Uttarakhand, Goa, Manipur, Punjab Assembly Election Live Updates: पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे. आज दुपारपर्यंत सर्वच राज्यातील निकालांचा कल स्पष्ट होईल. त्यामुळे कोणता पक्ष कोणत्या राज्यात सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरतो हे पाहणं महत्वाचं ठरेल. पंजाबमध्ये गेले काही महिने मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा, नंतर चरणजित सिंग चन्नी मुख्यमंत्री झाले आणि अमरिंदर सिंग यांनी वेगळा पक्ष काढत भाजपासोबत हातमिळवणी केली. तर, आम आदमी पक्षाने पंजाबमधील निडवणूक चुरशीची केली होती. त्यामुळे आपला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, गोवा, उत्तराखंड व मणिपूर या तीनही राज्यांमध्ये काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरण्यासाठी चढाओढ असेल. एग्झिट पोलमध्ये उत्तराखंड व गोवा या दोन राज्यांमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याचा अंदाज व्यक्त केलेला नाही.