पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे निवडणूक प्रचार सभेला संबोधित केले. यादरम्यान स्टेजवर एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. उन्नावमध्ये पंतप्रधान मोदींना अभिवादन करण्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अवधेश कटियार स्टेजवर पोहोचले तेव्हा यांनी त्यांच्या पायांना स्पर्श केले. यानंतर पंतप्रधान मोदींनी दिलेली प्रतिक्रिया हा चर्चेचा विषय ठरला आहे.

पंतप्रधान मोदी रॅलीमध्ये पोहोचताच भाजपा उत्तर प्रदेशचे प्रमुख स्वतंत्र देव सिंह यांनी भाजपाचे उन्नाव जिल्हा अध्यक्ष अवधेश कटियार यांना पंतप्रधानांना रामाची मूर्ती भेट देण्यास सांगितले. मूर्ती भेट दिल्यानंतर कटियार यांनी नतमस्तक होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पायांना स्पर्श केला.

पंतप्रधानांनी कटियार यांना ताबडतोब थांबण्यास सांगितले आणि भाजपच्या उन्नाव जिल्हाध्यक्षांना माझ्या पायाला हात लावू नका, असे सांगितले. त्यानंतर मोदींनी खाली वाकून अवधेश कटियार यांच्या पायाला स्पर्श केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अवधेश कटियार यांची गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भाजपाने उन्नाव जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. यापूर्वी ते उन्नावमध्ये भाजपाचे जिल्हा सरचिटणीस होते.

उन्नाव जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत जेथे उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात २३ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. उन्नावमध्ये रविवारी एका निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला.

आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी हरदोईच्या लोकांना सांगितले की, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने एक-दोन नाही तर १४ दहशतवादी हल्ल्यांचे खटले मागे घेण्याचे आदेश दिले होते. यावेळी मोदींनी जनतेला दहशतवाद्यांना वाचवणे ठीक आहे का? असा सवालही केला.  दहशतवादी बॉम्बस्फोट करत होते आणि समाजवादी पक्ष या आरोपींवर कारवाई होऊ देत नव्हता. गुन्हे मागे घेऊन दहशतवाद्यांना रिटर्न गिफ्ट दिले जात होते. असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या नेत्यांची वृत्ती आणखी धोकादायक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. “हे लोक ओसामासारख्या दहशतवाद्याला जी म्हणतात. बाटला हाऊसमधील दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यानंतर अश्रू ढाळले. कधी भारतीय लष्कराचा अपमान तर कधी पोलिसांचा अपमान. आमच्या सरकारने नॅशनल वॉर मेमोरियल आणि नॅशनल पोलीस मेमोरियल बांधले आहे. आम्ही प्रत्येक हुतात्म्याचा आदर करतो,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.