– डॉ. भरेश देढिया

सध्या विविध प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. मेडिकल-ग्रेड मास्क यामध्ये डिस्पोजेबल सर्जिकल फेस मास्क व N95 रेस्पिरेटर यांचा समावेश होतो. मोठे कण व रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स (जे खोकल्यावर किंवा शिंकल्यावर हवेत सोडले जातात) तुमच्या तोंडामध्ये येणे किंवा तोंडातून बाहेर जाणे अडवण्यासाठी सर्जिकल फेस मास्क घातले जातात. घट्ट असणारे N95 रेस्पिरेटर मास्क धूर, लहान कण व हवेतील विषाणू रोखण्यासाठी वापरले जातात. आतमध्ये येऊ न दिलेले विषाणू या मास्कच्या मागील बाजूला असू शकतात, आणि म्हणूनच ते आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.

एकदा वापरलेले सर्जिकल मास्क पुन्हा वापरू नयेत आणि ते ओलसर झाले किंवा त्यांचा वापर संपला की लगेचच ते सुरक्षितपणे टाकून द्यावेत. मास्क मागील बाजूने काढावेत (मास्कच्या पुढील बाजूला हात लावू नये) आणि बंद असलेल्या कचऱ्याच्या डब्यात लगेचच टाकून द्यावेत. अल्कोहोल असणाऱ्या सॅनिटायझरने किंवा साबण व पाणी वापरून हात स्वच्छ धुवावेत.

एकदा वापरलेले N95 शक्यतो पुन्हा वापरू नयेत आणि 8 तास वापरल्यावर टाकून द्यावेत. परंतु, त्यांची कमतरता असताना त्यांचा पुनर्वापर करण्याचा नियम आहे आणि तो वापरता येऊ शकतो. सर्जिकल मास्कप्रमाणेच N95 मास्कही काढायचे असतात आणि त्यानंतर पिवळ्या, सील केलेल्या पिशवीमध्ये टाकायचे असतात व त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी रुग्णालयाकडे द्यायचे असतात.

नॉन मेडिकल फेस कव्हरिंग्स – यामध्ये तुम्हाला मोठे कण व रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स यांच्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी, पुन्हा वापर करता येणारे कापडी मास्क, स्कार्फ यांचा समावेश आहे, आणि त्यांचा वापर सर्जिकल मास्कप्रमाणेच केला जातो. परंतु, संरक्षणासाठी वापरलेले असे साहित्य एकदा वापरून झाल्यावर स्वच्छ करावे आणि शक्यतो वैद्यकीय ठिकाणी वापरू नये. मास्कबरोबरच हातांची योग्य स्वच्छता राखणे आणि सामाजिक अंतर पाळणेही गरजेचे आहे.

नॉन मेडिकल फेस कव्हरिंगचा पुन्हा वापर करता येऊ शकतो. ही साधने मागील बाजूने काढावीत व त्यांच्या पुढील बाजूला हात लावू नये. या साधनांमध्ये कोणतेही विषाणू असतील तर ते मारण्यासाठी ही साधने 60 अंश इतक्या तापमानाला धुणे किंवा उकळत्या पाण्यामध्ये 10 मिनिटे ठेवणे गरजेचे आहे. त्यानंतर ती सूर्यप्रकाशामध्ये वाळत ठेवावीत.

(लेखक क्रिटिकल केअर विभाग प्रमुख, हिंदुजा हॉस्पिटल, खार आहेत.)