scorecardresearch

दिल्लीत रंगलं ‘हेलिकॉप्टर’ नाट्य; अखिलेश यादव म्हणतात, “मला अडवून ठेवलं”!

सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांचं हेलिकॉप्टर दिल्लीत रोखून धरलं? नेमकं दिल्लीत काय घडलं?

akhilesh yadav helicopter stranded
अखिलेश यादव यांचं हेलिकॉप्टर दिल्लीत रोखून धरलं?

देशभरात सध्या ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची जोरदार चर्चा सुरू आहे. या निवडणुकांमध्ये देशभरातलं राजकीय वातावारण चांगलंच तापलं आहे. या पाच राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, पंजाबसारखी मोठी राज्य देखील असल्यामुळे भाजपा आणि काँग्रेससह सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी चर्चेत येऊ लागल्या आहेत. पंजाबमध्ये खुद्द पंतप्रधानांच्या ताफ्याला १५ ते २० मिनिटे अडकून राहावं लागल्याच्या प्रकारावरून बरंच राजकीय वादळ घुमल्यानंतर आता अखिलेश यादव यांनी दिल्लीत घडलेल्या हेलिकॉप्टर नाट्यावरून राजकीय आरोप करायला सुरुवात केली आहे.

अखिलेश यादव यांचे दोन ट्वीट!

अखिलेश यादव यांनी आज दुपारी अडीचच्या सुमारास काही अंतराने दोन ट्वीट केले. यात पहिलं ट्वीट केलं ते त्यांनी दिल्लीमधील हेलिकॉप्टर बेसवरून. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव हे आज दिल्लीहून उत्तर प्रदेशमधील मुझफ्फर नगरकडे येत असताना हा प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये अखिलेश यादव यांनी आपल्याला उड्डाण करू दिलं जात नसल्याचा दावा केला आहे.

२.३४ मिनिटांनी अखिलेश यादव यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “माझ्या हेलिकॉप्टरला अजूनही कोणतंही कारण न देता दिल्लीमध्ये अडवून ठेवलं गेलं आहे. मला मुझफ्फरनगरला जाऊ दिलं जात नाहीये. पण भाजपाच्या एका वरीष्ठ नेत्यांनी मात्र आत्ताच इथून उड्डाण केलं आहे. पराभूत होत असलेल्या भाजपाचा हा एक हताश कट आहे. जनतेला सगळं समजतंय”, असं अखिलेश यादव यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी हेलिकॉप्टरसमोर उभा असलेला स्वत:चा एक फोटो देखील शेअर केला आहे.

दरम्यान, या ट्वीटची सोशल मीडियावर चर्चा सुरू असतानाच अखिले यादव यांनी ३ वाजून १० मिनिटांना दुसरं ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये हेलिकॉप्टरच्या दिशेने जात असल्याचा दुसरा फोटो त्यांनी शेअर केला आहे. “सत्तेचा दुरुपयोग हारत असलेल्या लोकांची निशाणी आहे. समाजवादी संघर्षाच्या इतिहासात हा दिवस देखील नोंदवला जाईल. आम्ही विजयाचं ऐतिहासिक उड्डाण घ्यायला निघालो आहोत”, असं या ट्वीटमध्ये अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.

अखिलेश यादव यांच्या या आरोपांवर अद्याप भाजपाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये भाजपा, काँग्रेस, समाजवादी पक्ष यांच्यामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना दिसू लागले आहेत. येत्या १० फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे. ७ मार्च रोजी शेवटच्या अर्थात सातव्या टप्प्यासाठी राज्यात मतदान होणार असून १० मार्च रोजी इतर चारही राज्यांसोबत उत्तर प्रदेशमध्ये देखील मतमोजणी होणार आहे.

मराठीतील सर्व उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ ( Uttar-pradesh-assembly-elections-2022 ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Akhilesh yadav helicopter stranded in delhi tweets targets bjp ahead of up elections pmw

ताज्या बातम्या