Operation Keller पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवीत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळ नष्ट केले. त्यानंतर आता भारतीय लष्कराने नवीन ऑपरेशन सुरू केले आहे. या ऑपरेशनला ‘ऑपरेशन केल्लर’ असे नाव देण्यात आले आहे. भारतीय सैन्याने मंगळवार, १३ मे २०२५ रोजी काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील केल्लरच्या घनदाट जंगलात लष्कर-ए-तैयबाच्या तीन दहशतवाद्यांचा नि:पात केला. ऑपरेशन केल्लर काय आहे? नवीन मोहीम सुरू करण्यामागील उद्देश काय? त्याविषयी जाणून घेऊ.

नवीन ऑपरेशनची गरज का?

राष्ट्रीय रायफल्सच्या युनिटकडून शोकल केल्लर परिसरात दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल मिळालेल्या अचूक गुप्तचर माहितीनंतर ‘ऑपरेशन केल्लर’ सुरू करण्यात आले. त्याची माहिती ‘एक्स’लया सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लष्कराच्या अधिकृत निवेदनाद्वारे देण्यात आली. ‘एक्स’वर पोस्ट केलेल्या अधिकृत लष्कराच्या निवेदनात, “ऑपरेशन केल्लर १३ मे २०२५ रोजी राष्ट्रीय रायफल्स युनिटला मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारावर सुरू करण्यात आले. शोपियानमधील शोकल केल्लर या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली. भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा शोध घेण्याची आणि त्यांना समूळ नष्ट करण्याची मोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला. भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन कट्टर दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. हे ऑपरेशन सुरू आहे,” असे नमूद करण्यात आले. ही चकमक लगतच्या कुलगाम जिल्ह्यात सुरू झाली आणि शोपियानपर्यंत पसरली. या परिसरात गोळीबारात दहशतवाद्यांना अखेर ठार मारण्यात आले.

ऑपरेशन केल्लरमध्ये मारले गेलेले दहशतवादी कोण?

ऑपरेशन केल्लर हे दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरू करण्यात आलेले सर्च ऑपरेशन असून, २४ तासांतच या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याला यश आले आहे. सुरक्षा दलांनी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवली आहे. शाहिद कुट्टे, अदनान शफी दार व हरिस नझीर, अशी दहशतवाद्यांची नावे आहेत. हे सर्व मृत दहशतवादी पाकिस्तानसमर्थित लष्कर-ए-तैयबा (एलईटी)शी जोडलेले असल्याची माहिती आहे. शोपियानमधील छोटीपोरा हिरपोरा येथील रहिवासी व मोहम्मद युसूफ कुट्टे याचा मुलगा शाहिद कुट्टे ८ मार्च २०२३ रोजी लष्कर-ए-तैयबामध्ये सामील झाला होता. तो ८ एप्रिल २०२४ रोजी डॅनिश रिसॉर्टमध्ये झालेल्या गोळीबारासह अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता. डॅनिश रिसॉर्टमध्ये झालेल्या गोळीबारा दोन जर्मन पर्यटक जखमी झाले होते.

१८ मे २०२४ रोजी हिरपोरा येथे भाजपाच्या सरपंचाच्या हत्येशीदेखील त्याचा संबंध असल्याची माहिती आहे. त्याने ३ फेब्रुवारी २०२५ रोजी कुलगामच्या बेहीबाग येथे एका प्रादेशिक सैन्याच्या जवानाची हत्या केल्याचाही संशय आहे. शोपियानमधील वंदुना मेल्होरा येथील रहिवासी अदनान शफी दार ऑक्टोबर २०२४ मध्ये लष्कर-ए-तैयबामध्ये सामील झाल्याची माहिती आहे. त्याच महिन्यात शोपियानमधील वाची येथे एका कामगाराच्या हत्येसाठी त्याला जबाबदार धरण्यात आले होते.

पुलवामा येथील रहिवासी असलेला हरीस नझीर हा एप्रिल २०२४ मध्ये झालेल्या डॅनिश रिसॉर्ट हल्ल्यात सहभागी असल्याची माहिती होती. ज्या ठिकाणी गोळीबार झाला आणि दहशतवाद्यांना ठार करण्यात आले, त्या ठिकाणावरून तीन एके-४७ रायफली, इतर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. त्यातून हे स्पष्ट झाले की, या प्रदेशात दहशतवादी हल्ले करण्याची तयारी हे दहशतवादी करीत होते.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर ‘ऑपरेशन केल्लर’ची सुरुवात

७ मे रोजी भारताच्या सीमापार दहशतवादविरोधात सुरू करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सीमापार तणाव वाढत असल्याचे चित्र असल्याने हे ऑपरेशन सुरू करण्यात आले. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके)मधील नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले होते. २२ एप्रिल रोजी पहलगामजवळील बैसरन व्हॅलीमध्ये २६ पर्यटकांच्या क्रूर हत्येचा बदला म्हणून ही कारवाई करण्यात आली होती. २२ एप्रिल रोजी झालेला हल्ला पाकिस्तानमधील तीन दहशतवादी आदिल हुसेन ठोकर, अली भाई व हाशिम मुसा यांनी घडवून आणला असल्याचे भारतीय गुप्तचर यंत्रणेने स्पष्ट केले.

शोपियानमध्ये ‘दहशतवादमुक्त काश्मीर’ असे लिहिलेली पोस्टर लावण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांच्या ठावठिकाण्यांबद्दल माहिती देणाऱ्यांना २० लाख रुपयांचे बक्षीसदेखील जाहीर केले आहे. ‘ऑपरेशन केल्लर’कडे जम्मू-काश्मीरमध्ये वाढत्या दहशतवादविरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून पाहिले जात आहे, ज्यामुळे सीमापार दहशतवादाला रोखण्यात मदत होईल.

भारताचे दहशतवादविरोधी धोरण

भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रविरामानंतर ऑपरेशन केल्लर सुरू करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत पाकिस्तानने सीमापार गोळीबार अन् ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर भारताने भारताने नियंत्रण रेषेवर (एलओसी) आपली सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली आहे.

भारतीय लष्कराचे ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि त्यानंतर सुरू करण्यात आलेले ‘ऑपरेशन केल्लर’ गुप्तचर यंत्रणेकडील माहितीच्या आधारावर कारवाई करण्यासाठी आणि धोके येण्यापूर्वीच ते नष्ट करण्यासाठी विकसित होत असलेल्या भारताच्या रणनीतीचा एक भाग असल्याचे दिसून येते. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर ‘ऑपरेशन केल्लर’मध्ये मिळालेले यश केंद्र सरकारच्या संदेशाला बळकटी देते. दहशतवादाला सीमेच्या आत किंवा पलीकडे ट्रॅक केले जाईल आणि नष्ट केले जाईल, असा इशारा केंद्र सरकार वारंवार देताना दिसत आहे.