28 January 2021

News Flash

समजून घ्या, सहजपणे… आर्सेनिकम अल्बम कितपत उपयोगी

या गोळ्यांचा वापर करण्यास मुभा दिली असली तरी ते प्रतिबंधात्मक औषध असल्याची मान्यता नाही

– राजेंद्र येवलेकर

कोविड-१९ प्रतिबंधासाठी आयुर्वेद व होमिओपॅथीमधील काही औषधांचा उपयोग होऊ शकतो अशी चर्चा आहे त्यातच आर्सेनिकम अल्बम ३० या औषधाचा समावेश आहे. अनेक राज्यांनी प्रतिबंधात्मक औषध म्हणून त्याला मान्यता दिली आहे. अर्थात त्यासाठी आय़ुष मंत्रालयानेही तशी शिफारस केली होती. पण या औषधाच्या उपयोगाबाबत कुठलाही वैज्ञानिक पुरावा नसल्याचे म्हटले जाते. काही होमिओपॅथिक तज्ज्ञांनीही या औषधाचा करोनावर काही उपयोग नसल्याचे म्हटले आहे. राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ या राज्यांनी या औषधाची शिफारस केली आहे. महाराष्ट्र सरकारने याबाबत अजून निर्णय घेतला नसला तरी प्रशासकीय अधिकारी या गोळ्या जास्त जोखमीच्या प्रदेशात वाटत आहेत. हरयानातील तुरुंग विभाग व महाराष्ट्र पोलिस यांना या गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी लोकांनी हे औषध घेण्यासाठी गर्दी केली. औषध विक्रेत्यांनही त्याचा साठा करून ठेवला आहे.

औषध नेमके काय आहे?

आर्सेनिकम अल्बम हे औषध आर्सेनिक उर्ध्वपातित पाण्यात उकळून तयार केले जाते. तीन दिवस ही प्रक्रिया सारखी केल्यानंतर ते तयार होते. खरे तर आर्सेनिक असलेले पाणी विषारी मानले जाते त्यामुळे त्वचेचा कर्करोग होतो, न्यूमोनिया व हृदयाचे आजारही जडतात. पण होमिओपॅथीतील या औषधात ते एक टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात असते, असे मुंबईतील प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी क्लिनिकचे डॉ. अमरीश विजयकर यांनी सांगितले. आर्सेनिकम अल्बम शरीरात जर सूज किंवा वेदना असतील तर वापरले जाते. त्यातून अतिसार, कफ, सर्दी बरी होते या एका बाटलीची किंमत २०-३० रुपये असते. प्रा. जी. विठोलकस यांनी इंटरनॅशनल अकडमी ऑफ क्लासिकल होमिओपॅथी या नियतकालिकात म्हटले आहे की, आर्सेनिकम अल्बमचा वापर हा नैराश्य, अस्वस्थता, सर्दी, वेदना दूर करण्यासाठी होतो. भुकटीच्या स्वरूपात ते असते.

कोविड-१९ उपचारांशी संबंध काय?

२८ जानेवारीला केंद्रीय होमिओपॅथी संशोधन मंडळाची बैठक झाली त्यात आर्सेनिकम अल्बम हे औषध करोना 19 प्रतिबंधासाठी उपयुक्त असल्याचे सांगण्यात आले. आयुष मंत्रालयाने त्यानंतर जारी केलेल्या सूचनेत म्हटले होते की, हे औषध महिन्यातून तीन दिवस रिकाम्या पोटी घ्यावे. साथ चालू असेपर्यंत दर महिन्याला असे करावे. आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा यांनी राज्यांना पत्र पाठवून या औषधाचा उपयोग करण्याची सूचना सहा मार्चला केली होती. मंत्रालयाने जारी केलेल्या आणखी एका पत्रात ब्रायोनिया अल्बास ऱ्हस टॉक्सिको डेनड्रॉन, बेलाडोना, जेल्मेसियम या औषधांचाही समावेश आहे. कॉलरा, स्पॅनिश फ्लू, पिवळा ताप, स्कार्लेट ताप, विषमज्वरातही होमिओपॅथीचा वापर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. २०१४ च्या इबोला साथीतही जागतिक आरोग्य संघटनेने अशी सिद्ध न झालेली औषधे देण्यात काही गैर नाही असे म्हटले होते.

यात काही विज्ञान आहे का?

भारतीय वैद्यक संशोधन परिषदेचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांच्या मते या औषधाचा वापर करण्याच्या सूचना भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने दिलेल्या नाहीत. सिद्ध न झालेल्या आर्सेनिकम अल्बम या औषधाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने कुठलीही शिफारस केलेली नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या वैज्ञानिक, डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनीही या औषधाची शिफारस करण्यात आली नसल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. अर्चना पाटील यांनी म्हटले आहे की, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी क जीवनसत्व घेतात तसे या गोळ्यांचा वापर करण्यास मुभा दिली असली तरी ते प्रतिबंधात्मक औषध असल्याचे म्हटलेले नाही. ते प्रतिबंधात्मक औषध असल्याचे पुरावे नाहीत.

चाचण्यांची गरज आहे का?

आर्सेनिकम अल्बम ३० या औषधाच्या कुठल्याही वैद्यकीय चाचण्या करण्यात आलेल्या नाहीततरी त्याची मागणी वाढत आहे. डॉ. विजयकर यांनी म्हटले आहे की, त्यांच्या संघटनेने आयुष मंत्रालयाला या औषधाच्या चाचण्या करण्याची विनंती केली आहे. या औषधाची शिफारस करण्यापूर्वी चाचण्या करायला हव्या होत्या. आयुष मंत्रालयाने श्वसन रोग व इन्फ्लुएंझा या रोगांवरील पारंपरिक होमिओपॅथिक औषधे कोविड-१९साठी प्रतिबंधात्मक म्हणून वापरण्याची शिफारस केली. होमिओपॅथिक औषधांना प्रत्येक व्यक्तीचा प्रतिसाद वेगळा असतो. त्यामुळे कुठले एक औषध साधारण वापरासाठी प्रतिबंधात्मक म्हणता येत नाही. तो उपचारातील एक भाग असू शकतो असे मत होमिओपॅथी डॉक्टर बाहुबली शहा यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 7:15 am

Web Title: explained usefulness of arsenic album
Next Stories
1 समजून घ्या सहजपणे : चक्रीवादळाची निर्मिती कशी होते?
2 समजून घ्या सहजपणे : करोना आहे का नाही? हे ओळखण्यासाठी कुत्र्यांना देता येते का ट्रेनिंग?
3 समजून घ्या सहजपणे: भारत आणि नेपाळमधील कालापानी वाद नेमका आहे तरी काय?
Just Now!
X