News Flash

जाणून घ्या : पबजी भारतात इतका पॉप्युलर का आहे?

पालकांची झोप उडवणाऱ्या गेमच्या लोकप्रियतेची कारणं

फाइल फोटो

भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला तणाव पुन्हा एकदा वाढला असल्याचं चित्र आहे. गलवान खोऱ्याप्रमाणे पँगाँग सरोवर परिसरातही चिनी सैन्यांकडून नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केल्याने भारताने चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे. केंद्र सरकारने बुधवारी (२ सप्टेंबर २०२० रोजी) ११८ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ही बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये तरुणांमध्ये प्रचंड वेड असणाऱ्या पबजी गेमचाही समावेश आहे. मात्र भारतीय तरुणाईला वेड लावणारा हा गेम इतका लोकप्रिय का आहे याबद्दल अनेकांना माहिती नाही. त्यावरच प्रकाश टाकल्याचा केलेला हा प्रयत्न…

मागील वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ‘परीक्षा पे चर्चा’ या विद्यार्थी आणि पालकांशी संवाद  साधणाऱ्या कार्यक्रमात एका विद्यार्थ्यांच्या आईने आपला मुलगा अभ्यासात अजिबात लक्ष देत नाही. सतत मोबाइलवर गेम खेळत असतो, अशी तक्रार केली असता, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘पबजीवाला है क्या?’ अशी विचारणा केली. त्यावर सभागृहात हशा पिकलाच पण त्यानंतर ‘पबजी’वाला है क्या’ फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर ‘मेम’चा विषय बनला. या निमित्ताने ‘पबजी’ हा गेम न खेळणाऱ्यांमध्येही त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. एरवी लोकल ट्रेनमध्ये, रेल्वे स्थानकात, बिल्डिंगच्या पायऱ्यांवर किंवा पॅसेजमध्ये, कॉलेजच्या कट्टय़ावर किंवा वायफाय ‘फ्री’ मिळत असेल तिथे घोळके करून मोबाइलमध्ये गुंतलेली मुले पाहिली की, यांचं कसलं ‘चॅटिंग’ चाललंय, असा प्रश्न पाहणाऱ्याच्या मनात येत असे. पण ही मुलं प्रत्यक्षात ‘पबजी’त रमलेली असतात, हे लक्षात येऊ लागलं.

नक्की पाहा >> पबजी बंदीची बातमी ऐकून भारतीय पालक झाले सैराट; पाहा भन्नाट मिम्स…

हा गेम नक्की आहे तरी काय?

‘पबजी’ धोकादायक आहे का, खरंच तो मुलांवर मानसिक परिणाम करतो का, मोबाइलमध्ये गुंगवून ठेवण्याइतकं सामर्थ्य या गेममध्ये आहे का, या साऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याआधी आपण हा गेम नेमका काय आहे, ते पाहू. ‘प्लेअर अननोनस् बॅटलग्राऊंड’ हा ‘पबजी’चा फुलफॉर्म. एकमेकांना ओळखतही नसलेली शंभर मंडळी या गेमच्या मदतीने एकमेकांना भिडतात, हा या गेमचा सारांश. पॅराशूटमधून एका प्रदेशात उतरल्यानंतर या प्रदेशात वेगवेगळय़ा ठिकाणी दडवून ठेवलेली शस्त्रं, साधनं, संरक्षक कवच पटकावत समोर दिसेल त्या प्रतिस्पध्र्याचा त्या शस्त्रांनिशी खातमा करणं आणि शेवटपर्यंत टिकून राहणं, हे या  गेममधील प्रत्येक खेळाडूचं ध्येय असते. यादरम्यान त्या भूप्रदेशावरील ‘सेफ एरिया’ आक्रसत जातो आणि त्या ‘सेफ एरिया’त राहण्याचे प्रयत्न प्रत्येक खेळाडूला करावे लागतात. असा एकूण ‘पबजी’चा पसारा.

भारतात का लोकप्रिय झाला?

अशीच संकल्पना असलेले अनेक गेम याआधीही आपल्या पाहण्यात, खेळण्यात आले असतील. पण ‘पबजी’ भारतात लोकप्रिय होण्याची दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे, हा गेम पूर्णपणे मोबाइलवर खेळता येतो. अगदी दहा हजार रुपयांच्या स्मार्टफोनवरही ‘पबजी’ खेळता येणं शक्य आहे. भारतात अजूनही ‘प्ले स्टेशन’ किंवा ‘एक्सबॉक्स’सारखी गेमिंग उपकरणं रुजलेली नाहीत. कॉम्प्युटरवरील गेमचा अजूनही प्रसार झालेला नाही. अशा परिस्थितीत कोणाच्याही हातात असलेल्या मोबाइलमध्ये उपलब्ध झालेला ‘पबजी’ लोकप्रिय होणार नाही, तर नवलच.

