग्यरीत्या नियोजन करून रेवंत रेड्डी यांनी सर्वांना सोबत घेऊन कामाला सुरुवात केली.

‘कॅश फॉर व्होट’ प्रकरणात तुरुंग वारी

जवळपास दोन दशकांपासून राजकारणात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रेवंत रेड्डी यांच्यासाठी २०१५ चा काळ अतिशय कठीण होता. ३१ मे २०१५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली होती. आंध्र प्रदेशच्या विधान परिषद निवडणुकीत नामनिर्देशित आमदार एल्विस स्टीफेन्सन यांना लाच दिल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवला गेला. तेलगू देसम पक्षाच्या उमेदवाराला मतदान करावे, यासाठी रेड्डी यांनी एस्विस यांना पाच कोटींची लाच देण्याचे मंजूर केले होते. द इंडियन एक्स्प्रेसच्या विश्लेषणानुसार ३१ मे २०१५ मध्ये रेड्डी यांनी ५० लाख रुपये आगाऊ देण्याचे आश्वासन दिले होते, असा आरोप केला गेला.

एल्विस यांनी लाच प्रकरणात आधीच तक्रार दाखल केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी एल्विस यांच्या मित्राच्या घरी (जिथे व्यवहार होणार होता) अनेक स्पाय कॅमेरे लावून ठेवले. ३१ मे रोजी रेवंत रेड्डी आणि त्यांचे दोन साथीदार तिथे आले असताना त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी रेवंत रेड्डी तब्बल दोन महिने तुरुंगात होते. या प्रकरणात पुढे काही पुरावे न मिळाल्यामुळे उच्च न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला.

मात्र, यावेळी रेवंत रेड्डी यांचे कुटुंब मोठ्या संकटात सापडले होते. ११ जून २०१५ रोजी रेड्डी यांच्या मुलीचे लग्न होते. त्याआधीच ३१ मे रोजी अटक झाल्यानंतर कुटुंबावर मोठे संकट कोसळले, लग्नाची तयारी थबकली. लग्नात उपस्थित राहता यावे यासाठी उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. तेव्हा कुठे त्यांना काही तासांसाठी लग्नाला उपस्थित राहण्याची परवागनी मिळाली. या काळात रेड्डी यांच्या कुटुंबाने मोठ्या तणावात्मक परिस्थितीचा सामना केला.

काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाचे दावेदार?

रेवंत रेड्डी यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी काँग्रेसला पुढे आणण्यात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. मुख्यमंत्री केसीआर आणि त्यांचे पुत्र केटी रामाराव ऊर्फ केटीआर यांच्यावर जोरदार हल्ला केला. केसीआर यांना आव्हान देण्यासाठी त्यांनी कामरेड्डी या मतदारसंघातून केसीआर यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच आपला पारंपरिक कोडंगल मतदारसंघातून निवडणूक अर्ज दाखल केला. दोन्हीकडे ते आघाडीवर आहेत.

काँग्रेसला जर बहुमत मिळाले, तर रेवंत रेड्डी हे मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती असतील, अशी अटकळ अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनीही रेवंत रेड्डी यांच्या नावाला पसंती दिली आहे.