अलीकडच्या आठवड्यांत ब्रिटनभर सेंट जॉर्जचा लाल-पांढरा ध्वज आणि युनियन जॅक हे झेंडे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर दिसू लागले आहेत. समर्थक म्हणतात, हा राष्ट्रीय अभिमान दाखवण्याचा उपक्रम आहे; परंतु काहींना भीती आहे की हा वाढत्या स्थलांतरविरोधी भावनेचा भाग आहे.

ब्रिटिशांचे ध्वजप्रेम रस्त्यावर

सामान्यतः ब्रिटनमध्ये झेंडे सार्वजनिक इमारतींवर फडकविलेले दिसतात. खेळ, राजघराण्याचे सोहळे किंवा लष्करी कार्यक्रमांशिवाय रस्त्यांवर झेंडे लावले जाणे दुर्मीळ आहे. पण अलीकडच्या आठवड्यांत इंग्लंडभर सेंट जॉर्जचा पांढऱ्या पार्श्वभूमीवर लाल क्रूस असलेला ध्वज आणि युनियन जॅक हे झेंडे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर दिसू लागले आहेत. बर्मिंगहॅमसह अनेक शहरांत हजारो झेंडे लावले आहेत. यामुळे काही ठिकाणी मोडतोडही झाली.    

स्थलांतरितविरोधाचे पडसाद?

संस्कृती, भूमिपुत्र, बाहेरून आलेले या संकल्पना केवळ भारतासारख्या देशालाच भेडसावत नाहीत. त्या जगभर सारख्याच तीव्र भावनेने उफाळून येत असतात. सध्या ब्रिटनमध्ये हे संस्कृतीचे वारे वाहत आहेत. तेथील तथाकथित संस्कृतीरक्षक जागे झाले आहेत. रस्त्यांवर आपले झेंडे अभिमानाने फडकावून हे गट अप्रत्यक्षपणे तेथील भारतीयांसह, अन्य देशांतून आलेल्या नागरिकांमध्ये भीतीची भावना निर्माण करत आहेत. ब्रिटनमध्ये या उन्हाळ्यात स्थलांतराचा विषय राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील ठरला. YouGov मासिकाच्या सर्वेक्षणानुसार, जूनअखेरपासून मतदारांच्या सर्वात मोठ्या चिंतेचा विषय ‘स्थलांतर’ ठरला आहे. अर्थव्यवस्थेपेक्षाही त्याला जास्त प्राधान्य मिळाले.

जुलै २०२५ मध्ये महिला युरो स्पर्धेदरम्यान हे झेंडे प्रथम दिसू लागले आणि मोहिमेची सुरुवात झाली. ऑगस्ट मध्यापर्यंत बर्मिंगहॅम, मिल्टन केन्स, ब्लॅकपूल, ग्लासगो आदी शहरांत या मोहिमेचा वेगाने प्रसार झाला. आता स्थानिक परिषदांनी (काऊन्सिल) ध्वज काढण्यास सुरुवात केली आहे. पण याच्या राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया उमटत आहेत. अलीकडे एका इथिओपियन निर्वासितावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला गेला. त्याने तो नाकारला. पण त्यानंतर हॉटेलबाहेरील निदर्शने तीव्र झाली. गेल्या उन्हाळ्यातही अनेक शहरांत निर्वासित व अल्पसंख्याकांवरून दंगे उसळले होते. त्यावेळी सोशल मीडियावर खोट्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या.

कोणत्या गटांची मोहीम?

वीओली वॉरियर्स या गटाची स्थापना बर्मिंगहॅममधून झाली. या गटाने प्रामुख्याने ही मोहीम सुरू केल्याचे बोलले जाते. दुसरा गट आहे -ऑपरेशन रेझ द कलर्स. या गटाला कथितरित्या ब्रिटन फर्स्ट या अति-उजव्या संघटनेचे आर्थिक साहाय्य मिळाले असून, संस्थापकांपैकी एकाचे अति-उजव्या गटांशी संबंध असल्याचे आरोप आहेत. दोन्ही गटांचा दावा असा की, हा उपक्रम फक्त देशभक्तीची भावना जागवण्यासाठी आणि राष्ट्रीय अभिमान दाखवण्यासाठी आहे. मात्र झेंडे फडकावण्याची वेळ आणि पार्श्वभूमी यामुळे या गटांच्या हेतूंविषयी शंकेला वाव आहे असे तेथील अनेकांचे म्हणणे आहे. निर्वासित लोक ज्या हॉटेलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आश्रय घेतात. त्या हॉटेलबाहेरच आंदोलन होते. त्यामुळे ही मोहीम स्थलांतरविरोधी भावनांशी जोडलेली असल्याच्या दाव्याला बळ मिळते.

