Online gaming addiction अल्पवयीन मुलांमध्ये सोशल मीडिया आणि ऑनलाइन गेमिंगचे वेड प्रचंड प्रमाणात वाढले आहे. यासंबंधित अशा काही घटना घडल्या आहे की, गेमच्या आहारी गेलेल्या मुलांनी आपल्या पालकांना कर्जबाजारी केले आहे. देशभरात ऑनलाइन सट्टेबाजीचे प्रमाण वाढत चालले असताना सरकारने याविरोधात ऑनलाइन गेमिंगचे विधेयक आणले. केंद्रीय मंत्रिमंडळाने ऑनलाइन गेमिंगचे नियमन करण्याच्या उद्देशाने ऑनलाइन गेमिंग विधेयकाला मंजुरी दिली.

मुलांमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाचा त्यांच्या मेंदूवरदेखील परिणाम होतोय. परिणामी, मुले या गेमसाठी कोणतीही पातळी गाठायला तयार आहेत. गेमिंगचा मेंदूवर कसा परिणाम होतो? त्यावर उपचार काय? मुलांनी पालकांची फसवणूक कशी केली? या सर्व गोष्टींचा आढावा घेऊयात…

गेमिंगसाठी पालकांची फसवणूक

इंदूरमधील एका १६ वर्षांच्या मुलीने एका फॅन्टसी गेमिंग ॲपमध्ये साइन अप केले, हे ॲप मोफत डाउनलोड केले, पण जसे जसे ती एक एक लेव्हल पार करत गेली, तसतशी पुढील लेव्हल खेळण्याची तिची उत्सुकता वाढत गेली. तिने पैसे उधार घेतले, प्रवेश शुल्क असलेल्या पेड लेव्हलमध्ये भाग घेतला आणि बक्षिसे जिंकली. तिने ॲपमध्येच व्हर्च्युअल टूल्स खरेदी केली. नंतर ती हरू लागली आणि तिला ‘कॅसिनो सिंड्रोम’ झाला.

त्यात ती पुढील लेव्हल खेळण्यासाठी, आपले नुकसान भरून काढण्यासाठी आणि कर्जदारांना पैसे देण्यासाठी आणखी पैसे हरली. सहा महिन्यांत मुलीवर ८०,००० रुपयांचे कर्ज जमा झाले. जेव्हा तिच्या पालकांनी तिला मुंबईच्या बाल आणि किशोरवयीन मानसोपचारतज्ज्ञ आणि पालक प्रशिक्षक असलेल्या उर्वशी मुसळे यांच्याकडे नेले, त्यावेळी तिचे वजन घटले होते, तिने जेवण सोडले होते, अभ्यासही बंद केला होता.

अल्पवयीन मुलांमध्ये सोशल मीडिया आणि ऑनलाइन गेमिंगचे वेड प्रचंड प्रमाणात वाढले आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

मुसळे सांगतात, “पहिल्यांदा, ती वेगवेगळ्या बहाण्याने तिच्या पालकांकडून पैसे मागायची. तिला जास्त गेम जिंकण्याचा एवढा लोभ आणि व्यसन लागले होते की, ती मित्र आणि नातेवाईकांकडूनही पैसे मागायची. ती नाटक करायची की तिचे पालक खूप कठोर आहेत आणि तिला कधीच समजून घेत नाहीत. त्यानंतर तिने तिच्या विद्यार्थी खात्यातून छोटे कर्ज देणाऱ्या ॲप्समधून कर्ज घेतले.

मुसळे यांनी पुण्यातील रुग्णाविषयी सांगितले. पुण्यातील एका १३ वर्षांच्या मुलाने त्याच्या आईचा UPI पिन नंबर लक्षात ठेवला होता आणि गेमिंग ॲप्ससाठी व्हर्च्युअल शस्त्रे खरेदी करण्यासाठी तिच्या खात्यातील दोन लाख रुपये काढून घेतले होते. याच स्वरूपाच्या वाढत चाललेल्या प्रकरणांमुळे सरकारने नवीन ऑनलाइन गेमिंग विधेयक लागू केले आहे.

मुसळे सांगतात, “अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की, गेमिंगमुळे अमली पदार्थांच्या सेवनासारखेच डोपामाइनचे झटके (Dopamine hit) मिळतात. जास्त गेमिंगमुळे किशोरवयीन मुलांसाठी दैनंदिन गोष्टींचे महत्त्व कमी होते.” कोविड काळापासून हे प्रमाण वाढले आहे. मात्र, गेल्या एका वर्षात किशोरवयीन मुलांच्या ऑनलाइन जुगारात मोठी वाढ झाल्याचे त्यांचे सांगणे आहे.

गेमिंगचा मेंदूवर कसा परिणाम होतो?

बंगळुरू येथील मणिपाल हॉस्पिटलमधील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हर्षा जीटी यांनी गेल्या पाच वर्षांत २० वर्षांच्या सुरुवातीच्या काळात असलेल्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये गेमिंगच्या व्यसनामुळे होणारे नुकसान पाहिले आहे. त्या म्हणतात, “खेळ खेळणे, विशेषतः हिंसक खेळ, जुगार आणि धोका पत्करण्यास प्रोत्साहन देणारे खेळ तुमच्या मेंदूला बदलण्यात अमली पदार्थाएवढेच शक्तिशाली असतात, त्यामुळे तुमच्या मेंदूतील लिम्बिक क्षेत्र (Limbic areas) कमी होऊ शकते. व्यसनामुळे भावनिक आणि सामाजिक अलिप्तता येते, ज्यामुळे शेवटी ती व्यक्ती नैराश्यात (Depression) जाते.”

मुलांमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाचा त्यांच्या मेंदूवरदेखील परिणाम होतोय. (छायाचित्र-लोकसत्ता संग्रहित)

गेमिंगचा वापर वाढण्याचे कारण काय?

मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमधील क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट रितुपर्णा घोष म्हणतात, “किशोरवयीन मुलांसाठी, कमी वेळात सामाजिक मान्यता मिळवणे महत्त्वाचे असते. आर्थिक फायदा व्हर्च्युअल असला तरी त्यांना त्यातून आनंद मिळतो.” मुसळे म्हणतात, “गेमिंग हे फक्त सोशल मीडियावर बढाई मारण्याचे एक साधन आहे, कारण बहुतेक खेळ एका ग्रुपमध्ये खेळले जातात आणि त्यात तुमच्या टीमसोबत व्हॉइस चॅटची सोय असते. त्यामुळे प्रत्येक किशोरवयीन मुलाला त्याच्या मित्रांपेक्षा श्रेष्ठत्व मिळवायचे असते. ते बनावट आयडी तयार करतात, आपले वय खोटे सांगतात, आपल्या कुटुंबाला फसवतात.”

मुसळे यांनी सांगितले की, त्यांच्याकडे आलेल्या १६ वर्षांच्या मुलीने तिच्या आवडत्या बॉलीवूड अभिनेत्याला त्या गेमची जाहिरात करताना पाहिले होते, म्हणूनच नवीन विधेयकात दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कठोर कारवाई केली गेली आहे. त्या म्हणतात, “गेमिंग कंपन्या याच गोष्टींवर भरभराट करतात. त्या सुरुवातीला तुम्हाला सहज जिंकू देतात आणि एकदा तुम्ही अडकले की, तुमच्यासाठी जिंकणे कठीण करतात आणि स्वतः पैसे कमावत राहतात.”

यावरील उपाय काय?

मुसळे यांनी त्या १६ वर्षांच्या मुलीशी बोलताना सर्वात आधी सहानभूतीचा वापर केला. त्या म्हणाल्या, “अशा वेळी मुले खूप संवेदनशील असतात आणि स्वतःला दोष देतात, त्यामुळे त्यांना त्या मानसिकतेतून बाहेर काढणे महत्त्वाचे असते.” डॉ. घोष आणि डॉ. हर्षा दोघांनीही सांगितले की, जास्त व्यसनाधीन मुले स्वतःला हानी पोहोचवण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. मुसळे यांनी ‘कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी’चा वापर केला. मुसळे यांनी सांगितले, “गेमिंगचे व्यसन हे डोपामाइनच्या झटक्यासारखेच असल्यामुळे, बाधित व्यक्तीमध्ये असेच ‘विथड्रॉवल सिम्प्टम्स’ दिसतात, म्हणूनच आम्ही तिच्या आईला सुरुवातीच्या आठवड्यांमध्ये रात्री तिच्या खोलीत झोपायला लावले, कारण ती रात्री गेम खेळायची. अशा प्रकरणात पर्यायी चांगल्या गोष्टींमध्ये रस निर्माण करणे महत्त्वाचे आहे. तिला संगीत आवडायचे, म्हणून गेमिंगची जागा संगीत थेरपीने घेतली. तिच्या पालकांना तिचे कर्ज फेडताना किती त्रास होत आहे हेही आम्ही तिला दाखवून दिले, जेणेकरून तिला पैशाचे महत्त्व कळावे,” असे मुसळे म्हणाल्या.

१३ वर्षांच्या मुलासाठी मुसळे यांनी त्याच्यातील चांगल्या गुणांची गणना करून त्याला वास्तविक जगात आत्मविश्वास निर्माण करण्यास मदत केली, त्यामुळे त्याला कळले की लोक त्याचे कौतुक करतात. तो फुटबॉल खेळायचा, म्हणून त्या कौशल्याचा विकास करण्यावर आम्ही भर दिला. त्याच्या फुटबॉल प्रशिक्षकाकडून होणाऱ्या कौतुकाने त्याला ऑनलाइनपासून ऑफलाइन जीवनाकडे वळण्यास मदत झाली.

पालकांनी काय करावे?

पालक स्वतःच मुलांना नियंत्रणात ठेवू शकतात का? यावर मुसळे सर्व पालकांना सल्ला देतात की, “त्यांनी त्यांच्या मुलाच्या खात्यातील ॲप्सपर्यंत डिजिटल पोहोच बंद करावी. पालक जी सर्वात मोठी चूक करतात ती म्हणजे व्यसनाची जागा अभ्यासाने घ्यायला सांगतात. सर्वात आधी त्यांना मनोरंजनाचा दुसरा चांगला मार्ग शोधावा लागेल, त्यांच्या तंत्रज्ञानाचा वापर पूर्णपणे बंद करू नका, पण त्यांना धोके समजावून सांगा आणि धोक्याबद्दल शिक्षित करा. जर ते गेमिंगमध्ये असतील तर त्यांच्या गेमिंगच्या वर्तनात स्वारस्य दाखवा आणि त्यांना जाळ्यातून बाहेर पडायला मदत करा.”

पण, सर्वात मोठा सुधारणात्मक उपाय म्हणजे त्यांना पैशाचे महत्त्व समजावून सांगणे. त्या म्हणतात, “मुलांनी पैशाचा संबंध मजा आणि उत्साहाशी जोडायला सुरुवात केली आहे. बचतीबाबत त्यांना रस राहिलेला नाही. पैशांची किंमत कशी करावी याविषयी त्यांना काहीही माहीत नाही, त्यामुळे जुगार आणि व्यसनाचे सामान्यीकरण झाले आहे.”