Indian student visa rejection भारतीय विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षणाकरिता कॅनडाचे नाव प्राधान्यस्थानी असते. मोठ्या संख्येने दरवर्षी भारतीय विद्यार्थी कॅनडामध्ये शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी जातात. गेल्या अनेक काळापासून कॅनडामध्ये परदेशी विद्यार्थी आणि कामगारांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशातच एक नवीन माहिती समोर आली आहे. कॅनडाने २०२५ मध्ये आतापर्यंत ८० टक्के भारतीय विद्यार्थ्यांचे व्हिसा अर्ज नाकारले आहेत. कॅनडामध्ये शिकण्याचा, काम करण्याचा किंवा राहण्याचा मानस असलेल्या भारतीयांची संख्या जास्त असल्याने या नवीन निर्णयाचा मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. मात्र, भारतीयांचे व्हिसा अर्ज रद्द करण्याचे कारण काय? जाणून घेऊयात….
भारतीय विद्यार्थ्यांचे व्हिसा नाकारले
- कॅनडा आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी पसंतीचा देश मानला जातो. मोठ्या संख्येने भारतीय शिक्षणासाठी कॅनडाची निवड करतात.
- काही वर्षांपूर्वी कॅनडाने सर्वात कठोर व्हिसा धोरण लागू केले आहे, त्यामुळे जागतिक विद्यार्थ्यांच्या स्थलांतरणाच्या पद्धतीत मोठा बदल झाला.
- इमिग्रेशन, रिफ्युजीज अँड सिटिझनशिप कॅनडा (IRCC) च्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये भारतीय विद्यार्थ्यांचे जवळपास ८० टक्के व्हिसा अर्ज नाकारले गेले.

कॅनडामधील एकूण आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी सुमारे ४० टक्के विद्यार्थी भारतीय आहेत. ‘द पाई न्यूज’ (The PIE News) या शिक्षणविषयक वृत्तसंस्थेने बॉर्डरपास (BorderPass) च्या आकडेवारीचा उल्लेख करत सांगितले की, २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत (Quarter 2) अर्ज केलेल्या पाचपैकी चार भारतीय विद्यार्थ्यांचे अर्ज नाकारले गेले. कॅनडा सरकारच्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये १.८८ लाख भारतीय विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता. ओटावा (कॅनडाची राजधानी) ने तपशीलवार आकडेवारी जाहीर केलेली नसली तरी ‘द पाई न्यूज’ ने दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयाचा परिणाम आशिया, आफ्रिका आणि इतरही देशांतील विद्यार्थ्यांवर होत आहे. त्यातून आंतरराष्ट्रीय शिक्षणाबद्दल कॅनडाचा दृष्टिकोन कसा बदलत आहे हे दिसून येते.
व्हिसासाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांकडून कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केला जात असल्यामुळे कॅनडाकडून त्यांचे अर्ज नाकारले जात असल्याचे समोर आले आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी याबाबत कुठलीही दक्षता न घेता थेट एआयच्या क्षमतेवर आरोप केले आहे. ‘एआय’कडून चुकीची माहिती दिली गेल्याने आमचा व्हिसा (पारपत्र) नाकारण्यात आला, असे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा फटका आता विद्यार्थ्यांनाही बसल्याचे दिसून येत आहे.
शिक्षणासाठी कॅनडाला पसंती
अनेक दशकांपासून सुरक्षा, संधी आणि जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्थांमुळे अनेक विद्यार्थ्यांसाठी उत्तर अमेरिका (North America) हा एक सोयीचा पर्याय होता. परंतु, अलीकडील आकडेवारी एक मोठा बदल दर्शवते. भारतीय विद्यार्थ्यांमध्ये कॅनडाची पसंती २०२२ मध्ये १८ टक्के होती, जी २०२४ पर्यंत नऊ टक्क्यांपर्यंत खाली घसरली. आता भारतीय विद्यार्थी कॅनडाऐवजी जर्मनीला पसंती देत आहे. व्हिसा मंजुरी कठोर करण्याचा ओटावाचा निर्णय देशांतर्गत आव्हानांशी संबंधित आहे.
