क्युबा हा अमेरिकेच्या शेजारी असलेला छोटासा देश. निसर्गाने समुद्ध असलेल्या क्युबाला जगभरात ओळख मिळाली, ती या देशाचे क्रांतिकारी नेते फिडेल कॅस्ट्रो यांच्यामुळे. शीत युद्धाच्याकाळात कॅस्ट्रो यांचा अमेरिकाविरोध जगात अनेकांसाठी आकर्षणाचा विषय ठरला होता. अमेरिकेने कॅस्ट्रो यांना संपवण्यासाठी अनेक कारस्थाने रचली. पण कॅस्ट्रो अमेरिकेला पुरुन उरले. कॅस्ट्रो यांनी अमेरिकेला चांगलेच जेरीस आणले होते.

अमेरिकेच्या भांडवलशाही धोरणांना कॅस्ट्रो यांचा विरोध होता. त्यामुळेच क्युबामध्ये कम्युनिस्ट विचारधारेचे सरकार अस्तित्वात आले. क्युबामध्ये मागच्या सहा दशकांपासून कम्युनिस्ट राजवट आहे. पण नजीक भविष्यात क्युबामध्ये अनेक महत्त्वाचे आर्थिक बदल होऊ घातले आहेत. शनिवारी त्याच दिशेने क्युबामध्ये महत्त्वाची घोषणा करण्यात आली. क्युबाच्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत बहुतांश क्षेत्रे खासगी व्यवसायासाठी मोकळी होणार आहेत.

“नव्या सुधारणांमध्ये प्रमाणित उद्योगांची संख्या १२७ वरुन २ हजार पर्यंत गेली आहे. फार कमी उद्योगांवर सरकारचे नियंत्रण आहे” असे क्युबाच्या कामगार मंत्री इलिना फिटो यांनी सांगितले.

क्युबाच्या मंत्रिपरिषदेने मान्यता दिल्यानंतर मागच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात या सुधारणा कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली होती. सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र ग्रानमामधून ही माहिती देण्यात आली आहे.

क्युबामधील आर्थिक सुधारणा
आर्थिक सुधारणा कार्यक्रम हा क्युबामधील अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण बदल आहे. दीर्घकाळापासून सरकारी नियंत्रणाखाली असलेल्या क्युबन अर्थव्यवस्थेतील बहुतांश क्षेत्रात खासगी उद्योगांना परवानगी मिळणार आहे. सध्या क्युबामध्ये खासगी क्षेत्रातील कंपन्या प्रामुख्याने पर्यटनाशी संबंधित व्यवसायांमध्ये आहेत. पर्यटन उद्योगाला करोना व्हायरसचा मोठा फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास कमी झाल्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या हजारो लोकांचा रोजगार धोक्यात आला आहे. यात बहुतांश व्यापारी आणि टॅक्सी चालक आहेत.

“खासगी क्षेत्रातील उत्पादनक्षमतेला मुक्त करणे, मदत करणे हा या सुधारणांमागचा हेतू आहे. खासगी क्षेत्राला चालना देणे, हा या सुधारणांमागचा उद्देश आहे” असे इलिना फिटो यांनी म्हटल्याचे एएफपीने वृत्त दिले आहे.
खासगीकरणाचा मार्ग मोकळा करतानाच १२४ उद्योगांमध्ये खासगी उद्योगांना परवानगी मिळणार नाही, असे फिटो यांनी स्पष्ट केले. ते उद्योग कुठले असतील, ते त्यांनी स्पष्ट केलेले नाही. पण एएफपीनुसार, मीडिया, संरक्षण आणि आरोग्य या रणनितीक दृष्टीने महत्त्वाच्या क्षेत्रांवर क्युबन सरकारचेच नियंत्रण राहिल.

आता बदल का केले?
मागच्यावर्षी करोना व्हायरसची साथ आणि अमेरिकेने घातलेले निर्बंध याचा क्युबाच्या अर्थव्यवस्थेला दुहेरी फटका बसला. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे निर्बंध लादले होते. त्यामुळे २०२० मध्ये अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. तीन दशकातील सर्वात खराब कामगिरीची नोंद झाली. गरजेच्या वस्तुंचा तुटवडा निर्माण झाला.

बऱ्याचकाळापासून प्रलंबित असलेल्या सुधारणा केल्या, तर छोटया उद्योगांना आपले विश्व आणखी विस्तारता येईल. खासगी उद्योगांना पर्यटन आणि शेतीपलीकडे कक्षा रुंदावता येतील. आर्थिक संकटामुळे क्युबन सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. आयातीवरील अवलंबित्व कमी करुन निर्यात वाढवणं आणि देशातंर्गत मागणी वाढवणं हा त्यामागे उद्देश आहे.

अमेरिकेसोबत कसे आहेत संबंध ?
क्युबाच्या उत्तर किनाऱ्यापासून अमेरिकेतील फ्लोरिडा शहर फक्त १५० किलोमीटर अंतरावर आहे. बरीच वर्ष या दोन देशांमध्ये शत्रुत्वाची भावना होती. पण २०१५ साली माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा पहिल्यांदा क्युबाच्या दौऱ्यावर गेले. त्यांनी राउल कॅस्ट्रो यांची भेट घेतल्यानंतर संबंध थोडे सामान्य झाले. अमेरिकेन नागरिकांना क्युबाला जाण्याची परवानगी दिली. जेणेकरुन तिथल्या स्थानिक अर्थव्यवस्थेला हातभार लागेल. पण डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर त्यांनी ओबामांचे अनेक निर्णय बदलले व विरोधाची भूमिका कायम ठेवली. आता डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन राष्ट्राध्यक्षपदी विराजमान आहेत. त्यांच्या कार्यकाळात अमेरिका-क्युबाचे संबंध थोडे सुधारतील असे आंतरराष्ट्रीय विषयाच्या जाणकारांना वाटते.