मागील काही दिवसांपासून कांद्याचे वाढते दर हा सर्व सामान्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. सध्या याच दरवाढीची सगळीकडे चर्चा आहे. देशातील काही शहरांमध्ये कांद्याचे दर किलोमागे १०० ते १२० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. मागील आठ ते दहा वर्षांतील दरवाढीकडे नजर टाकल्यास कांद्याबरोबरच दरवर्षी महागाई वाढत असल्याचे चित्र दिसते. विशेष म्हणजे जगातील सर्वाधिक कांदात उत्पादन करणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारत दुसऱ्या स्थानी असताना कांद्याच्या दरांची ही परिस्थिती आहे. पहिल्या क्रमांकावर चीन आहे. हा आकडा २०११-१२ मध्ये कांद्यासंदर्भात जागतिक स्तरावर झालेल्या सर्वेक्षणामधील आहे. मात्र त्यानंतरही परिस्थिती फारशी बदलल्याचे दिसत नाही असं काही जाणकार सांगतात.

कांद्यासंदर्भात आतापर्यंत करण्यात आलेल्या वेगवेगळ्या सर्वेक्षणामध्ये कांद्याचा सर्वाधिक खप हा भारतात होत असल्याचे समोर आलं आहे. भारतामध्ये दर हजार व्यक्तींपैकी ९०८ जण कांदा खातात. एका अन्य सर्वेक्षणानुसार एक कुटुंब महिन्याला किमान साडेचार ते पाच किलो कांदा खाते. सरकारी संस्था असणाऱ्या नाफीडने (नॅशनल अॅग्रीकल्चरल को-ऑप्रेटीव्ह मार्केटींग फेड्रेशन ऑफ इंडिया लिमीटेड) जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारताकडे २५ हजार टन कांदा आहे. २३ ऑक्टोबर रोजी देण्यात आलेल्या माहितीनुसार भारताकडे असणारा हा २५ हजार टन कांदा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंतची देशातील कांद्याची मागणी पुर्ण करु शकतो. यावरुनच अंदाज लावतो येतो की देशामध्ये रोज दीड ते दोन टन कांदा वापरला जातो.

कांद्याचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या देशांमध्ये दोन्ही प्रमुख देश हे आशियातील आहेत. कांद्याचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर चीन असून दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे. मात्र कांद्याच्या पिकाखाली असणारे चीनमधील क्षेत्र हे ९५६ हेक्टर आहे तर भारतातील एक हजार ६४ हेक्टर जमीन ही कांदा उत्पादनासाठी वापरली जाते. असं असूनही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे चीनमधील उत्पादन हे अधिक आहे. केंद्र सरकारनेच २०११-१२ साली कॉम्पीटीशन कमिशन ऑफ इंडिया (सीसीआय) केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये ही माहिती समोर आली होती. याच आकडेवारीनुसार अमेरिकेमध्ये ३.३४ मिलियन टन, इजिप्तमध्ये २.२१ तर इराणमध्ये १.९२ मिलियन टन कांद्याचे उत्पादन होते. तर आजच्या घडीला भारतामध्ये दोन ते अडीच कोटी टन कांदा उत्पादन होते.