28 January 2021

News Flash

मंकीगेट प्रकरण : त्यावेळी सायमंड-हरभजनमध्ये नेमकं काय झालं होतं?

क्रिकेटविश्वाला ढवळून काढणाऱ्या ‘मंकीगेट’ प्रकरणाबाबत जाणून घेऊयात.

मागील काही वर्षांपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट संघर्ष हा चाहत्यांसाठी एक मोठी पर्वणी ठरत आला आहे. किंबहुना अ‍ॅशेस किंवा भारत-पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमधील रणधुमाळीपेक्षा अधिक रोमांचकता भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढतींमध्ये दिसून येते. आता १७ डिसेंबरपासून पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर मालिकेला सुरुवात होत आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात अनेकदा स्लेजिंग पाहाला मिळालं. पूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ वरचढ असायचा. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघही जशाच तसं उत्तर देत आहे. त्यामुळे मैदानावर अनेकदा वादाला तोंड फुटताना दिसत आहे. आज आपण अशाच क्रिकेटविश्वाला ढवळून काढणाऱ्या ‘मंकीगेट’ प्रकरणाबाबत जाणून घेऊयात. २००८मध्ये हरभजन सिंग आणि अ‍ॅन्ड्रय़ू सायमंड्स यांच्यात प्रसिद्ध ‘मंकीगेट’ प्रकरण गाजले होते.

काय आहे प्रकरण..?
२००८च्या सिडनी कसोटीत हरभजन सिंगने वर्णभेदात्मक शेरेबाजी करीत माकड संबोधल्याचा आरोप सायमंड्सने केला होता. मात्र हे आरोप हरभजन यानं फेटाळले होते. सामनाधिकारी माइक प्रॉक्टर यांनी संवेदनात्मक पद्धतीने हे प्रकरण हाताळून हरभजनवर तीन सामन्यांची बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला; परंतु मग भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खंबीर भूमिका घेत त्याचा निषेध केला आणि दौरा अर्ध्यावर सोडण्याची धमकी दिली होती. या प्रकरणाच्या सुनावणी झालेल्या सुनावणीमधये सचिन तेंडुलकरनं हरभजनकडून साक्ष दिली होती. या प्रकरणात सचिन तेंडुलकरची जबानी महत्त्वाची ठरली होती.

 

कधी,कसं झालं अन् पंचाची भूमिका काय?
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या यांच्यादरम्यान २००८ मध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यात हे प्रकरण झालं. सिडनी मैदानावर झालेल्या या सामन्यात पंचानी दिलेल्या चुकीच्या निर्णामुळे भारतीय संघातील खेळाडू आधीच वैतागले होते. या सामन्यात पंचानी ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं सहा ते सात निर्णय दिले होते. स्टीव्ह बकनर यांनी दिलेल्या चुकीच्या निर्णायामुळेच ऑस्ट्रेलियाचा संघ जिंकला होता. रिकी पॉटिंग आणि सायमंडस बाद असतानाही बकनर यांनी बाद दिलं नव्हतं. परिणामी सायमंडसनं १६३ धावांची खेळी केली. १९१ वर सहा बाद असताना सायमंड बाद असतानाही पंचानी चुकीचा निर्णय दिला. ऑश्ट्रेलियानं पहिल्या डावात ४६३ धावा काढल्या होत्या. पंचांनी निर्णय व्यवस्थित दिले असते तर ऑस्ट्रेलियाचा संघ ३०० धावांपर्यंत पोहचू शकला असता, असेही काही दिग्गज सांगतात. भारतीय संघ धावांचा पाठलाग करताना बकनर यांनी बाद नसतानाही खेळाडूंना बाद दिलं. यामध्ये राहुल द्रविड, सौरव गांगुली, जाफर यासारखे खेळाडू होते. त्यानंतरही भारतीय संघ पहिल्या डावात सात बाद ४५१ धावांवर होता. त्यावेळी मैदानावर असणाऱ्या सचिन आणि भज्जीला बाद करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघानं स्लेजिंग करण्यास सुरुवात केली. ब्रेट लीच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर सायमंड आणि भज्जीमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी ते खूप नॉर्मल वाटलं. मात्र, पंच मार्क बेनसॉन यांनी हरभजन यानं सायमंडविरोधात अर्वच्य भाषा (माकड शब्द ) वापरल्याचा आरोप केला. त्यानंतर हे प्रकरण सर्वांसमोर बाहेर आलं. त्यानंतर आयसीसीनं हरभजनवर तीन सामन्याची बंदी घातली. या प्रकरणानंतर एक कमिटी बसवण्यात आली. यामध्ये ऑस्ट्रेलियाकडून सायमंडसोबत पॉन्टिंग आणि हेडन होते. तर हरभजनसोबत सचिन तेंडुलकर….

