छत्तीसगडमध्ये पर्यटनास चालना मिळावी यासाठी तेथील सरकारकडून एक अभिनव प्रकल्प राबवला जाणार आहे. गगनभरारी घेऊन उत्तराखंडमधील निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी तसेच निसर्गरम्य वातावरणात जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी तेथे ‘ब्रेकफास्ट टुरिझम’ सुरू केले जाण्याची शक्यता आहे. लोकांना हवाई सफर तसेच निसर्गसौंदर्याचा अनुभव मिळावा यासाठी हा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. त्यासाठी खास जायरोकॉप्टरची मदत घेतली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर ब्रेकफास्ट टुरिझम म्हणजे नेमकं काय? जायरोकॉप्टर म्हणजे काय? उत्तराखंड सरकारची ही अभिनव योजना काय आहे? हे जाणून घेऊ या…
नेमकी योजना काय?
उत्तराखंड सरकारकडून पर्यटनाला चालना मिळावी यासाठी यासाठी ब्रेकफास्ट टुरिझम नावाने नवी योजना राबवली जाणार आहे. उत्तराखंडमध्ये हिमालयची सफर करण्यासाठी याआधीच ‘द हिमालयन एअरसफारी सर्व्हिस’ नावाने एक संकल्पना राबवली जाते. या संकल्पनेच्या माध्यमातून पर्यटकांना हिमालयाची सफर घडवून आणली जाते. मात्र आता सरकारने ब्रेकफास्ट टुरिझम नावाने नवी संकल्पना आणली आहे.
पहिल्या टप्प्यात काय होणार?
ब्रेकफास्ट टुरिझममध्ये ज्या ठिकाणी रस्तेमार्गाने जाणे कठीण आणि अशक्य आहे, त्या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात, शांततेत जेवणाचा अनुभव घेता येणार आहे. प्रस्तावानुसार पहिल्या टप्प्यात कालसी, चिन्यालीसौर, गौचर, बैरागी कॅम्प, नैनीसैनी आणि पंतनगर या प्रदेशांची निवड करण्यात आली आहे. या प्रदेशाची सफर करताना जेवणाची सोय रायथल, हरसिल, जॉर्ज एव्हरेस्ट, ऋषिकेश आणि नैनिताल या भागात केली जाणार आहे.
उत्तराखंड पर्यटन विभागातील ओएसडी सतीश बहुगुणा यांनी या संकल्पनेविषयी अधिक माहिती दिली आहे. अन्य देशांतील पर्यटन संकल्पनांचे निरीक्षण करून आम्ही उत्तराखंडमध्ये अशाच प्रकारची संकल्पना राबवणार आहोत, असे बहुगुणा यांनी सांगितले आहे.
उच्चभ्रू पर्यटकांसाठी ब्रेकफास्ट टुरिझम
“आमच्या राज्यात मोठ्या प्रमाणात अल्पाईन वनक्षेत्र आहे, असे पर्यटन विभागाचे मत आहे. त्यामुळे प्रदेशात ज्या प्रकारे पर्यटनाचा विकास झालेला आहे, त्याच प्रकारे पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवता उत्तराखंडमध्येही पर्यटनाचा विकास व्हायला हवा. पर्यटनाची ही कल्पना सर्वच पर्यकांसाठी नाही. उच्चभ्रू पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ही कल्पना आहे. उदाहरणात आपण सहस्त्रधारा येथून उड्डाण घेतल्यानंतर पर्यटकांना हरिसाल खोऱ्यात नेले जाईल. हरिसालच्या खोऱ्यात जेवण वगैरेचे नियोजन असेल. काही ठिकाणी छोट्या ट्रेकलाही जाता येईल, आनंददायी खेळांचे किंवा अन्य काही खेळ घेतले जातील. येथे काही वेळ घालवल्यानंतर पर्यटक जायरोकॉप्टरनेच परत येतील,” असे सतिश बहुगुणा यांनी सांगितले.
