Harappan Remains Found in Rajasthan’s Jaisalmer: पुरातत्त्व क्षेत्रातील एका महत्त्वपूर्ण शोधात, ४५०० वर्षांपूर्वीच्या हडप्पा (सिंधू संस्कृती) संस्कृतीचे अवशेष राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात पाकिस्तान सीमेजवळ सापडले आहेत. हे स्थळ रटाडिया री डेरी येथे आहे. ते रामगढ तहसीलपासून सुमारे ६० किलोमीटर आणि सीमा गाव सडेवाला यांच्या वायव्य दिशेला १७ किलोमीटर अंतरावर आहे. हा शोध राजस्थान विद्यापीठातील इतिहास आणि भारतीय संस्कृती विभागातील संशोधक दिलीप कुमार सैनी, जैसलमेरचे इतिहासकार पार्थ जगानी, उदयपूर येथील राजस्थान विद्यापीठाचे प्राध्यापक जीवनसिंह खारकवाल, डॉ. तामेघ पंवार आणि डॉ. रवींद्र देवडा यांच्या संयुक्त प्रयत्नातून लागला. या कार्यात स्थानिक योगदानकर्ते रामगढचे छतरसिंह जम आणि प्रदीप कुमार गर्ग यांनीही मदत केली आहे.

या स्थळाचे महत्त्व काय?

थर वाळवंटाच्या प्रदेशात हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडल्याची ही पहिली नोंद असून यामुळे या संस्कृतीचा भौगोलिक विस्तार लक्षणीय प्रमाणात होता हे स्पष्ट होते. संशोधन पथकाने या स्थळाच्या शोधावर शिक्कामोर्तब करून त्या संबंधीचा शोधनिबंध इंडियन जर्नल ऑफ सायन्सला पाठवला आहे. या ठिकाणी सापडलेल्या अवशेषांवरून येथे विकसित, नागरी हडप्पा वस्ती होती असे स्पष्ट होते.

स्थळावर सापडलेले महत्त्वाचे पुरावशेष

  • लाल आणि गव्हाच्या रंगाची मातीची भांडी या स्थळावर सापडली आहेत. त्यात वाट्या, घडे, कप आणि छिद्रयुक्त भांडी आहेत.
  • या स्थळावर भूमितीय आकृत्या असलेली हाताने तयार केलेली मातीची भांडी सापडली आहेत.
  • चर्ट दगडापासून तयार केलेल्या ८–१० सेंमी लांबीच्या पाती सापडल्या आहेत. या दगडाचा मूळ स्त्रोत आजच्या पाकिस्तानातील रोहरी परिसर असावा असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
  • माती आणि शंखापासून तयार केलेल्या बांगड्या सापडल्या आहेत.
  • त्रिकोणी, गोलाकार आणि इडलीसारख्या आकाराचे टेराकोटा केक या स्थळावर सापडले आहेत.
  • दळण्यासाठी वापरले जाणारे दगडी जाते सापडले आहेत.
  • वेज-आकाराच्या विटा, ज्या गोलाकार रचना किंवा भट्टीसाठी वापरल्या गेल्याचे संकेत देतात.
  • हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये दर्शवणार्‍या विटा सापडल्या आहेत.
  • मध्यवर्ती स्तंभ असलेली भट्टीसारखी रचना ही गुजरातमधील कण्मेर आणि पाकिस्तानातील मोहेंजोदडो येथे सापडलेल्या रचनांसारखी आहे
  • प्राचीन भिंतींचे अवशेष, हे अवशेष सुनियोजित बांधकामाचा पुरावा देतात.

अभ्यासकांचे मत काय आहे? (Significance of Harappan Civilization Remains in Rajasthan)

“हा शोध राजस्थानच्या वाळवंटी भागातील पुरातत्त्वशास्त्राच्या इतिहासातील हा एक महत्त्वपूर्ण शोध आहे,” असे संशोधक दिलीप कुमार सैनी यांनी सांगितले. अशा दुर्गम आणि वालुकामय प्रदेशात हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडणे म्हणजे थर वाळवंटातील कठोर परिस्थितीत टिकून राहिलेल्या अज्ञात वसाहतीचा पुरावा आहे.”

इतिहासकार पार्थ जगानी यांनी या स्थळाच्या धोरणात्मक आणि सांस्कृतिक महत्त्वावर भर देत सांगितले की, “उत्तर राजस्थान आणि गुजरातदरम्यानच्या वाळवंटी प्रदेशात सापडलेली ही पहिली हडप्पा नागरी वसाहत आहे. पाकिस्तान सीमेच्या जवळ असल्यामुळे आणखी ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.”

या स्थळाचे शैक्षणिक महत्त्व लक्षात आले तेव्हा, स्थानिक शिक्षक प्रदीप कुमार गर्ग यांनी ‘सेव्ह अवर हेरिटेज फाउंडेशन’ला या याबद्दल माहिती दिली. त्यानंतर, जून महिन्यात हिमाचल प्रदेशमधील इतिहास विषयाचे सहायक प्राध्यापक आणि An Introduction to Archaeology या पुस्तकाचे लेखक डॉ. पंकज चंदक आणि अरावली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णपाल सिंह यांनी या स्थळाला भेट देऊन त्याचे महत्त्व अधिक अधोरेखित केले.

डॉ. चंदक आणि डॉ. सिंह यांनी लाल आणि गव्हाच्या रंगाची हाताने तयार केलेली मातीची भांडी, चर्ट दगडापासून तयार केलेल्या सुऱ्या आणि प्राचीन भिंतीच्या अवशेषांची नोंद केली आहे. अनेक अवशेषांवरील भूमितीय आकृत्या सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत समाजाच्या सूचक आहेत. अभ्यासकांचा अंदाज आहे की, ही प्राचीन वसाहत अंदाजे ५० बाय ५० मीटर क्षेत्रात पसरलेली होती आणि ती आता लुप्त झालेल्या सरस्वती नदीच्या मुखाशी असावी.

हे नव्याने सापडलेले स्थळ भारतातील सर्वात कोरड्या आणि दुर्गम भागावर सापडलेल्या हडप्पा संस्कृतीच्या नागरी आणि सांस्कृतिक जीवनाची माहिती देते. पुढील उत्खनन आणि संशोधनामुळे जगातील सर्वात प्राचीन नागरी संस्कृतींपैकी एकाच्या विस्तार आणि परिस्थितीनुसार केलेल्या जुळवणुकीबाबत मौल्यवान माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.

थर वाळवंटात सापडलेले हे हडप्पा संस्कृतीचे अवशेष केवळ भूतकाळाचा आरसा नाही, तर भारताच्या प्राचीन नागरीकरणाच्या अद्याप न उलगडलेल्या कहाण्यांचा ठेवा आहेत. या शोधामुळे हडप्पा संस्कृतीचा भौगोलिक विस्तार आणि त्या काळातील मानवी समाजाचे निसर्गाशी जुळवून घेणे, तंत्रज्ञान, व्यापारसंबंध आणि सांस्कृतिक प्रगती याबाबत नवे दालन खुले झाले आहे. आगामी उत्खननातून मिळणाऱ्या माहितीद्वारे, जगातील सर्वात प्राचीन नागरी संस्कृतींपैकी एक असलेल्या सिंधू संस्कृतीच्या उत्क्रांतीचा इतिहास अधिक स्पष्टपणे समजेल.