इस्त्रायल आणि इराण यांच्यादरम्यान सुरू असलेला संघर्ष आणखी चिघळत असल्याचे दिसत आहे. दोन्ही देशांतील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये मोठी जीवितहानी झाली आहे. इस्त्रायलने इराणच्या विरोधात ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ राबवत केलेल्या हवाई हल्ल्यात आतापर्यंत इराणमध्ये २०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच हवाई हल्ल्यांमध्ये इराणमधील तेल डेपो, गॅस रिफायनरी प्रकल्प यांसारख्या पायाभूत सुविधांनादेखील लक्ष्य केले जात आहे.

दुसरीकडे, इराणनेही इस्त्रायलमधील जेरुसलेम व तेल अवीवसह अनेक शहरांवर शेकडो क्षेपणास्त्रे डागली आहेत. सोमवारी सकाळी इराणने इस्त्रायलवर पुन्हा एकदा सर्वात मोठा हवाई हल्ला केला. यात इराणच्या सैन्याने इस्त्रायलच्या काही भागांत बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आपल्या नव्या संरक्षण प्रणालीच्या मदतीने हे हवाई हल्ले रोखल्याचा दावा इस्त्रायलने केला आहे. इस्त्रायली नौदलाने पहिल्यांदाच इराणमधून सोडण्यात येणाऱ्या ड्रोनना रोखण्यासाठी त्यांची बराक मॅगेन हवाई संरक्षण प्रणाली तैनात केली आहे. वाढत्या प्रादेशिक तणावाच्या दरम्यान इस्त्रायलच्या सागरी सुरक्षा क्षमतेतील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. ही प्रणाली नक्की काय आहे? त्याची इतकी चर्चा का? बराक मॅगेन हवाई संरक्षण प्रणालीने इराणचे ड्रोन कसे निष्प्रभ केले? त्याविषयी जाणून घेऊयात.

बराक मॅगेन संरक्षण प्रणाली ही इस्त्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज (आयएआय) द्वारे विकसित करण्यात आली आहे. (प्रातिनिधिक छायाचित्र-रॉयटर्स)

इराणचे ड्रोन हल्ले निष्प्रभ

इस्त्रायल संरक्षण दलांनी (आयडीएफ) दावा केला की, इस्त्रायलमध्ये गस्त घालणाऱ्या साअर ६-क्लास मिसाइल कॉर्व्हेटने रात्री आठ इराणी ड्रोनना निष्प्रभ केले. या ड्रोनला निष्प्रभ करण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच बराक मॅगेन प्रणाली आणि त्याच्या लांब पल्ल्याच्या एलआरएडी इंटरसेप्टरचा ऑपरेशनल वापर झाला. मुख्य म्हणजे या प्रणालीचा वापर करून कोणतेही नुकसान होण्यापूर्वीच सर्व हल्ले निष्प्रभ करण्यात आले. आयडीएफने म्हटले, “नौदलाच्या क्षेपणास्त्र बोट फ्लोटिलाने इराणमधून सोडण्यात आलेल्या आठ ड्रोनना निष्प्रभ केले.” त्यांनी पुढे सांगितले की, याद्वारे पहिल्यांदाच ‘बराक मॅगेन’ हवाई संरक्षण प्रणाली आणि लांब पल्ल्याच्या इंटरसेप्टर ‘एलआरएडी’चा ऑपरेशनल वापर करण्यात आला.”

इस्त्रायल आणि इराणमधील शत्रुत्व वाढल्याने दोन्ही देशांत हा संघर्ष सुरू झाला आहे. संघर्ष चिघळल्याने आयडीएफने किमान २५ ड्रोन निष्प्रभ केल्याचा दावा केला आहे. इराणने ड्रोनचा वापर इस्त्रायली संरक्षणाची तपासणी करण्यासाठी आणि त्यांना आव्हान देण्यासाठी केल्याची माहिती आहे. इस्त्रायली नौदलाच्या नवीनतम सा’आर ६-क्लास कॉर्व्हेट्सवर तैनात केलेली बराक मॅगेन प्रणाली ही इस्त्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज (आयएआय) ने विकसित केली आहे. या प्रणालीच्या मदतीने ड्रोन, क्रूझ क्षेपणास्त्रे आणि बॅलिस्टिक प्रोजेक्टाइल्ससह उच्च अचूकता आणि जलद प्रतिसाद क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राचा सामना करता येईल.