स्थानिकांना सहभागी करून घेतले जाणार
ज्या प्रदेशात ब्रेकफास्ट टुरिझमअंतर्गत विमानोड्डाण होईल किंवा पर्यटक उतरतील त्या प्रदेशातील पर्यावरणाची कसलीही हाणी होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी काही उपायोजना राबवल्या जाणार आहेत. उदाहरणात निसर्गसंपन्न असलेल्या प्रदेशाची हानी होऊ नये यासाठी त्या भागात कोणतेही कायस्वरुपी बांधकाम केले जाणार नाही. त्या भागातील स्थानिक लोकांना या पर्यटन कार्यक्रमात सहभागी करून घेतले जाईल. या स्थानिकांकडून पर्यटकांना स्वादीष्ट जेवण, राहण्यासाठी तात्पुरता निवारा पुरता येईल. यामुळे स्थानिक पातळीवर अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. पर्यटक आणि स्थानिक लोकांमध्ये पैशांची देवाणघेवाण होईल.
सर्व शक्यतांवर विचार केला जाणार
या संकल्पनेच्या दुसऱ्या टप्प्यात ब्रेकफास्ट पर्यटनाला व्यापक रुप दिले जाणार आहे. पर्यटकांना वेगवेगळ्या निसर्गरम्य ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न या दुसऱ्या टप्प्यात केला जाणार आहे. “या कल्पनेअंतर्गत पर्यटनाचा वेळ वाढता येईल का? पर्यटकांना निसर्गरम्य ठिकाणी एकापेक्षा अधिकवेळा जेवण देता येईल का? प्रत्येक वेगळ्या ठिकाणी वेगळे जेवण देणे शक्य होईल का? अशा सर्व शक्यतांवर विचार केला जाणार आहे,” असे बहुगुणा यांनी सांगितले. मात्र ब्रेकफास्ट टुरिझम ही संकल्पना प्रत्यक्षात कधी उतरेल, हे अद्याप अस्पष्ट आहे. आगामी वर्षाच्या उन्हाळ्यात ही संकल्पना प्रत्यक्षात राबवण्याचा उत्तराखंड सरकारचा प्रयत्न आहे.
जायरोकॉप्टर म्हणजे काय?
गेल्या आठवड्यात जायरोकॉप्टरच्या मदतीने भारतातील पहिल्या हिमालयातील एअर सफारीसाठी चाचणी उड्डाण घेण्यात आले. हिमालयीन निसर्गसौंदरर्याचा आनंद घेता यावा यासाठी जायरोकॉप्टरची मदत घेतली जाणार आहे. उत्तराखंड पर्यटन विकास मंडळ तसेच राजस एअरोस्पोर्ट्स अँड अॅडव्हेन्चर्स प्रायव्हेट लिमिटेडतर्फे संयुक्तपणे हा प्रकल्प राबवणार आहेत. जायरोकॉप्टर हे हेलिकॉप्टर आणि विमान यांचे मिश्रण आहे, असे म्हणता येईल. जायरोकॉप्टरच्या वर फिरणारे ब्लेड्स असतात. मात्र हे ब्लेड्स इंजिनच्या मदतीने फिरत नाहीत. जेव्हा जायरोकॉप्टर हवेत पुढे जाते, तेव्हा हवेच्या मदतीने जायरोकॉप्टरच्या वर लावलेले ब्लेड्स फिरतात आणि जायरोकॉप्टर हवेत राहते. जायरोकॉप्टर हे उड्डाणासाठी सुरक्षित मानले जाते. जायरोकॉप्टरच्या उड्डाणासाठी किंवा जमिनीवर येण्यासाठी कोणत्याही वेगळ्या धावपट्टीची गरज नसते.
जायरोकॉप्टर्सची ब्रेकफास्ट टुरिझमसाठी मदत
“भविष्यात या जायरोकॉप्टर्सची ब्रेकफास्ट टुरिझमसाठी मदत घेतली जाणार आहे. जायरोकॉप्टर तुलनेने कमी उंचीवरून हवेत उड्डाण करते त्यामुळे ते कोणत्याही हवामानात प्रवास करू शकते, ज्याचा पर्यटकांना पूर्ण निसर्ग अनुभवण्यासाठी फायदा होऊ शकतो,” असे बहुगुणा यांनी सांगितले.
दरम्यान, उत्तराखंडमध्ये हिमालयन एअरसफारी योजनेअंतर्गत जर्मनीहून पीपीपी तत्त्वावर दोन जायरोकॉप्टर्स बोलावण्यात आले आहेत.