आज एक्जिट पोलचे निकाल आले. उत्तर प्रदेशात कुणालाच स्पष्ट बहुमत मिळणार नाही अशी स्थिती दिसत आहे. जर अशी स्थिती उद्भवली की कुणालाच स्पष्ट बहुमत नाही तर तुम्ही बहुजन समाज पक्षासोबत युती करणार का असा प्रश्न उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना विचारण्यात आला. जर अशी स्थिती उद्भवली की कुणालाच स्पष्ट बहुमत नाही तर त्यावेळेस राज्यात राष्ट्रपती शासन लागू केले जाईल. हे शासन भारतीय जनता पक्ष रिमोट कंट्रोलद्वारे चालवेल अशी भीती आहे. त्यामुळे या परिस्थितीपेक्षा मायावती यांच्याशी हातमिळवणी केली तर काय वाईट आहे असा सवाल अखिलेश यादव यांनी केला.

मायावती आणि माझे नाते हे विशेष आहे. त्यामुळे लोकांना असे वाटू शकते की मी त्यांच्यासोबत युती करणार. परंतु आता आमचे सरकार आम्ही बहुमताने स्थापन करू असे ते म्हणाले. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे सरकार आम्ही स्थापन करू असे ते म्हणाले. त्यामुळे सध्या आपण युतीबाबत विचार केला नसल्याचे त्यांनी सांगितले. मायावती अखिलेश यांना बबुआ म्हणतात. हा संदर्भ घेऊन ते बोलत होते.

या पार्श्वभूमीवर अखिलेश आणि मायावती यांच्यामध्ये युती होणे स्वाभाविक आहे असे चित्र आहे. भारतीय जनता पक्षाला १८५ जागा भेटतील असा अंदाज आहे. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्ष आणि काँग्रेस आघाडीला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळतील. आघाडीला १२० जागाच जिंकता येतील, असा कयास आहे. तर मायावती यांच्या बसपला ९० जागांवर समाधान मानावे लागेल, असा अंदाज आहे.

यामुळे उत्तर प्रदेशात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल असे चित्र निर्माण झाले आहे. जर अशी परिस्थिती आलीच तर समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि बसप एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाला निष्प्रभ करतील अशी शक्यता आहे. प्रचाराच्या काळात बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाने एकमेकांवर घणाघाती टीका केली आहे. समाजवादीच्या काळात गुंडाराज वाढला आहे असे देखील मायावतींनी म्हटले होते. तर, अनेक सुविधांचा पुरवठा करण्यास अखिलेश यादव हे अपुरे पडले असे त्या म्हणाल्या होत्या.