संघातील इतर खेळाडूंची भूमिका काय होती?
असभ्य भाषेत बोलल्याचा ठपका ठेवत आयसीसीनं हरभजनवर तीन सामन्याची बंदी जाहीर केली. त्यानंतर भारतीय संघातील दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, कुंबळे आणि लक्ष्मण यांनी ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यावर सोडणार असल्याचं बीसीसीआयला कळवलं. हरभजन सिंहनं असं कोणतेही वक्तव्य केलं नव्हतं उलट सामन्यात अनेक निर्णय आमच्याविरोधात देण्यात आले होतं, संघातील काही ज्येष्ठ खेळाडूंनी बीसीसीआयला कळवलं. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ही बाब सामंजस्यानं मिटवण्याची भूमिका घेतल्यानंतर पॉटिंग आणि गिलख्रिस्ट यांनी नाराजी व्यक्त केली होती.

हरभजनवर कारवाई झाली का?
ज्येष्ठ खेळाडूंनी दिलेल्या माहितीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खंबीर भूमिका घेत या प्रकरणाचा निषेध केला आणि दौरा अर्ध्यावर सोडण्याची धमकी दिली होती. त्यानंतर भज्जीवरील बंदीचा निर्णय रद्द करीत अर्वाच्य भाषा वापरल्याबद्दल मानधनातील ५० टक्के रक्कम कापण्यात आली.

संघांवर काय झाला परिणाम? –
मायकल क्लार्कनं एका षटकात तीन विकेट घेत ऑस्ट्रेलियाला सामना जिंकून दिला. पण हरभजन-सायमंड वादामुळे दोन्ही संघात तणावाचं वातावरण होतं. सामन्याच्या शेवटी ऑस्ट्रेलियाच्या संघानं नियमाप्रमाणे भारतीय संघाचा कर्णधार अनिल कुंबळेसोबत हस्ताअंदोलनही केलं नाही. अॅडम गिलख्रिस्टनं यावर स्पष्टीकरण देताना सांगितलं की, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूनं नंतर ड्रेसिंग रुममध्ये जाऊन कुंबळेशी हस्ताअंदोलन केलं होतं. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पॉन्टिंग पत्रकारावर चिडला होता. तर कुंबळेनं केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांनी टाळ्या वाजवल्या होत्या. कुंबळे म्हणाला होता, ‘या सामन्यात फक्त एकच संघ खिलाडूवृत्तीनं खेळत होता, आणि तो संघ भारत होता…’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2020 10:14 am

Web Title: india vs australia india tour australia the monkeygate scandal 2008 explained nck 90
Next Stories
1 समजून घ्या : डिसेंबर महिन्यात मुंबईत का पडतोय पाऊस?
2 ….जेव्हा शेतकरी आंदोलनासमोर मोदी सरकारला झुकावं लागलं होतं; ‘हा’ अध्यादेश घेतलेला मागे
3 समजून घ्या : HDFC बँकेवर RBI ने घातलेल्या निर्बंधांचा अर्थ काय?; ग्राहकांवर काय परिणाम होणार?
Just Now!
X