Rohit Pawar vs Ajit Pawar: महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघांसह आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात देशात सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. देशातील १० राज्य व एका केंद्रशासित प्रदेशात ९३ जागांसाठी आज मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांपर्यंत अनेक मोठ्या नेत्यांनी सुद्धा आज मतदानाचा हक्क बजावला आहे. काटेवाडी येथे मतदान केल्यानंतर आज पैसे वाटल्याच्या आरोपावरून रोहित पवार यांच्यावर अजित पवारांनी जोरदार टीका केली होती. ज्याला प्रत्युत्तर देत रोहित पवारांनी पुन्हा एका पोस्टमधून काकांवर टीकेची झोड घेतली आहे. तुम्ही राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणून मुख्यमंत्री झाला असतात असं लोक म्हणतायत असं लिहीत रोहित पवार नेमकं काय म्हणालेत हे पाहूया..

अजित पवार काय म्हणाले?

हे काम निवडणूक आयोगाचे काम आहे. आजपर्यंत मी सातवेळा विधानसभा आणि एक लोकसभा लढवली आहे. त्यामुळे असे प्रकार करत नाही. कारण नसताना विरोधकांचे काही बगलबच्चे अशा प्रकारचे आरोप करत होते. ते आमच्यावरही आरोप करत आहेत. आम्हीही त्यांच्यावर आरोप करू शकतो. त्यांनी चुकीच्या पद्धतीने निवडणुकीची हाताळणी केली. ते काहीही आऱोप करत आहेत. तुम्ही स्वत: ती बँक उघडी पाहिली का? जो समोरचा आरोप करतो, त्याच्यावर काहीतरी परिणाम झालेला आहे. त्यामुळे ते आरोप करत असावेत. माझ्या दृष्टीने त्या आरोपाला काहीही महत्व नाही. त्या प्रश्नाला उत्तर देण्याची गरजही मला वाटत नाही”, असे प्रत्युत्तर अजित पवार यांनी रोहित पवारांना दिले.

रोहित पवारांचं प्रत्युत्तर

अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना पुन्हा आता रोहित पवारांनी पोस्ट लिहिली आहे. रोहित पवार म्हणाले की, “अजितदादा माझ्यावर परिणाम झाल्याचा आरोप तुम्ही केला असला तरी काही फरक पडत नाही.पण परिणाम नेमका कुणावर झाला आणि पराभवाच्या भितीने कुणाच्या पायाखालची जमीन सरकली, हे संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय. आणि म्हणूनच बारामती मतदारसंघात पाण्यासारखा पैसा वाहतोय. तुम्ही सात वेळा निवडणूक लढवली पण असले प्रकार केले नसल्याचे सांगता. पण अजितदादा त्यावेळी आजच्या इतकं ‘लक्ष्मी दर्शन’ घडवलं असतं तर राज्यात राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणून तुम्ही आज मुख्यमंत्री असता, असं लोकं म्हणतायेत.”

हे ही वाचा<< Video: उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितलं मोदींसाठी मत? म्हणाले, “काँग्रेसकडे एक तरी चेहरा..”, ‘ही’ सभा कधी झाली?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आज महाराष्ट्रातील बहुप्रतीक्षित अशा नणंद विरुद्ध भावजय लढतीचा सुद्धा महत्त्वाचा दिवस आहे. शरद पवार विरुद्ध अजित पवार अशा लढतीच्या प्रतिनिधी असणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार व विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांची आज परीक्षा असणार आहे. बारामतीकर नेमकं कुणाच्या बाजूने कौल देतात हे पाहण्यासाठी आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस म्हणजेच ४ जूनची वाट पाहावी लागणार आहे.