वीओली वॉरिअर्स

झेंड्यांचा हा उपक्रम अलीकडील आठवड्यांत निर्वासितांना निवारा देणाऱ्या हॉटेल्सबाहेर झालेल्या निदर्शनांशी जोडला गेला आहे. हा उपक्रम सोशल मीडियावरून पसरला. त्याची सुरुवात बर्मिंगहॅमस्थित वीओली वॉरिअर्स (Weoley Warriors) या गटाकडून झाली. या गटाचे सदस्य इतिहास, स्वातंत्र्य व कर्तृत्वाचा अभिमान दाखवण्यासाठी झेंडे लावतो, असा दावा करतात. मात्र, त्यांच्या खऱ्या उद्दिष्टांबाबत संदिग्धता आहे.

‘ऑपरेशन रेझ द कलर्स’

‘ऑपरेशन रेझ द कलर्स’ नावाने देखील एक गट ही मोहीम चालवतो. यात युनियन जॅक व सेंट जॉर्ज क्रॉसचे झेंडे लावून राष्ट्रीय अभिमान वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही मोहीम वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. कारण, या मोहिमेचा संबंध “ब्रिटन फर्स्ट” या अतिउजव्या गटाशी जोडला गेला आहे. वूल्व्हरहॅम्प्टनमधील अँडी सॅक्सन यांनी ही मोहीम सुरू केली असून, ती आता वूर्स्टर, यॉर्क, न्यूकॅसलसह डझनभर शहरांत पोहोचली आहे. सॅक्सन यांनी ही मोहीम “अभिमान व आशा” यासाठी असल्याचे सांगितले असले तरी, ब्रिटन फर्स्टने दिलेले २५० झेंडे आणि सॅक्सन यांचे सोशल मीडियावरील अतिउजव्या नेत्यांशी संबंध यामुळे वाद निर्माण झाला आहे.  

झेंड्याच्या राजकारणाचा इतिहास काय?

१९७०च्या दशकात नॅशनल फ्रंट या अति-उजव्या पक्षाने युनियन जॅक झेंडा आपल्या प्रतीक म्हणून स्वीकारला होता. हा पक्ष गोऱ्या वर्चस्ववादी विचारांचा समर्थक होता. सेंट जॉर्जचा क्रॉस झेंडा देखील इंग्लिश हुल्लडबाज फुटबॉल खेळाडू आणि अतिउजव्या गटांनी वापरला होता.

म्हणूनच काही लोकांना झेंडा म्हणजे देशप्रेमाचे प्रतीक वाटते, तर स्थलांतरित आणि विविध जातीय पार्श्वभूमीचे नागरिक आपल्यावर लक्ष्य केले जात आहे अशी भीती व्यक्त करतात.

राजकीय प्रतिसाद कसा आहे?

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या मते, झेंडा हा वारसा आणि मूल्यांचे प्रतीक असतो. पण काही लोक त्याचा वापर फूट पाडण्यासाठी करत आहेत. काही स्थानिक प्रशासनांनी (काऊन्सिल) सुरक्षेच्या कारणास्तव झेंडे काढून टाकले. बर्मिंगहॅम व टॉवर हॅम्लेट्ससारख्या काही स्थानिक प्रशासनांनी सुरक्षिततेच्या कारणावरून झेंडे काढून टाकण्याचे आदेश दिले. नायजेल फॅरेज (रिफॉर्म यूके पक्षाचे नेते) आणि काही कंझर्व्हेटिव्ह नेत्यांनी मात्र झेंड्यांना पाठिंबा दिला. अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्क यांनीही इंग्लिश झेंड्याचा फोटो X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केला.

सुरुवातीला देशभक्तीची भावना व्यक्त 

करण्यासाठी सुरू झालेला हा उपक्रम आता वादात सापडला आहे. ब्रिटन फर्स्ट सारख्या अतिउजव्या संघटनांचा आणि टॉमी रॉबिन्सनसारख्या व्यक्तींचा पाठिंबा मिळाल्यामुळे या मोहिमेवर टीका होत आहे. आयोजक अँडी सॅक्सन यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम ऐक्य आणि अभिमान व्यक्त करणारा असल्याचे सांगितले जात असले तरी टीकाकारांच्या मते यामुळे राष्ट्रवाद आणि स्थलांतरविरोधी विचारसरणीला खतपाणी मिळत आहे. त्यामुळे भविष्यात याचे गंभीर परिणाम दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.