लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होण्यास अवघे काही तास बाकी आहेत. निवडणूक तोंडावर आली तर महायुतीतल्या पक्षांमधील जागावाटप पूर्ण झालेलं नाही. महायुतीतल्या पक्षांमध्ये अनेक जागांवरून निर्माण झालेला तिढा अद्याप सुटलेला नाही. दरम्यान, महायुतीतल्या नेत्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा सोडवण्यात यश मिळवलं आहे. शिवसेना-भाजपाच्या युतीत ही जागा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे आहे. मात्र यंदा महायुतीत ही जागा भाजपाने आपल्याकडे घेतली आहे. भारतीय जनता पार्टीने केंद्रीय केंद्रीय लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने या जागेवर माघार घेतली आहे.

लोकसभेच्या मागील दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेचे विनायक राऊत रत्नागिरी सिंधुदुर्गमधून निवडून आले होते. दोन वर्षांपूर्वी शिवसेना पक्ष फुटल्यानंतर पक्षाचे १३ खासदार एकनाथ शिंदेंबरोबर गेले. मात्र रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्यासह पाच खासदारांनी उद्धव ठाकरेंबरोबर थांबण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेकडे या मतदारसंघात तगडा उमेदवार नाही असं बोललं जात होतं. मात्र रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने यंदादेखील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने या जागेवर दावा केला. मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. सामंत बंधू गेल्या काही महिन्यांपासून या मतदारसंघात मोर्चेबांधणी करत होते. मात्र शिंदे गटाने आता माघार घेतली आहे. भाजपाने या मतदारसंघातून नारायण राणे यांना उमेदवारी दिली आहे.

ramdas athawale marathi news
Video: “गावागावात विचारत आहेत म्हातारी, शरद पवार…”, रामदास आठवलेंची तुफान टोलेबाजी; फडणवीसांनी लावला डोक्याला हात!
What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”
EVM
“निवडणूक प्रक्रियेचं पावित्र्य राखा”, EVM वरून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारलं!
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”

महायुतीत रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजपाला सुटल्यानंतर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, त्यांचे बंधू किरण सामंत आणि रत्नागिरीतील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उदय सामंत म्हणाले, आम्ही काही काळ थांबण्याचा निर्णय घेतला असला तरी, उद्या (१९ एप्रिल) नारायण राणे यांचा लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरताना आम्ही पूर्ण ताकदीने नारायण राणेंबरोबर उभे राहू. आमचा मतदारसंघ आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्हा नारायण राणेंबरोबर, महायुतीबरोबर असेल. हे करत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द खाली पडणार नाही याची काळजी घेतली जाईल. आम्ही हा निर्णय (नारायण राणेंना पाठिंबा देण्याचा) घेतला म्हणजे आम्ही राजकारणातून बाहेर पडलो नाही, आमचं कुटुंब थांबलेलं नाही. आम्ही काही काळ थांबायचा निर्णय घेतला आहे. तसेच नारायण राणेंना समर्थन द्यायचं ठरवलं आहे.

हे ही वाचा >> Sangli Lok Sabha : “…तर आम्ही विशाल पाटलांवर कारवाई करू”, नाना पटोलेंचा इशारा

उदय सामंत म्हणाले, सध्या माघार घेताना किंवा नारायण राणेंना समर्थन देताना आमच्यात (महायुतीत) काय चर्चा झाली आहे ही गोष्ट आम्ही माध्यमांसमोर जाहीर करू शकत नाही. किरण सामंत यांचा महायुतीत सन्मान होईल, असा शब्द अमित शाह, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला दिला आहे. प्रसारमाध्यमं आणि स्थानिक रहिवाशांच्या मनात संभ्रम होता की, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा उमेदवार कोण असेल? याबाबत आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही सध्या माघार घेतली असून नारायण राणे आमचे लोकसभेचे उमेदवार असतील. आम्ही पूर्ण ताकदीने नारायण राणेंचा प्रचार करू.