मुंबईपासून सुमारे २०० किमी अंतरावर असलेल्या मालेगाव येथील मशिदीजवळ २००८ मध्ये मोटारसायकलचा स्फोट होऊन सहा जण ठार आणि ९२ हून अधिक जण जखमी झाले होते. हे प्रकरण ३० सप्टेंबर २००८ रोजी राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) तपासासाठी वर्ग करण्यात आले होते. एटीएसने २० जानेवारी २००९ रोजी एकूण १४ जणांवर आरोपपत्र दाखल केले. त्यात साध्वी, कर्नल पुरोहित आणि मेजर उपाध्याय हे कटाचे सूत्रधार, तर स्फोटात वापरलेली दुचाकी साध्वीची असल्याचा आरोप होता. हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) वर्ग झाल्यानंतर आता मुंबईतील विशेष न्यायालयाने या प्रकरणातील सातही आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. त्यामध्ये भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा समावेश आहे. त्यांच्यावर कोणते आरोप होते ते जाणून घेऊया…
प्रज्ञा सिंह ठाकूर
पहिली आरोपी – स्वामी पूर्णचेतनानंद गिरी (५५), मध्य प्रदेशातील रहिवासी असलेल्या ठाकूर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) कार्यकर्त्या व माजी खासदार आहेत.
आरोप: बॉम्ब ठेवण्यात आलेली एलएमएल फ्रीडम दुचाकी प्रज्ञा ठाकूर यांची असल्याचे एटीएसचे म्हणणे होते. तसेच ती कटात सहभागी असल्याचा आरोप होता. बॉम्बस्फोटांबाबत आयोजित बैठकांनाही ती उपस्थित होती, असा आरोप होता.
बचाव : प्रज्ञा सिंह यांनी कोणत्याही कटात सहभाग घेतला नसल्याचा दावा केला. तसेच स्फोटात वापरण्यात आलेल्या दुचाकीशी आपला कोणताही संबंध नसल्याचा आरोप केला. यावेळी एटीएसने आपल्याला बेकायदेशीरपणे अटक केली आणि शारीरिक व मानसिक छळ केल्याचे आरोप त्यांनी केले होता.
खटल्याची प्रगती : एनआयएने २०१६ मध्ये दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये पुरावा अपुरा असल्याचे नमूद केले होते, मात्र न्यायालयाने त्यांना दोषमुक्त करण्यास नकार दिला होता.
राजकारण प्रवेश : भाजपच्या तिकिटावर २०१९ मध्ये भोपाळमधून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या.
रमेश उपाध्याय
सेवानिवृत्त मेजर, चौथा आरोपी
आरोप : ‘हिंदू राष्ट्रा’साठी स्वतंत्र संविधान बनवण्याची चर्चा केल्याचा आरोप. त्याबाबत फरिदाबादला २००८ मध्ये बैठक झाली होती. त्याला सहआरोपी कर्नल प्रसाद पुरोहितही उपस्थित होते.
अभिनव भारत संघटनेचा कार्याध्यक्ष म्हणून निवड झाल्याचा एटीएसकडून आरोप.
बचाव : रमेश उपाध्याय यांच्याविरोधातील तांत्रिक पुरावे बेकायदा असल्याची बाजू मांडली. त्यांचे दूरध्वनी अभिवेक्षण बेकायदेशिररित्या करण्याता आल्याचा दावा. एटीएसने खोटे पुरावे उभे केल्याचे सांगितले.
एनआयएचा दावा : उपाध्यायविरोधात कोणतेही ठोस पुरावे नसल्यामुळे त्यांच्याविरोधात खटला चालवता येणार नाही. पुराव्यांसाठी अपेक्षित नियमांचे पालन करणयात आले नाही.
राजकीय प्रवेश : कारावासात असतानाही २०१२ , २०१७ आणि २०२२ मध्ये उत्तर प्रदेशातील बलियामधून निवडणूक लढवली होती.
लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित
सैन्य अधिकारी, अभिनव भारतचे संस्थापक असल्याचा दावा.
आरोप : कट रचण्यात सक्रिय सहभाग, स्फोटासाठी आरडीएक्स पुरवण्याचा आरोप. कटाच्या बैठकीत ‘सूड’ घेण्याची भूमिका मांडल्याचा, तसेच आर्थिक मदत केल्याचा आरोप.
