India surgical strike 2016: १८ सप्टेंबर २०१६ रोजी उरी येथे भारताच्या लष्करी तळावर झालेला हल्ला हा भारताच्या आधुनिक इतिहासातील आजवरचा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला मानला जातो. त्या दिवशी पहाटेच्या वेळेत झालेल्या या हल्ल्यात जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (LoC) असलेल्या भारतीय लष्कराच्या ब्रिगेड मुख्यालयाला दहशतवाद्यांकडून लक्ष्य करण्यात आले. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात १९ भारतीय जवान शहीद झाले आणि ३० हून अधिक जखमी झाले होते. या घटनेस आज नऊ वर्षे उलटली. या घटनेतील पाकिस्तानचा सहभाग, भारताने धाडसी निर्णय घेत केलेला सर्जिकल स्ट्राईक , या घटनेचे महत्त्व, त्याचे पडसाद आणि नंतर बदललेला इतिहास जाणून घेऊ.
पहाटे साधारण ५.३० वाजता, बहुतांश जवान झोपेत असताना किंवा त्यांच्या दैनंदिन कामकाजाला सुरुवात होत असतानाच, पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी (JeM) संबंधित चार दहशतवाद्यांनी छावणीत घुसखोरी केली. अचानक हल्ल्या करत त्यांनी ग्रेनेडचा वापर करून तंबू आणि इंधन साठवणुकीच्या ठिकाणी आग लावली. त्यामुळे झालेल्या भीषण स्फोटांमुळे आणि आगीमुळे अनेक जवान आतच अडकले.
उरीचं महत्त्व
हल्लेखोर आणि लष्कर यांमध्ये झालेल्या तीन तासांच्या चकमकीत त्या दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. वेळ आणि ठिकाण यांची निवड ही पूर्णपणे विचारपूर्वक केलेली होती. नियंत्रण रेषेजवळ (LoC) असलेलं उरी हे ठिकाण ऐतिहासिकदृष्ट्या नेहमीच संवेदनशील मानलं जातं. घुसखोरीविरोधी कारवायांसाठी उरी हा भारतीय लष्कराचा एक महत्त्वाचा धोरणात्मक तळ आहे.
१९ जवान शहीद
भारतीय लष्कराला या हल्ल्याचा बसलेला फटका अतिशय भीषण होता. १९ जवान शहीद झाले, त्यापैकी बहुतेक जवान हे डोग्रा रेजिमेंट आणि बिहार रेजिमेंटचे होते. बॉम्बहल्ल्यामुळे लागलेल्या सुरुवातीच्या आगीत अनेक सैनिक होरपळून मृत्युमुखी पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित करताना या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आणि गुन्हेगारांना शिक्षा होणारच, असा निर्धार व्यक्त केला. त्यावेळचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंह सुहाग यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

पाकिस्तानचा सहभाग
उरी हल्ल्याने भारताला अतिशय वेदनादायक धक्का दिला होता. हा हल्ला काश्मीरमधील दीर्घकाळ अस्थिर वातावरणाच्या पार्श्वभूमीवर झाला होता. २०१६ साली हिझबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी ठार झाल्यानंतर काश्मीरमध्ये अस्थिरता आणि तणाव वाढला होता. हल्ल्यानंतर काही दिवसांत तपास यंत्रणेला पाकिस्तानी ओळख दर्शवणारी शस्त्रास्त्रे आणि उपकरणे घटनास्थळावरून मिळाली. दहशतवाद्यांकडे सापडलेल्या जीपीएस उपकरणांच्या मदतीने त्यांनी नियंत्रण रेषा (LoC) ओलांडून भारतात प्रवेश केल्याचा पुरावा मिळाला. यामुळे भारताचा हा दावा अधिक बळकट झाला की, हा हल्ला पाकिस्तानमधून करण्यात आला होता आणि तो पाक-पुरस्कृतच होता.
भारताची भूमिका
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी स्वीकारली आणि दहशतवादाला पाकिस्तान प्रोत्साहन देत असल्याचे पुरावे आंतरराष्ट्रीय समुदायाबरोबर शेअर केले. नवी दिल्लीने यानंतर कूटनीतिच्या पातळीवरही आक्रमक भूमिका घेतली. भारतीय अधिकाऱ्यांनी संयुक्त राष्ट्रांसह प्रमुख जागतिक शक्तींना आणि आंतरराष्ट्रीय संघटनांना माहिती दिली आणि या दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार ठरविण्याची गरज अधोरेखित केली.
