China Demolished 300 Buddhist Stupas: एखाद्या प्रांतावर संपूर्ण नियंत्रण निर्माण करावयाचे असल्यास त्या प्रांतातील संस्कृती पूर्णतः स्वीकारावी लागते किंवा त्या संपूर्ण संस्कृतीचा मुळासकट नाश करावा लागतो. यातील दुसऱ्या तत्त्वाचे पालन जगभरातील विस्तारवादी सत्ता करत असल्याचे दिसते. या विस्तारवादी देशांच्या यादीत चीन अग्रेसर आहे. चीनने आपल्या देशाच्या सीमा विस्तारत असताना सीमेवरच्या संस्कृतींना मुळासकट नष्ट केलं. त्यासाठी रीतसर शासकीय उपक्रम राबवला.
तिबेटी असो वा उइघर यांची मूळची सांस्कृतिक ओळख पुसून टाकण्यासाठी सिनिफिकेशन मोहीम चीनने राबवली. ही मोहीम वास्तविक उइघर मुस्लिमांसाठी राबवण्यात आली होती. परंतु, आता तिबेट हा चीनच्या संस्कृतीचा भाग आहे किंवा तिबेटमध्ये चीनची संस्कृती आहे, हे दर्शवण्यासाठी चीनकडून तिबेटच्या बाबतीत तिथली मूळ संस्कृती उध्वस्त करण्याचा कार्यक्रम राबवण्यास पुन्हा एकदा जोरदार सुरुवात झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या महिन्यात तिबेटमधले सुमारे ३०० बौद्ध स्तूप तोडण्यात आले. इतकंच नाही तर मागे त्यांचे कोणतेही पुरावे शिल्लक राहू नयेत यासाठी शिल्लक राहिलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांचीही विल्हेवाट लावण्यात आली आहे.
दलाई लामांच्या ९० व्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर

चीनने मे- जून २०२५ या कालखंडात तिबेटच्या खाम प्रांतातील करझे (गांझी) तिबेट स्वायत्त प्रिफेक्चरमधील द्राकगो काउंटीमध्ये ३०० हून अधिक बौद्ध स्तूप आणि काही बौद्ध धर्मगुरुंच्या मूर्तीही जमीनदोस्त केल्या. ही घटना लुंग्राब झांग-री येथे जांगगांग मठाजवळ घडली. येथे असलेले तिबेटी बौद्ध धर्माशी संबंधित शेकडो स्तूप जमीनदोस्त केले. सेर्थार बौद्ध संस्थेचे संस्थापक, दिवंगत खेनपो जिगमे फुंत्सोक यांची मूर्ती आणि तिबेटी भाषेत गुरू रिनपोछे म्हणून ओळखल्या जाणारे गुरू पद्मसंभव यांच्या मूर्तीही उद्ध्वस्त केल्या. त्यामुळे स्थानिक तिबेटी समुदायाला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. विशेष म्हणजे तिबेटी धर्मगुरू दलाई लामांच्या ९० व्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर चीनने हे नियोजनपूर्वक घडवून आणले.

“बाहेर माहिती सांगाल, तर लक्षात ठेवा”

या सर्व तोडफोडीनंतर चिनी अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे. इतकंच नाही या प्रकारची माहिती बाहेर गेल्यास कायद्याअंतर्गत तत्काळ अटक करण्याचीही धमकीही स्थानिकांना दिली आहे. ज्या भागात ही नासधूस करण्यात आली आहे. तो संपूर्ण परिसर सीलबंद करण्यात आला आहे. कुणालाही येथे येण्या- जाण्याची परवानगी नाही. चिनी अधिकाऱ्यांकडून याठिकाणी बेकायदेशीर बांधकाम सुरू असल्याचं सांगण्यात आलं.

सांस्कृतिक ओळख नष्ट करण्याचा डाव

तिबेटमधील मूळ संस्कृतीचे सिनिसायझेशन करून सांस्कृतिक ओळख पुसण्याचा चीनचा डाव आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या अजेंड्यानुसार हे घडत असल्याचा आरोप तिबेटी बौद्ध धर्माच्या अनुयायांकडून करण्यात येत आहे. १ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय धार्मिक व्यवहार ब्युरोकडून घोषित केलेल्या अधिसूचना क्रमांक २२ नुसार, १ जानेवारी २०२५ पासून सर्व मठांवर कठोर सरकारी नियंत्रण असणे बंधनकारक करण्यात आले आहे, त्यासाठी मठ व्यवस्थापन नियमांच्या कलम ४३ ची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

