दक्षिणेतील तमिळनाडूत भाजपला अद्याप विस्तार करता आला नाही. राज्यात पुढील वर्षी २०२६ मध्ये विधानसभा निवडणूक होईल. सत्तारूढ द्रमुकला हटविण्यासाठी भाजप-अण्णा द्रमुक हे पुन्हा एकत्र आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच राज्याचा दौरा केला. अरुवायूर जिल्ह्यात चोलापूरम मंदिराला भेट दिली. स्थानिक संस्कृतीशी जोडण्याचा मुद्दा पंतप्रधानांच्या दौऱ्यातून अधोरेखित करण्यात आला. यातून द्रमुकला शह देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र भाजपसाठी ही लढाई सोपी नाही. हिंदी भाषकांचा पक्ष अशी त्यांची प्रतिमा आहे. ती बदलून पक्षाला तामिळनाडूत वाटचाल करावी लागेल.
अण्णा द्रमुकशी आघाडी
पंतप्रधानांनी दोन दिवस तमिळनाडूचा दौरा केला त्यावरून भाजपसाठी हे राज्यसाठी किती महत्त्वाचे हे लक्षात येते. जवळपास पाच हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण जुलैच्या अखेरच्या आठवड्यात झालेल्या दौऱ्यादरम्यान करण्यात आले. गेल्या म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने स्वबळावर दहा टक्क्यांवर मते मिळवल्याने त्यांच्या आशा वाढल्या आहेत. भाजपसह राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या अण्णा द्रमुकला लोकसभेला एकही जागा जिंकता आली नाही. द्रमुक आघाडीविरोधात मते भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी तसेच अण्णा द्रमुकमध्ये विभागली. त्यामुळे आता अण्णा द्रमुकचे सर्वेसर्वा व माजी मुख्यमंत्री ई. के. पलानीस्वामी यांना भाजपबरोबर जाणे भाग पडले. ही युती असली तरी, सत्तेत आल्यावर सरकार अण्णा द्रमुकचेच असेल अशी भूमिका त्यांनी घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा तसेच माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी घेतलेले परिश्रम यामुळे राज्यात भाजपबद्दल सकारात्मकता वाढलीय. मात्र निवडणुकीत मोठ्या प्रमाणात जागा जिंकण्यास ही ताकद पुरेशी नाही हे लोकसभा निकालात दिसले.
पन्नीरसेल्वम नाराज
सामाजिक समीकरणांचा विचार करता द्रमुक आघाडीत काँग्रेस तसेच डावे पक्ष व काही दलित संघटनांचा समावेश आहे. त्यामुळे जातीय गणित लक्षात घेता ही आघाडी भक्कम वाटते. अलीकडे राज्यात काही प्रमुख खासगी संस्थांनी सर्वेक्षणे केली, त्यात द्रमुक आघाडीला अजूनही संधी असल्याचे दिसते. द्रमुक सरकारवर नाराजी असली तरी, विखुरलेल्या विरोधकांमुळे सत्ताबदल होईल का, हे आजच सांगणे कठीण दिसते. भाजप-अण्णा द्रमुक आघाडीने माजी मुख्यमंत्री व अण्णा द्रमुकमधून निलंबित करण्यात आलेले ओ. पन्नीरसेल्वन यांनी भाजपची साथ सोडल्याची घोषणा केली. प्रभावी अशा थेवर समुदायातून ते येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी त्यांना निमंत्रण नव्हते. त्यामुळे ते संतापले, लवकरच पुढील राजकीय भूमिका ते जाहीर करतील असे त्यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट केले.
राज्यातील राजकीय चित्र
अभिनेते विजय यांनी तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) या पक्षाची गेल्या वर्षी स्थापना केली. राज्याच्या राजकारणात चित्रपट तारे-तारकांना महत्त्व मिळते. ही परंपरा एम. जी. रामचंद्रन यांच्यापासून सुरू आहे. त्यामुळे द्रमुक-अण्णा द्रमुकच्या लढाईत नवा पर्याय म्हणून विजय यांच्याकडे पाहिले जाते. या दोन्ही आघाड्यांमध्ये संधी नसलेले पक्ष त्यांच्याकडे जाऊ शकतात. विजय यांनी मोठ्या प्रमाणात मते घेतली तर विधानसभेचा निकाल धक्कादायक लागू शकतो. राज्यात १८ ते २९ या वयोगटातील जवळपास सव्वाकोटी मतदार आहेत. ही सारीच मते त्यांना पडणार नाहीत. मात्र त्यांचा करिष्मा पाहता मोठा युवावर्ग त्यांच्या मागे जाऊ शकतो. विजय यांनी भाजपविरोधात थेट भूमिका जाहीर केली. देशभरात आजच्या घडीला तमिळनाडूत द्रमुक तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस या दोन प्रादेशिक पक्षांना गेल्या दशकभरात भाजपला रोखता आले नाही. त्यामुळे पुढील वर्षी कोणत्याही स्थितीत द्रमुकला सत्तेतून हटवायचे हा भाजपचा निर्धार आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुकने भाषेचा मुद्दा किंवा लोकसभा मतदारसंघ परिसीमनानंतर दक्षिणेतील राज्यात संभाव्य जागांची कपात या बाबींबर भाजपला जेरीस आणले. यातून निवडणुका जशा जवळ येतील तशी ही लढाई धारदार होईल. प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा अधिक टोकदार बनलाय. यातून राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजपला तमिळनाडूत अण्णा द्रमुकखेरीज वाटचाल करणे तूर्तास अशक्य आहे.
प्रादेशिक पक्षच केंद्रस्थानी
काँग्रेसला १९६७ नंतर तमिळनाडूत स्वबळावर सरकार आणले जमले नाही. आता ते द्रमुकच्या मदतीने सरकारमध्ये आहेत. जवळपास सहा दशके कधी द्रमुक तर कधी अण्णा द्रमुक यांची सत्ता आहे. प्रादेशिक पक्षांच्या मदतीखेरीज राज्यात राजकारण करणे काँग्रेस असो वा भाजप यांना शक्य झाले नाही. भाजपने तमिळी संस्कृतीचा मुद्दा सातत्याने अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. विविध ठिकाणी तमिळ संगमचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. देशात सर्वाधिक मंदिरे अशी तमिळनाडूची ओळख. तरीही भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही नुकताच येथे दौरा केला. इतर राज्यांमध्ये ज्याप्रमाणे मित्रपक्षांवर भाजप प्रभुत्व ठेवू पाहात आहे त्याला तमिळनाडू अपवाद आहे. अण्णा द्रमुक भाजपच्या साऱ्या मुद्द्यांना होकार भरेल असे चित्र नाही. यातून जवळपास सहा दशकांपासून सुरू असलेले द्रमुक-अण्णा द्रमुककेंद्रित राजकारण सुरूच राहील हेच दिसते.