दुसरं कारण म्हणजे, या गेमच्या भारतात दाखल होण्याचं टायमिंग. भारतात मोबाइल इंटरनेट कवडीमोल दरात मिळण्यास सुरुवात झाल्यानंतर दिवसाला मिळालेल्या एक-दोन जीबी  डेटाचं करायचं काय, या ‘विवंचने’त असलेल्या तरुणाईला ‘पबजी’ने मार्ग दाखवला. अतिशय कमी डेटाचा वापर करूनही आकर्षक ग्राफिक्स, उत्कंठावर्धक टप्पे आणि एकाच वेळी अनेकांसोबत गेम खेळण्याची संधी यामुळे अल्पावधीतच ‘पबजी’ लोकप्रिय झाला. २०१९ साली जगभरात ४० कोटी ‘पबजी’चे खेळाडू आहेत. भारतात मोबाइल किंवा ऑनलाइन गेम खेळणाऱ्यांमध्ये ‘पबजी’वाल्यांचं प्रमाण ७० टक्क्यांहून अधिक आहे. यावरून या खेळाच्या लोकप्रियतेची किंवा वेडाची व्याप्ती लक्षात येते. आता तर हा केवळ खेळ उरलेला नाही तर, ‘पबजी’ खेळणाऱ्यांच्या व्यावसायिक स्पर्धा आता भारतात आयोजित होऊ लागल्या. लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसं असलेल्या या स्पर्धेसाठी मुलं एखाद्या ऑलिम्पिकसाठी करावा तसा कसून सराव करु लागली. आणि या बक्षिसांच्या लोभापायी ‘पबजी’वाल्यांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत गेली.

पालकांची झोप उडाली

कोणत्याही गोष्टीचं अतिकरण धोकादायक असतं. आज ‘पबजी’चंही तेच होऊ लागलं. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात पंतप्रधानांसमोर आपली व्यथा मांडणारी ‘ती’ माता एकटीच नाही. आज १२ ते १८ वयोगटातील कोणत्याही मुलामुलींच्या पालकांसाठी ‘पबजी’ हे संकट बनू लागलं. आपला मुलगा मोबाइलवर ‘चॅटिंग’ किंवा ‘भलतंसलतं’ पाहात बसत नाही, या समाधानातून त्याला गेम खेळण्यास मुभा देणारे पालक आज ‘पबजी’बद्दल तक्रार करु लागले. मध्यंतरी ‘पबजी’ आणखी मोठय़ा आणि वेगवान मोबाइलवर खेळता यावा, यासाठी नव्या मोबाइलची मागणी करणाऱ्या मुलाने हट्ट पूर्ण न झाल्याने आत्महत्या केल्याची घटना मुंबईत घडली. ही कितपत खरी, हे अद्याप स्पष्ट नाही. पण ‘पबजी’ खेळत रात्रभर जागणाऱ्या मुलांमुळे त्यांच्या पालकांचीही झोप उडाली, हे निश्चित.

गेमिंग डिसऑर्डर

लहान मुलं आणि तरुण पिढीवर होत असलेला ऑनलाइन, मोबाइल, व्हिडीओ, प्लेस्टेशन अशा गेमचा मारा आणि या गेममधील हिंसाचार या दोन्ही गोष्टी घातक आहेत. जागतिक आरोग्य संघटनेकडून दरवर्षी आंतरराष्ट्रीय आजारांची वर्गवारी (आयसीडी) जाहीर करण्यात येते. या वर्गवारीमध्ये ‘गेमिंग डिसऑर्डर’चा मानसिक आजारात समावेश करण्यात आला आहे. गेमिंगचं व्यसन तरुणांचं मानसिक संतुलन खराब करू शकतो, हे दाखवणाऱ्या अनेक घटना आजवर समोर आल्या आहेत. ‘प्रतिस्पध्र्याला ठार करण्यासारख्या आक्रमक गेमचं व्यसन तरुणांना अधिक लागतं,’ असं मानसोपचारतज्ज्ञही सांगतात. पण यातून उद्भवणाऱ्या मनोविकारावर मानसोपचारतज्ज्ञांकडेही उत्तर नसल्याचं सांगण्यात येत आहे. ‘स्ट्रेस बस्टर’ किंवा मानसिक ताणमुक्तीसाठी मोबाइल गेम खेळणं चांगलं असं म्हटलं जात होतं. पण आता असे गेमच मानसिक आजारांना निमंत्रण देऊ लागले आहेत.

(टीप : मूळ लेख ‘लोकसत्ता’च्या व्हिवा पुरवणीतील टेकजागर सदरामध्ये आसिफ बागवान यांनी ‘पब्जी’वाला है क्या? या मधळ्याखाली लिहीला होता. तो लेख येथे क्लिक करुन वाचू शकता)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2020 9:03 am

Web Title: why pubg is wildly popular in india scsg 91
Next Stories
1 हॅकिंग म्हणजे काय?, मोबाइल कसे हॅक होतात?, FB Account, Whatsapp हॅक होऊ शकतं?
2 समजून घ्या : अर्थव्यवस्था म्हणजे काय? आणि अर्थव्यवस्थेचे प्रमुख प्रकार कोणते?
3 समजून घ्या : राष्ट्रीय दुखवटा म्हणजे काय?, तो कोणाकडून आणि कधी जाहीर केला जातो?
Just Now!
X