चीन-पाकिस्तान असे दुहेरी धोके आणि वाढती प्रादेशिक आव्हाने या विरोधात विश्वासार्ह प्ररोधनासाठी (डिटरन्स) भारतीय हवाई दलाने पुढील दशकभरात तब्बल ३५० हून अधिक प्रगत लढाऊ विमाने ताफ्यात समाविष्ट करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. लढाऊ विमानांचा असमतोल दूर करून हवाई शक्ती कायम राखण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.
सुधारणांची निकड 
चीन-पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी लढण्यासाठी भारतीय हवाई दलाकडे लढाऊ विमानांच्या ४२ तुकड्यांची (स्क्वाड्रन्स) आवश्यकता आहे. या तुकड्या मंजूर असल्या तरी दलात सध्या केवळ ३१ तुकड्या आहेत. स्क्वाड्रन अर्थात एका तुकडीत १८ विमाने असतात. म्हणजे लढाऊ विमानांची निकड आणि प्रत्यक्ष उपलब्धता यामध्ये ११ तुकड्यांची कमतरता आहे. त्यातही पुढील काळात मिग – २९, जॅग्वार आणि मिराज – २००० ही विमाने निवृत्तीच्या वाटेवर येतील.
संरक्षण सिद्धता मजबूत करण्यासाठी

भारतीय हवाई दल लढाऊ विमानांच्या कमतरतेला तोंड देत आहे. मध्यंतरी संसदीय संरक्षणविषयक स्थायी समितीने यावर बोट ठेवून, पुढील दशकभरात ती दूर होण्याऐवजी वाढण्याची चिंता वर्तविली होती. लढाऊ विमानांचा असमतोल दूर करून संरक्षण सिद्धता मजबूत करण्यासाठी व्यापक बदल अनिवार्य ठरले. या पार्श्वभूमीवर, आराखड्यात त्यांच्यासह १५० लढाऊ विमानांचा ताफा टप्प्याटप्प्याने बदलण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. पुढील १० वर्षात तेजस – एमके २, प्रगत मध्यम लढाऊ विमान (एएमसीए) आणि नवीन बहुद्देशीय लढाऊ विमान (एमआरएफए) यासह स्वदेशी आणि परदेशी बनावटीची विमाने समाविष्ट केली जातील. हवाई दलाचे सामर्थ्य वाढविण्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या पाठबळावर सुधारणांना आकार दिला जात आहे.

स्वावलंबनावर भर

या प्रक्रियेत आत्मनिर्भर भारत उपक्रमावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ही योजना उत्कृष्ट कार्यात्मक सज्जतेसह भविष्यकालीन व स्वावलंबी लढाऊ विमानांचा ताफा तयार करण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही आघाड्यांवर परिस्थितीचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी सध्याची क्षमता लढाऊ विमानांच्या मंजूर ४२ तुकड्यांच्या ताकदीपेक्षा खूपच कमी आहे. भारतीय हवाई दलाच्या भविष्यातील पायाभूत सुविधा म्हणजे त्याची मुख्यत्वे स्वदेशी विमाने असतील. या योजनेत १२० तेजस एमके – २ लढाऊ विमानांचा समावेश आहे. हे ४.५ पिढीचे विमान तेजसची सुधारित आवृत्ती आहे. आधुनिक रडार यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्रासाठी उपकरणे सामावणाऱ्या तेजसची साडेसहा टन शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे. दीर्घकालीन दृष्टिकोनातून स्वत:च्या पाचव्या पिढीच्या स्टेल्थ प्रगत मध्यम लढाऊ विमान अर्थात एएमसीए निर्मितीवर लक्ष केंद्रित केले आहे. सरकारने अलीकडेच एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए) आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) ‘एएमसीए’चा नमुना तयार करण्यासाठी जवळपास १५ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. २०३५ नंतर किमान १६० ‘एएमसीेए’ समाविष्ट करण्याची हवाई दलाची योजना आहे. पहिल्या नमुन्याचे उड्डाण २०२८ पर्यंत अपेक्षित आहे. या विमानात प्रगत स्टेल्थ वैशिष्ट्ये, संयुक्त लढाऊ प्रणाली असतील. 

परदेशी विमानांची निकड 

स्वदेशीला प्राधान्य देताना लढाऊ सज्जता कायम राखण्यासाठी काही विमाने परदेशातून खरेदी करण्याचे नियोजन आहे. यातील एक म्हणजे ११० बहुद्देशीय मध्यम लढाऊ विमानांची खरेदी औपचारिक मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. यासाठी फ्रेंच बनावटीचे राफेल आघाडीवर असल्याचे मानले जाते. यापूर्वी हवाई दलाच्या ताफ्यात राफेल समाविष्ट झालेले आहे. त्याची उच्च कार्यक्षमता ज्ञात आहे. स्वदेशी एएमसीए कार्यरत होईपर्यंत दलाने पाचव्या पिढीतील ६० लढाऊ विमाने खरेदीचा प्रस्ताव ठेवला आहे. यात अमेरिकन लॉकहीड मार्टिनचे ‘एफ – ३५ लाइटनिंग २’ प्रमुख दावेदार असल्याचे सांगितले जाते. तर रशियाने एसयू – ५७ ई पाचव्या पिढीतील स्टेल्थ लढाऊ विमान आणि एसयू – ३५ एम (बहुद्देशीय हवाई प्रभुत्व राखणारे) ही विमाने देण्याचा नवीन प्रस्ताव दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे रशियाच्या एसयू – ५७ ईसाठी संपूर्ण तंत्रज्ञान हस्तांतरण समाविष्ट आहे. या कराराला अंतिम स्वरुप मिळाल्यास त्याची बांधणी एचएएलच्या नाशिक प्रकल्पात केली जाईल. या ठिकाणी पूर्वी एसयू – ३० एमकेआयची बांधणी झालेली आहे. सरकार तंत्रज्ञान हस्तांतरण, स्थानिक पातळीवर उत्पादन आणि स्वदेशी क्षमता विकास यावर भर देणाऱ्या संरक्षण सामग्री खरेदीला प्राधान्य देत आहे. त्यामुळे या स्पर्धेत अमेरिकेपेक्षा रशियन प्रगत विमानांवर विचार होऊ शकतो. २०३५ पर्यंत ही प्रगत विमाने निवृत्त होणाऱ्या विमानांची जागा घेतील आणि भारतीय हवाई दलास अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करतील.

देशांतर्गत संरक्षण सज्जतेचे नियोजन

लढाऊ विमानांचा समतोल राखण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. यापूर्वी मागणी नोंदविलेली तेजस – एमके १ ए, त्यानंतर तेजस – एमके २ आणि ‘एमआरएफए’ यांच्या समावेशाने लढाऊ विमानांची कार्यात्मक उपलब्धता वाढेल. १२० तेजस – एमके २, ११० बहुद्देशीय मध्यम लढाऊ विमाने (एमआरएफए), १६० प्रगत मध्यम लढाऊ विमाने (एएमसीए) या माध्यमातून १० वर्षात जवळपास ३५० लढाऊ विमाने दलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्याचे नियोजन आहे. तेजस आणि एएमसीए प्रकल्पात अधिक्याने स्वदेशी सामग्री असल्याने देखभाल दुरुस्तीचा कालावधी कमी होऊन देशांतर्गत संरक्षण, औद्योगिक पाया अधिक मजबूत होईल.