उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीच्या प्रचाराने चांगलाच रंग भरला आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, बसपच्या प्रमुख मायावती हे विरोधकांवर टीका करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांची माहिती मतदारांना देताना दिसत आहेत. मणिपुरी येथे झालेल्या प्रचारसभेत त्यांनी समाजवादी सरकारने मागील पाच वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती दिली व समाजवादी पक्षातील मतभेदाबाबतही आपले मत व्यक्त केले. राजकारणातील मार्ग सरळ कधीच नसतो. तो नेहमी नागमोडी असतो. चालता-चालता तुम्ही कधी कोणत्या खड्ड्यात पडाल सांगता येत नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. काही लोकांनी माझी खूप परीक्षा घेतली. जर मी परिस्थितीनुसार निर्णय घेतले नसते तर आमचे पुढे काय झाले असते हे कळलेच नसते, असे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या वेळी त्यांनी पक्ष कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. जर माझ्यासोबत फक्त १० आमदार असले असते आणि संघटनेचे सर्वसाधारण लोक असले असते तर विचार करा आमची सध्या काय परिस्थिती करण्यात आली असती, असे सांगत मुलायमसिंह यादव यांचेही त्यांनी कौतुक केले.
मुलायमसिंग यादव यांचाच हा पक्ष असून आमच्या मनात आणि हृदयात त्यांचे स्थान कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी त्यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती दिली. ते म्हणाले, अमेरिकेने रस्ते बनवले. रस्त्यांनी अमेरिकेला बनवले. समाजवादी पक्षाने बनवलेले रस्ते किमान २०० ते ४०० वर्षांपर्यंत येथील लोक लक्षात ठेवतील, असे मत व्यक्त केले.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या सभेत त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले होते. उत्तरप्रदेशमध्ये तिस-या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर भाजप नेत्यांची परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. बहुतांशी नेत्यांना त्यांचा रक्तदाब तपासून घ्यावा लागेल असे त्यांनी म्हटले होते. भाजप नेते कायदा आणि सुव्यवस्थेवर टीका करतात. पण मग राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी केंद्र सरकारने काय मदत केली हे मतदारांनीच त्यांना विचारावे असे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व उत्तर प्रदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up assembly election 2017 samajvadi party cm akhilesh yadav bjp
First published on: 16-02-2017 at 14:13 IST