अभिनेता ह्रतिक रोशन याने कंगनाविरोधात २०१६ मध्ये दाखल केलेली तक्रार मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक (सीआययूकडे) वर्ग केली आहे. ह्रतिक रोशनचे वकील महेश जेठमलानी यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तपासात कोणतीही प्रगती होत नसल्याची तक्रार केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

ह्रतिकच्या तक्रारीचा कंगनाशी काय संबंध?
२०१६ मध्ये ह्रतिक रोशनने कंगनासोबत शाब्दिक वाद झाल्यानंतर तक्रार दाखल केली होती. ह्रतिक आणि कंगनाने २०१३ मध्ये ‘क्रिश’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. एका मुलाखतीत बोलताना कंगनाने ह्रतिकचा उल्लेख ‘Silly Ex’ असा केला होता. यानंतर ह्रतिकने तिला कायदेशीर नोटीस पाठवली.

सर्वात आधी ह्रतिकने ट्विटरला आपल्यात आणि कंगनामध्ये कोणतेही प्रेमसंबंध नव्हते असा खुलासा केला. यानंतर त्याने कंगनाला कायदेशीर नोटीस पाठवली आणि सार्वजनिकपणे माफी मागण्याची मागणी केली. कंगनाने माफी मागण्यास नकार दिला. तसंच २०१४ मध्ये आमच्या प्रेमसंबंध होते असा दावा केला. कंगनाने ह्रतिकला नोटीस पाठवली आणि आपण पाठवलेली नोटीस मागे घे किंवा फौजदारी खटल्याला सामोरे जा असा इशारा दिला.

ह्रतिकने तोतयागिरी झाल्याची तक्रार दाखल का केली?
ह्रतिक रोशनच्या कायदेशीर नोटीशीत कंगना राणौतकडून मानसिक छळ झाल्याचा आरोप करण्यात आला होता. कंगनाने आपल्याला १४३९ ईमेल पाठवले, ज्यांना आपण उत्तर दिलं नाही. तसंच इंडस्ट्रीतील लोकांना ती आमच्यात संबंध होते असं सांगत असल्याचा दावा ह्रतिककडून करण्यात आला. कोणीतरी ह्रतिकच्या नावे कंगनाशी संवाद साधत असावं अशी शक्यता व्यक्त करण्यात आली.

कंगनाने मात्र आपण ज्या ईमेल आयडीशी संपर्कात होतो तो त्याने स्वत: दिलं असल्याचा दावा केला. पत्नी सुझानसोबत घटस्फोट घेण्याची प्रक्रिया सुरु असून त्याच्यावर कोणताही नकारात्मक परिणा होऊ नये यासाठी तो ईमेल आयडी प्रायव्हेट ठेवण्यात आला होता असंही ती म्हणाली होती.

यानंतरही कंगना आणि ह्रतिकमध्ये ट्विटरच्या माध्यमातून शाब्दिक युद्ध रंगलं होतं. ह्रतिकने कंगना कल्पना करत असून एस्पर्गर सिंड्रोमचा सामना करत असल्याचंही बोलून टाकलं. पण यामुळे ह्रतिकला मोठ्या प्रमाणता टीकेला सामोरं जावं लागलं. एस्पर्गर सिंड्रोमचा सामना करणाऱ्या मुलांच्या पालकांनी ह्रतिकच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती.

अखेर ह्रतिकने आपल्या नावाचा वापर करून बनावट ईमेल खाते तयार करून त्याद्वारे अभिनेत्री कंगना राणौतशी संवाद साधण्यात आल्याची तक्रार हृतिकने दाखल केली होती. त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवून सायबर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात मेल आयडी अमेरिका स्थित असल्याचं समोर आलं. २०१७ मध्ये पोलिसांनी NIL रिपोर्ट फाईल केला.

गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक (सीआययूकडे) वर्ग केल्यानंतर कंगना काय म्हणाली?
सायबर सेलने प्रकरण सीआययूकडे वर्ग केल्यानंतर कंगनाने ट्विट करत एका छोट्या अफेअरसाठी किती रडणार? अशी विचारणा ह्रतिकला केली. त्यानंतर सोशल मीडियावर हे प्रकरणी पुन्हा चर्चेला आले. कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं की, “त्याची कहाणी पुन्हा सुरु झाली आहे. ब्रेकअपला आणि त्याच्या घटस्फोटाला किती वर्ष झाली पण अजूनही तो पुढे जाण्यास नकार देतोय. कोणत्याही महिलेला डेट करण्यास नकार देतोय. जेव्हा कुठे आयुष्यात मला आशेचा किरण दिसू लागतो याची नाटकं पुन्हा सुरु होतात”.