उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जोरदार राजकीय घडामोडी सुरू आहेत. शिवाय, आमदारांच्या फोडाफोडीला वेग आल्याचे दिसून येत आहे. यामध्ये सत्ताधारी भाजपाला एका पाठोपाठ एक धक्के बसणे सुरूच आहे. कारण, योगी सरकारमधील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ आता काही आमदार देखील भाजपाला सोडचिठ्ठी देताना दिसून येत आहे. शिवाय, आगामी काळात आणखी काही नेते व आमदार भाजपाच्या सदस्यत्वाचा त्याग करतील असं देखील बोललं जात आहे. त्यामुळे निवडणूक तोंडावर आलेली असतान पक्षाला लागलेली गळती थांबवणे हे देखील भाजपासमोर एक मोठं आव्हान निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

उत्तर प्रदेशमधील शिकोहाबाद (फिरोजाबाद) चे भाजपा आमदार मुकेश वर्मा यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला, “स्वामी प्रसाद मौर्य हे आमचे नेते आहेत. ते जो निर्णय घेतील आम्ही त्याला पाठिंबा देऊ. येत्या काही दिवसांत इतर अनेक नेते आमच्यासोबत येतील,” असे ते म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओबीसीतील कुशवाहा समाजाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह त्यांचे समर्थक आमदार रोशनलाल वर्मा, ब्रिजेश प्रजापती आणि भगवती सागर आणि विनय शाक्य हे समाजवादी पक्षात अधिकृतपणे प्रवेश करतील. दारासिंह चौहान यांनीही ‘सप’मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. चौहान तसेच पक्ष सोडण्याच्या तयारीत असलेल्या अन्य आमदारांशी भाजपच्या वतीने संपर्क साधण्यात आला होता. मात्र, चौहान यांनी भाजप नेतृत्वाची विनंती अव्हेरून मंत्रिपदाचा राजीनामा दिला. दोन दिवसांत दोन मंत्री आणि चार आमदारांनी भाजपचा राजीनामा दिला आह़े दुसरीकडे, समाजवादी पक्षाचे हरिओम यादव तसेच काँग्रेसचे नरेश सैनी यांनी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला. याखेरीज समाजवादी पक्षाच्या दोन माजी आमदारांनीही भाजपामध्ये प्रवेश केला़