सर्जिकल स्ट्राईक्स
या हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान संबंध आणखीनच चिघळले. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तय्यबा सारख्या दहशतवादी संघटनांना पाकिस्तानने सुरक्षित आसरा पुरवल्याचा थेट आरोप भारताने केला. २९ सप्टेंबर रोजी, म्हणजेच घटनेनंतर अवघ्या दोन आठवड्यांच्या आत, भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक्स केले. यातून राष्ट्रीय सुरक्षेबाबत अधिक सक्रीय आणि ठाम भूमिका घेण्याचा भारताचा संदेश जगभर पोहोचला.
ही कारवाई अत्यंत काटेकोर नियोजनाखाली पार पाडली गेली आणि भारतीय लष्कराच्या पॅरा स्पेशल फोर्सेसमधील निवडक कमांडोंनी ती अंमलात आणली. भारतीय लष्कराच्या अधिकृत निवेदनांनुसार, अनेक दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले आणि मोठ्या संख्येने दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. ही संपूर्ण कारवाई पंतप्रधान मोदी आणि सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या थेट देखरेखीखाली झाली. सर्जिकल स्ट्राईक्सनी भारताच्या पारंपरिक संयमी प्रतिसादाच्या धोरणापासून स्पष्टपणे वेगळा मार्ग अधोरेखित केला. पूर्वी अशा घटनांवर भारताची प्रतिक्रिया प्रामुख्याने राजनैतिक निषेध नोंदवणे किंवा मर्यादित लष्करी कारवाई एवढ्या पुरतीच मर्यादित असायची. मात्र या सर्जिल स्ट्राइक्सने बदललेल्या भूमिकेचा वेगळा संदेश दिला.
जागतिक पातळीवर पडसाद
अनेक देशांनी भारताशी सहमती व्यक्त करत दहशतवादाचा निषेध केला, परंतु सर्जिकल स्ट्राईक्सबाबतची त्यांची प्रतिक्रिया तुलनेने मवाळ होती. अमेरिका आणि युरोपियन युनियनने संयम पाळण्याचे आवाहन केले आणि दोन अण्वस्त्रसज्ज शेजाऱ्यांमध्ये तणाव वाढू नये, यावर भर दिला. दुसरीकडे पाकिस्तानने अशा कोणत्याही प्रकारचे सर्जिकल स्ट्राईक्स झाल्याचे नाकारले आणि भारताचे दावे खोटे असल्याचे सांगितले.
पाकिस्तानातील सार्क परिषद रद्द
उरी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यामधील द्विपक्षीय संबंध झपाट्याने खालावले. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटे पाडण्यासाठी अधिक आक्रमक प्रयत्न भारताने सुरू केले आणि पाकिस्तानच्या भूमीवर कार्यरत दहशतवादी संघटनांवर निर्बंध आणण्याची मागणी केली. त्या वर्षाअखेरीस इस्लामाबादमध्ये सार्क परिषद होणार होती. मात्र वरही या हल्ल्याचा परिणाम झाला. भारताने या परिषदेवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आणि त्यानंतर काही इतर सदस्य राष्ट्रांनीही त्याला पाठिंबा दिला. परिणामी, परिषद रद्द करण्यात आली.
भारत-पाकिस्तान संबंध
भारत-पाकिस्तानमधील व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीवरही या घटनेचा परिणाम झाला. भारतीय मनोरंजन उद्योगाने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली. भारतीय लष्कराने सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधांचा आढावा घेतला आणि कायमस्वरूपी, अग्निरोधक निवासस्थाने तसेच अत्याधुनिक पाळत ठेवणारी साधने यांची गरज अधोरेखित केली. याशिवाय, विविध गुप्तचर यंत्रणांमधील समन्वय आणि माहितीची देवाणघेवाण अधिक बळकट करण्यात आली. घुसखोरीला रोखण्यासाठी सरकारने सीमेवर कुंपण, नाईट व्हिजन उपकरणे आणि इतर आधुनिक साधनांसाठी अधिक निधी मंजूर केला.
…नंतर बालाकोट!
आज नऊ वर्षांनंतरही उरी हल्ला हा भारताच्या दहशतवादविरोधी लढ्यातील एक निर्णायक टप्पा म्हणून सर्जिकल स्ट्राईकच्या रूपाने भारतीयांच्या स्मरणात आहे. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेबाबत सार्वजनिक चर्चेचे स्वरूप बदलले आणि त्यानंतरच्या लष्करी कारवायांवरही त्याचा प्रभाव पडला. यात २०१९ मधील पुलवामा हल्ल्यानंतरच्या बालाकोट एअर स्ट्राईक्सचाही समावेश होतो. शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी उरी हा त्यांच्या प्रियजनांच्या बलिदानाची वेदनादायक आठवण आहे. दरवर्षी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात येतं, आणि हा हल्ला आजही सीमेपार दहशतवाद व प्रादेशिक स्थैर्य यावरील चर्चांमध्ये केंद्रबिंदू ठरतो.