scorecardresearch

Premium

विश्लेषण : ‘आयपीओं’साठी २०२३ साल बहारदार! पण…

जगभरात मंदीसदृश आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे. नजीकच्या काळातील आर्थिक आणि राजकीय जोखीम असूनही त्याकडे दुर्लक्ष करत देशातील प्राथमिक भांडवली बाजार मात्र तेजीची प्रचीती देत आहे.

2023 good year for IPO
विश्लेषण : ‘आयपीओं’साठी २०२३ साल बहारदार! पण… (image – reuters)

जगभरात मंदीसदृश आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे. नजीकच्या काळातील आर्थिक आणि राजकीय जोखीम असूनही त्याकडे दुर्लक्ष करत देशातील प्राथमिक भांडवली बाजार मात्र तेजीची प्रचीती देत आहे. बाजारातील उत्साही जोमाने सामान्य गुंतवणूकदारांमध्येही निश्चितच आनंदाचे वातावरण आहे.  काही नशीबवान गुंतवणूकदारांना अगदी दोन-चार दिवसांत दामदुप्पट वा अधिक लाभ दिसला असला तरी  या‘आयपीओ महासाथी’मध्ये गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगणे कसे आवश्यक आहे, त्याचा हा लेखाजोखा…

आव्हानात्मक वर्षात, अभूतपूर्व कामगिरीचे दर्शन कसे?

देशाबाहेरील अर्थ-राजकीय स्थितीबद्दल भीती बाळगावी अशी सध्या स्थिती आहे. रशिया-युक्रेन आणि त्यानंतर इस्राएल-हमास संघर्षाने अशांतता निर्माण केली आहे. तेलाच्या अस्थिर किमती, भू-राजकीय तणाव आणि जगभरातील अर्थव्यवस्था विकासवेगाच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी धडपडत आहेत. तर दुसरीकडे २०२४ मधील लोकसभेचा निवडणुकीच्या दिशेने देशात प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना आव्हान देणारी राजकीय समीकरणे घडताना, बिघडताना दिसत आहेत. अशा आव्हानात्मक काळात प्रारंभिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) भांडवली बाजारात प्रवेश करणाऱ्या कंपन्यांच्या जोरावर बाजाराने शिखर गाठले आहे. यावरून लक्षात येईल की भांडवली बाजारातील आयपीओचा ओघ किती राहिला असेल. वर्ष २०२१ ‘आयपीओ’साठी जसे बहारदार ठरले होते. त्याचीच पुनरावृत्ती विद्यमान वर्षातही सुरू आहे. ‘आयपीओ’तून चालू आर्थिक वर्षात ८०,००० कोटी रुपयांची निधी उभारणी अपेक्षित आहे. प्राथमिक बाजारातील तेजीने प्रमुख निर्देशांकांना नव्या उच्चांकी पातळीवर पोहोचवण्यास मदत केली आहे. विद्यमान वर्षातील सप्टेंबर महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टीने अनुक्रमे ६७,९२७.२३ आणि २०,२२२.४५ ही विक्रमी उच्चांकी पातळी गाठली. या वर्षाच्या सुरुवातीपासून ते नोव्हेंबर अखेरपर्यंत सेन्सेक्स ७ टक्क्यांनी वधारला आहे. तर व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘मिड’ आणि ‘स्मॉलकॅप’ निर्देशांकांनी या कालावधीत अनुक्रमे २५ टक्के आणि २८ टक्क्यांहून तेजी अनुभवली. पहिल्या सहा महिन्यांत भांडवली बाजारात ८० नवीन कंपन्यांचे आगमन झाले. तसेच सेबीकडे आणखी ४० हून अधिक कंपन्यांचे प्रस्ताव आले असून त्यातील १८ कंपन्यांना ‘आयपीओ’साठी परवानगी मिळाल्याचे ‘अर्न्स्ट अँड यंग’ने संकलित केलेली आकडेवारी सांगते.

mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
boat
पालघर: कृत्रिम भित्तिका समुद्रात सोडणारी बोट सातपाटीच्या खडकावर अडकली
Loksatta kutuhal State of Artificial Intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अवस्था
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: देशात बाजारविषयक शहाणीवेचा अभाव

हेही वाचा – सॅम माणेकशा पाकिस्तान लष्करात गेले असते तर? जिना यांचा प्रस्ताव त्यांनी का फेटाळला?

‘आयपीओं’ना दाद कशी? 

यंदाच्या आयपीओंचे वैशिष्टय म्हणजे एका कंपनीच्या समभाग खरेदीसाठी लाखो रांगेत उभे होते. चालू आठवड्यात प्राथमिक बाजाराला एकसाथ पाच कंपन्यांनी धडक दिली. केंद्राच्या मालकीच्या इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी अर्थात ‘इरेडा’सह, टाटा टेक्नॉलॉजीज, गांधार ऑइल रिफायनरी इंडिया, फ्लेअर रायटिंग इंडस्ट्रीज आणि फेडबँक फायनान्शियल या कंपन्यांची भागविक्री प्रक्रिया २१ ते २४ नोव्हेंबर दरम्यान पार पडली. एकाच समयी होत असलेल्या भागविक्रीमुळे गुंतवणूकदार विभागले जातील, त्यातही बहुप्रतीक्षित पहिल्या दोन कंपन्या सोडल्यास, इतरांना प्रतिसाद माफक राहील असे अंदाजले जात होते. प्रत्यक्षात पाचही कंपन्यांच्या समभागांसाठी बोली लावणाऱ्या अर्जांचा पाऊस पडला. या माध्यमातून पाच कंपन्यांकडून एकत्रित सुमारे ७,३०० कोटी उभारले जाणार होते, प्रत्यक्षात त्यापेक्षा किती तरी अधिक २,४१,५४७ कोटी रुपयांच्या बोली गुंतवणूकदारांनी लावल्या. टाटा टेक्नॉलॉजीजच्या ३,०३४ कोटी रुपयांच्या आयपीओसाठी ७३.५८ लाख अर्जांचा पाऊस पडला. या अर्जाच्या विक्रमी संख्येने भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीच्या २१,००० कोटींच्या आयपीओसाठी करण्यात आलेल्या अर्ज संख्येचा विक्रमही मोडीत काढला. 

