26 January 2021

News Flash

समजून घ्या : WhatsApp च्या नवीन धोरणांमुळे कोणती माहिती जाहीर होणार?

नवीन नियम आणि अटी स्वीकारणं किंवा व्हॉट्सअ‍ॅपचा वापर थांबवणं हे दोनच पर्याय...

लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp ने नव्या वर्षात नवीन प्रायव्हसी पॉलिसी आणली आहे. ८ फेब्रुवारीपर्यंत या अटी स्वीकारणं युजरसाठी अनिवार्य आहे, जर अटी स्वीकारल्या नाहीत तर ८ फेब्रुवारीनंतर तुम्हाला हे अ‍ॅप वापरताच येणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या गोपनीयता धोरणात काही बदल केले आहेत. पण हे बदल वापरकर्त्यांची गोपनीयता गुंडाळण्यास पुरेसे आहेत. यातील पहिला बदल म्हणजे, वापरकर्त्यांच्या माहितीचे संकलन आणि प्रक्रिया. या बदलानुसार व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांच्या मोबाइलमधील बॅटरीची सद्यस्थिती, नेटवर्क सिग्नल, मोबाइल क्रमांक, आयपी अ‍ॅड्रेस, मोबाइल कंपनी, भाषा आणि कालक्षेत्र (टाइमझोन) अशी सगळी माहिती व्हॉट्सअ‍ॅपला वेळोवेळी गोळा करता येणार आहे. सध्याच्या स्मार्टफोनवरील अनेक अ‍ॅपमध्ये अशाप्रकारची माहिती गोळा करण्याची मुभा आपण आधीच देऊन टाकलेली आहे. पण व्हॉट्सअ‍ॅप पहिल्यांदाच वापरकर्त्यांची अशी माहिती गोळा करत आहे. ती कशासाठी, या प्रश्नाला ठरावीक गोंडस उत्तर ‘अ‍ॅपच्या अद्यतन आणि वापरकर्त्यांच्या सहजतेसाठी’ असे देण्यात आलेले आहे. यातील दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे, यापुढे ‘व्हॉट्सअ‍ॅपवरील बिझनेस खाती त्यांच्या व्हॉटसअ‍ॅप चॅटमधील माहिती फेसबुकशी संबंधित अन्य खात्यांशी शेअर करू शकतील’. हा बदल वरकरणी केवळ व्हॉट्सअ‍ॅपवरून व्यवसाय करणाऱ्यांपुरता मर्यादित वाटत असला तरी, त्याचा थेट परिणाम सामान्य वापरकर्त्यांवर होणार आहे. म्हणजे, तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवरून एखाद्या बिझनेस गटाशी (ग्रुप) संलग्न असाल तर तुम्ही त्या ग्रुपवरून शेअर केलेली माहिती किंवा तुमची माहिती कशी वापरायची आणि कुणाशी शेअर करायची याचा अधिकार संबंधित बिझनेस खात्याला असणार आहे. याचाच अर्थ, येथेही तुमची गोपनीयता भंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपनेच अत्यंत साळसूदपणे, ‘यापुढे बिझनेस खात्यांशी आपली माहिती शेअर करताना सावधगिरी बाळगा. तुमची माहिती अनेकांना दिसू शकते’ असे या गोपनीयता धोरणातच म्हटले आहे. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपवर जमा होणारी सर्व माहिती फेसबुकच्या कंपन्यांना पुरवण्यात येईल, असेही या धोरणात म्हटले आहे.

नवीन धोरणांमुळे कोणती माहिती जाहीर होणार?
’ ज्या ज्या देशांमध्ये व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकची कार्यालये आहेत, तिथे वापरकर्त्यांची खासगी माहिती पाठवली जाऊ शकते. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांचा इंटरनेट प्रोटोकॉल अ‍ॅड्रेस (आयपी अ‍ॅड्रेस) फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा दुसऱ्या कुणालाही देऊ शकते.

’ व्हॉट्सअ‍ॅप तुमच्या मोबाइल किंवा लॅपटॉप, संगणकाशी संबंधित बॅटरी लेव्हल, सिग्नल स्ट्रेंग्थ, अप व्हर्जन, ब्राऊझरशी संबंधित माहिती तसेच भाषा, फोन नंबर, मोबाइल आणि इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपनी यांसारखी माहितीही एकत्र करू शकेल.

’ नवीन धोरणानुसार तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपची काही वैशिष्टय़े वापरली नाहीत, तरीही तुमचा आयपी अ‍ॅड्रेस, फोन नंबर, देश आणि शहरासारखी माहिती व्हॉट्सअ‍ॅपकडे असेल. फेसबुकसह ज्या कंपन्या व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आपली उत्पादने व सेवा देऊ करतात त्यांना तुमची माहिती पुरवली जाऊ शकते.

’ व्हॉट्सअ‍ॅपनं भारतात निधी हस्तांतरण सेवा सुरू केली आहे. त्या सेवेचा लाभ घेत असल्यास व्हॉट्सअ‍ॅपला तुमची आर्थिक देवाणघेवाणीशी संबंधित माहितीही पुरवली जाऊ शकते.

व्हॉट्सअ‍ॅपला पर्याय काय?

व्हॉट्सअ‍ॅपची नवी धोरणे मान्य नसल्यास ८ फेब्रुवारीपासून खाते बंद होऊ शकते. अशा वेळी सिग्नल किंवा टेलिग्राम हे पर्यायी अ‍ॅप वापरता येऊ शकतात. त्यातही सिग्नल हे अ‍ॅप वापरण्यासाठी सुरक्षित आहे. मात्र त्यातील वैशिष्टय़े वापरण्यास थोडी अवघड वाटू शकतात.

संपर्क जाळे वाढविण्यासाठी हे दोन्ही अ‍ॅप वापरताना आपल्या संपर्कातील व्यक्तींनी किंवा संस्थांनी त्याचा वापरच केला नाही तर हे पर्याय वापरूनही फायदा होणार नाही.

( WhatsApp ला झटका, भारतातील टॉप फ्री अ‍ॅप बनलं Signal; काय आहे खासियत?)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 4:44 pm

Web Title: whatsapp new privacy policy check details sas 89
Next Stories
1 व्हॉट्सअ‍ॅप : गोपनीयतेसाठी सक्ती
2 गणिताची सुरुवात..
3 समजून घ्या : वाहनधारकांना FASTag सक्ती कशासाठी आणि नियमावली काय?
Just Now!
X