उत्तरप्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ताधारी समाजवादी पक्षावर हल्लाबोल केला. समाजवादी आणि बसपच्या सरकारने राम आणि कृष्णाच्या भूमीला उद्ध्वस्त केले. यामुळे महिलांना दिवसाही घराबाहेर निघणे कठीण झाले. पण सत्तेवर येताच सहा महिन्यांमध्ये गुंडांना तुरुंगात पाठवू असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. तुम्ही कितीही आघाड्या करा पण तुमचे पाप धूतले जाणार नाही असा टोलाही त्यांनी सपा आणि काँग्रेसला लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खेरी या भागात प्रचारसभा घेतली. या भागात १५ फेब्रुवारीरोजी मतदान होणार असून सोमवारी या भागात प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. नरेंद्र मोदींनी प्रचारसभेत सत्ताधारी समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षावर टीका केली. २०२२ मध्ये स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष होती. या काळात आपण देशाला विकासाच्या नव्या उंचीवर नेले पाहिजे असे मोदी म्हणालेत. उत्तरप्रदेशने अनेक दशकांपासून समाजवादी आणि बसपचे सरकार बघितले. पण त्यांचे सरकार राज्याचा विकास करु शकले नाही अशी टीका त्यांनी केली. सपा, बसप प्रत्येक स्तरावर अपयशी ठरले असून आता त्यांना पुन्हा परीक्षा देण्याचा हक्कही नाही असे त्यांनी सांगितले. सत्तेसाठी समाजवादीने राममनोहर लोहिया यांच्या विचारधारेला तडा दिला. खुर्चीच्या मोहापायी समाजवादीने जयप्रकाश आणि लोहिया यांचा अपमान केला असा आरोप त्यांनी सभेत केला. उत्तरप्रदेशमधील पहिल्या टप्प्यातील मतदानावरुन जनतेचा कल स्पष्ट होतो. यातून सपा आणि बसपाला चोख प्रत्युत्तर मिळाले आहे. तुम्ही कितीही आघाड्या करा पण तुमचे पाप धूतले जाणार नाही असा टोला सपा- काँग्रेस आघाडीला लगावला.
अखिलेश यांच्या राज्यात दररोज बलात्काराच्या घटना होतात, कारण तुरुंगात बंद असलेले गुंड तुरुंगामधूनच आपली टोळी चालवतात असा गंभीर आरोप त्यांनी केला. उत्तरप्रदेशमधील महिलांना सुरक्षा देण्यासाठी त्यांचा एक भाऊ दिल्लीत बसला आहे. तो तुमच्या सुरक्षेसाठी तयार आहे असे आश्वासन देत त्यांनी मतदारांना भावनिक सादही घातली. उत्तरप्रदेशमध्ये सत्तेवर येताच शेतक-यांचे कर्जमाफ केले जाईल असे महत्त्वपूर्ण आश्वासन त्यांनी दिले आहे.