यंदा ‘आयपीओं’मधून परतावा किती? 

मुख्य बाजार मंचावर २०२३ मध्ये सूचिबद्ध झालेल्या किमान ४३ कंपन्यांनी प्राथमिक बाजारातून ३३,५०० कोटी रुपयांची उभारणी केली. त्यापैकी बहुतांश कंपन्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. यामध्ये टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओने कळस चढवला आहे. पदार्पणातच त्याने गुंतवणूकदारांना तिप्पट परतावा दाखवला आहे. आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना ५०० रुपयांना देण्यात आलेला समभाग पदार्पणाच्या दिनी १,४०० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर झेपावला. त्यापाठोपाठ ‘इरेडा’सह, गांधार ऑइल रिफायनरी इंडियानेदेखील बहूप्रसवा परतावा दिला. मुख्य बाजार मंचाबरोबर विद्यमान २०२३ मध्ये एसएमई आयपीओची लोकप्रियता इतकी वाढली की, त्यांनी सरासरी ६७ पट अधिक प्रतिसाद अनुभवला आहे. त्यांच्यापैकी काहींना तर ७१३ पट प्रतिसाद मिळाला आहे. २०२३ मध्ये सूचिबद्ध झालेल्या १०७ एसएमई कंपन्यांच्या समभागांनी आतापर्यंत सरासरी ७७ टक्के परतावा दिल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. तर काही समभागांनी केवळ ४ ते ५ महिन्यांत चारपट परतावा मिळवून दिला आहे. बीएसई एसएमई आयपीओ निर्देशांक हा ६० पेक्षा अधिक एसएमई समभागांचा एक प्रातिनिधिक निर्देशांक आहे. ज्याने गेल्या १० वर्षांत तब्बल १०,३५० टक्के परतावा दिला आहे, शिवाय तो ५९ टक्के या चक्रवाढ वार्षिक वाढ दराने वाढला आहे. याचा अर्थ सप्टेंबर २०१३ मध्ये गुंतवलेले फक्त १,००० रुपये आज २०२३ मध्ये १.०३ लाख रुपये झाले असते. या अशा अद्भुत तेजीने बाजार मंच आणि सेबीची चिंता मात्र वाढवली आहे.

हेही वाचा – विश्लेषण : अखेर पाकिस्तानचा भारतावर विजय… पण ‘युनेस्को’त! काय होता ‘सामना’?

‘दस का बीस’ टोळ्यांवर ‘सेबी’चा चाप कसा? 

भांडवली बाजारातील ‘दस का बीस’ टोळ्यांवर म्हणजेच सूक्ष्म, लघू आणि मध्यम श्रेणीतील अर्थात एसएमई कंपन्यांवर बोली लावून अगदी अल्प कालावधीत पैसे दुप्पट किंवा कैकपट करून पाहणाऱ्या टोळ्यांबाबत भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने चिंता व्यक्त केली. सूक्ष्म, लघू आणि मध्यम श्रेणीतील अर्थात एसएमई कंपन्यांचे प्रमाण आणि त्यातून गुंतवणूकदारही भरभरून लाभ कमावत असल्याचे चित्र आहे. तथापि परताव्याचे लक्षणीय प्रमाण पाहता, सावधगिरी म्हणून बाजार नियामक ‘सेबी’ तसेच बाजार मंचांनीही सूचिबद्ध एसएमई कंपन्यांना अल्प-मुदतीच्या अतिरिक्त पाळत उपायाअंतर्गत (एएसएम) आणि ट्रेड फॉर ट्रेड (टीएफटी) उपायाअंतर्गत आणण्याचा निर्णय घेतला आहे. आजवर हे उपाय केवळ मुख्य बाजारमंचावर सूचिबद्ध कंपन्यांपुरते सीमित होते. ‘एएसएम’ निर्देशांअंतर्गत अल्पावधीसाठी अतिरिक्त पाळत निर्णय हा समभागांतील वध-घट, त्यातील गुंतवणूकदारांचे केंद्रीकरण, तळाच्या आणि वरच्या किंमत मर्यादेपर्यंत समभाग घरंगळण्याचे प्रमाण, नजीकच्या बंद भावांमधील मोठी तफावत अशा निकषांवर घेतला जातो. सध्याच्या एसएमई कंपन्यांच्या समभागांमध्ये काही गुंतवणूकदारांकडून संशयास्पद व्यवहार, किमतींमध्ये फेरफार आणि उन्माद लक्षात घेता असा निर्णय घेतला जाणे आधीपासून अपेक्षित होते.

gaurav.muthe@expressindia.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 2023 is a good year for ipo but investors should be careful print exp ssb

First published on: 02-12-2023 at 08:56 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×