बराक मॅगेन संरक्षण प्रणाली नक्की कशी आहे?

  • बराक मॅगेन संरक्षण प्रणाली ही इस्त्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज (आयएआय) द्वारे विकसित करण्यात आली आहे.
  • ही एक प्रगत नौदल हवाई संरक्षण प्रणाली आहे.
  • ही प्रणाली अगदी आव्हानात्मक स्वरूपाच्या सागरी वातावरणातही विविध हवाई धोक्यांपासून युद्धनौकांचे संरक्षण करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे.
  • जून २०२५ मध्ये त्याचा पहिला सार्वजनिक वापर करण्यात आला आहे.
  • इस्त्रायलला लक्ष्य करणाऱ्या इराणी ड्रोनना रोखण्यासाठी पहिल्यांदा याचा वापर करण्यात आला.

प्रमुख क्षमता:

मजबूत आणि बहुस्तरीय संरक्षण : ही प्रणाली ड्रोन, क्रूझ क्षेपणास्त्रे, समुद्रातून स्किमिंग करणारी क्षेपणास्त्रे, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि अगदी शत्रूची विमाने निष्क्रिय करण्यास सक्षम आहे.

लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे : ही प्रणाली LRAD म्हणजेच लाँग-रेंज अ‍ॅक्टिव्ह डिफेन्स इंटरसेप्टर क्षेपणास्त्राचा वापर करते. ही क्षेपणास्त्रे १५० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील लक्ष्यांना निष्प्रभ करू शकते.

सक्षम शोध प्रक्रिया : अचूक लक्ष्य भेदण्यासाठी या प्रणालीमध्ये इलेक्ट्रो-ऑप्टिकल सेन्सर्स बसविण्यात आले आहे.

मॉड्यूलर आर्किटेक्चर : ही प्रणाली विविध प्लॅटफॉर्मवर तैनात केली जाऊ शकते. सध्या याला सा’अर ६-क्लास कॉर्वेट्सवर तैनात केले गेले आहे.

इराणसारख्या शत्रूंकडून सुरू केलेल्या असमित हवाई हल्ल्यांच्या वाढत्या धोक्याला तोंड देण्यासाठी इस्त्रायलकडून बराक मॅगेनची निर्मिती करण्यात आली होती. आयर्न डोम किंवा डेव्हिड स्लिंगसारख्या जमिनीवर आधारित हवाई संरक्षण प्रणालींपेक्षा बराक मॅगेन नौदल ऑपरेशन्ससाठी तयार करण्यात आली आहे. ही प्रणाली हवाई आणि समुद्र दोन्हीकडून येणाऱ्या धोक्यांविरोधात संरक्षण प्रदान करते. ही प्रणाली तैनात करणे म्हणजे इस्त्रायली संरक्षण क्षेत्राच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा आहे. ऑफशोअर गॅस उत्पादनाचे महत्त्व वाढत असताना बराक मॅगेनसारख्या प्रणाली इस्त्रायलच्या आर्थिक पायाभूत सुविधांच्या संरक्षणासाठी महत्त्वाच्या ठरतात.

इराण आणि इस्त्रायलमधील संघर्ष सध्याही सुरू असून दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती आहे. या संघर्षामुळे दोन्ही देशांत जीवितहानी झाल्याची माहिती आहे. दोन्ही देशांतील संघर्षामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस होत असल्याचे चित्र आहे. दोन देशांतील युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होताना दिसत आहे. अलीकडेच इस्त्रायलने थेट इराणच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य केले आहे. इस्त्रायलने इराणमध्ये असणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पावर बॉम्ब हल्ला केला आहे.