बचाव : या संदर्भात माहिती गोळा करण्याचे आदेश मला देण्यात आले होते, हा सैन्यदलाच्या गुप्तचर विभागाच्या कामाचा भाग होता, आरडीएक्स पुरवण्यात कोणताही सहभाग नव्हता, असा दावा करण्यात आला.
खटल्यातील प्रगती : सर्वोच्च न्यायालयतकडून २०१७ मध्ये जामीन मिळाल्यावर पुन्हा सैन्यात दाखल.
अजय राहिरकर
पुण्यातील व्यवसायिक, अभिनव भारतचे कोषाध्यक्ष असल्याचा दावा.
आरोप : कटाच्या बैठकीत सहभागाचा आरोप, शस्त्रे खरेदीसाठी निधी उभारणी.
बचाव: आरोप निराधार असून आपण कोणतेही दहशतवादी कृत्य केले नसल्याचा दावा करण्यात आला होता न्यायालयाने २०११ मध्ये जामीन मंजूर केला.
सुधाकर चतुर्वेदी उर्फ चाणक्य
सैन्य गुप्तचर विभागाचा स्रोत, अभिनव भारतमध्ये कार्यरत आरोप.
आरोप : त्यांच्या घरातून आरडीएक्सचे अंश सापडले होते. तसेच स्फोटकांची ने-आण करण्यात सहभाग असल्याचा आरोप.
एनआयएचा दावा : एटीएसच्या अधिकाऱ्यांनी खोटे पुरावे उभे केले. त्यासाठी चतुर्वेदी यांच्या घरात आरडीएक्सचे नमुने स्वतः अधिकाऱ्यांनी ठेवल्याचे सांगितले. दोन लष्करी अधिकाऱ्यांनी एटीएस अधिकाऱ्यांना संशयास्पद कृती करताना पाहिल्याचा दावा केला होता. त्यासाठी त्यांचे जबाब नोंदवण्यात आले होते.
बचाव : सर्व पुरावे बनावट असल्याचा बचाव चतुर्वेदीच्या वतीने करण्यात आला होता. त्याच्याविरोधात साक्ष देणाऱ्या साक्षिदारांनीही प्रकरण एआयएकडे वर्ग झाल्यानंतर साक्ष फिरवली.
सुधाकर धर द्विवेदी उर्फ स्वामी अमृतानंद / दयानंद पांडे
कटातील बैठकांच्या ध्वनी व चित्रफीत आरोपीकडील लॅपटॉपमध्ये सापडल्याचा आरोप, नाशिकमध्ये ऑगस्ट २००७ मध्ये झालेल्या बैठकीमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या ध्वनीचित्रफीती दाखवण्यात आल्याचा आरोप.
आरोप: बैठकींमध्ये मुस्लिम धर्मियांचा सूड घेण्यासाठी बॉम्बस्फोट घडवून आण्याचा ठराव झाल्याचा आरोप, त्यासाठी २००७ व २००८ मधील बैठकांमध्ये हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराच्या ध्वनीचित्रफीत दाखवल्या.
बचाव : लॅपटॉपमधील डेटामध्ये छेडछाड झाली असू शकतो. गोळा करण्यात आलेले पुरावे नियामानुसार नव्हते. तसेच मृत्यू व जखमी स्फोटांमुळे झाले नसल्याचा दावा.
समीर कुलकर्णी
पुण्यातील समाजसेवक
आरोप : हिंदू राष्ट्र म्हणजे आर्याव्रत स्थापनेच्या कटात इतर आरोपींसह सहभाग. संदेश व दूरध्वनीद्वारे आरोपींच्या संपर्कात, स्फोटांसाठी रसायने उपलब्ध करून दिल्याचा आरोप.
बचाव : एटीएसने खोटे पुरावे सादर केले, यूएपीएअंतर्गत खटल्याची मंजुरी वैध नसल्याची बाजू मांडली.
तब्बल १७ वर्षानंतर सातही आरोपींची याप्रकरणातून निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
फरार आरोपी
रामचंद्र कलसांगरा उर्फ रामजी
प्रज्ञा ठाकूरच्या मोटरसायकलवर बॉम्ब ठेवून ती मालेगावात उभी केल्याचा आरोप.
संदीप डांगे
कटात सक्रिय सहभागही, दोघेही हिंदू संघटनांशी संबंधित असल्याचा एनआयएचा दावा.
दोघेही अजूनही फरार आहेत. त्यांच्यावर अन्य बॉम्बस्फोट खटलेही सुरू आहेत, त्यात समझौता एक्सप्रेस स्फोटांचा समावेश आहे.