तिबेटी धार्मिक गुरु नाहीसे होत आहेत

चीनकडून आपल्या ध्येयपूर्तीसाठी टोकाची पावले उचलण्यात येत आहे. चीनच्या पुनर्शिक्षण मोहिमेला जे बौद्ध धर्मगुरु विरोध करत आहेत, त्यांना अटक करण्यात येते. अनेकदा खोट्या आरोपांखाली अडकवण्यात येते आणि त्यांना सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागतो. काही प्रकरणांमध्ये बेपत्ता होणे किंवा त्यांची हत्या होणे, अशाही गोष्टी घडतात. तुल्कु हुंगकर दोर्जे यांचा मृत्यू अशाच प्रकरणांची साक्ष आहे. त्यांच्यावर चीनकडून बसवलेल्या पंचेन लामाचे यजमानत्व नाकारण्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच दलाई लामांसाठी दीर्घायुषी प्रार्थना लिहिणे आणि गोलोग, आमदो येथे शिक्षण क्षेत्रात चिनी धोरणांना विरोध केल्याचे खोटे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले. त्यामुळे काही काळ त्यांना व्हिएतनाममध्ये आश्रय घ्यावा लागला. परंतु २८ मार्च रोजी ते चिनी पोलिसांच्या ताब्यात मृतावस्थेत सापडले. या गुप्त कारवाईत व्हिएतनामी अधिकाऱ्यांचाही सहभाग होता. पारदर्शकतेसाठी आंतरराष्ट्रीय मागण्यांकडे दुर्लक्ष करून दोन्ही सरकारांनी माहिती लपवली आणि गोपनीयपणे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

भीती आणि नैराश्याचे वातावरण

नवीन नियमांनुसार कोणत्याही तिबेटी लामांना, धार्मिक नेत्यांना किंवा तुल्कूंना स्वतंत्र धार्मिक क्रिया करण्याची परवानगी नाही. काही नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. या दडपशाहीमुळे तिबेटी बौद्ध समाजात भीती आणि नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

द्राकगो काउंटीच्या पलीकडेही निर्बंध

जूनमध्ये करझे भागात या विध्वंसाशी संबंधित कडक निर्बंध लादण्यात आले. जुलै महिन्यात जगभरात दलाई लामांच्या ९० व्या वाढदिवसाच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिनी अधिकाऱ्यांनी करझे आणि आसपासच्या भागात २३ जुलै २०२५ पर्यंत सर्व सार्वजनिक जमावांवर बंदी घातली होती.

प्रतिबंधात्मक आदेश

जांगगांग मठाचे खेनपो तेनगा यांनी लुंग्राब झांग-री येथे स्तूप आणि मूर्ती बांधकामात सहभाग घेतला होता. त्यांच्यावरही निर्बंध घालण्यात आले आहे. त्यांना त्यांच्या भक्तांनाही भेटण्यास परवानगी नाही. तिबेटच्या आमदो प्रदेशातील मठांना दलाई लामांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आसपासच्या काळात पाचपेक्षा अधिक भिक्षूंना एकत्र प्रवास करण्यास मज्जाव करण्यात आला होता.

विध्वंसाची पुनरावृत्ती

२०२१ साली नोव्हेंबर महिन्यात द्राकगो काउंटी पक्ष सचिव वांग डोंगशिन यांच्या आदेशानुसार प्रशासनाने द्राकगो गदेन नामग्याल लिंग मठातील शाळा बंद केली. त्यानंतर १२ डिसेंबर रोजी मठाजवळील दोन मोठ्या मूर्ती पाडल्या आणि ४५ मणी चक्र (प्रार्थना चक्र) नष्ट करण्यात आली. जांगगांगच्या लुंग्राब झांग-री येथे झालेला अलीकडचा विध्वंस हा चीनच्या तिबेटी बौद्ध धर्माविरुद्धच्या युद्धातील एक मोठा टप्पा आहे. यात शेकडो स्तूप आणि पवित्र मूर्ती एका प्रचंड कारवाईत जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.

माहिती दडपशाही कायम

चिनी अधिकाऱ्यांनी सर्व प्रकारच्या दूरसंवाद सेवा बंद ठेवल्याने (कम्युनिकेशन ब्लॅकआउट) वस्तुस्थितीबाबत सविस्तर माहिती मिळवणे अत्यंत कठीण झाले आहे. तिबेटमधील सांस्कृतिक विध्वंसाचे साक्षीदार असलेल्या लोकांना गप्प करण्यासाठी चीनने राबवलेल्या योजनाबद्ध मोहिमेचेच हे निदर्शक असल्याचे तिबेटी जनतेला वाटते आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही घडामोड चीनच्या तिबेटी धार्मिक आणि सांस्कृतिक परिचयावर दशकांपासून सुरू असलेल्या हल्ल्याच्या आणखी एका अध्यायाचे प्रतिनिधित्व करते. कारण बीजिंग तिबेटच्या आध्यात्मिक वारशाचे संपूर्ण उच्चाटन करण्याच्या दिशेने न थांबता मोहीम राबवत आहे.