व्हिसा नियम कठोर करण्याचे कारण काय?
कॅनडामध्ये घरांची कमतरता, पायाभूत सुविधांवर ताण आणि स्थानिक प्रतिभेला प्राधान्य देण्याची राजकीय मागणी सातत्याने होत आहे. बॉर्डरपासचे उपाध्यक्ष जोनाथन शेरमन यांनी ‘द पाई’ ला सांगितले की, “हे स्पष्ट आहे की इमिग्रेशन, रिफ्युजीज अँड सिटिझनशिप कॅनडा (IRCC) नवीन अर्जांची खूप कसून तपासणी करत आहे.” त्यांनी या बदलाचे वर्णन सरकारी प्रक्रियेतील एक मूलभूत बदल असे केले आहे. याशिवाय, आणखी काही अडथळेही निर्माण झाले आहेत.
‘व्हीएनएक्स्प्रेस’नुसार, कॅनडाने विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या किमान आर्थिक पुराव्याची रक्कम दुप्पट करून सुमारे १३.१३ लाख रुपये केली आहे, तर आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठीच्या कामाच्या नियमांमध्येही अधिक कठोरता आणली आहे. सरकारने २०२५ मध्ये ४.३७ लाख अभ्यास परवानग्या (study permits) जारी करण्याची योजना आखली आहे, जी २०२४ च्या तुलनेत जवळजवळ १० टक्के कमी आहे, असेही ‘व्हीएनएक्स्प्रेस’ने सांगितले आहे.
जर्मनीमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशात वाढ
जर्मनीमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशात वाढ दिसून येत आहे. आपली मजबूत अर्थव्यवस्था, सार्वजनिक अनुदानित विद्यापीठे (publicly funded universities) आणि वाढत्या इंग्रजी भाषेतील अभ्यासक्रमांमुळे जर्मनी भारतीय विद्यार्थ्यांसाठी पसंतीचे ठिकाण ठरत आहे. जर्मनीच्या फेडरल स्टॅटिस्टिकल ऑफिसच्या मते, गेल्या पाच वर्षांत भारतीय विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट झाली आहे.
२०२३ मध्ये ही संख्या ४९,५०० होती, जी २०२५ मध्ये जवळपास ६०,००० पर्यंत वाढली आहे. भारतीय विद्यार्थी आता असे देश निवडत आहेत जे परवडणारे, दर्जेदार शिक्षण आणि चांगल्या करिअरच्या संधी देतात. अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडासारख्या पारंपरिक देशांना वाढत्या देशांतर्गत दबावांना तोंड द्यावे लागत आहे, त्यामुळे जर्मनीसारख्या देशांना फायदा होत आहे.
कॅनडातील स्थलांतरितांच्या संख्येत लक्षणीय वाढ
स्टॅटिस्टिक्स कॅनडाच्या मते, स्थलांतरांमध्ये सर्वात मोठी वाढ तात्पुरत्या रहिवासी, विशेषतः कामगार आणि विद्यार्थ्यांमुळे झाली आहे. २०२२ मध्ये हा आकडा १.४ दशलक्षांवरून २०२४ पर्यंत २.८ दशलक्षपर्यंत पोहोचला आहे. केवळ दोन वर्षात ही संख्या दुप्पट झाली आहे. स्थलांतरांच्या संख्येत झालेली वाढ देशाच्या गृहनिर्माण, सामाजिक सेवा आणि जगण्याच्या वाढत्या खर्चावरदेखील भार टाकत आहेत. कॅनडा मोठ्या प्रमाणात देशात स्थलांतरितांना जागा देत आहे, असे स्थानिकांचे मत आहे. कॅनडा पूर्वी स्थलांतरितांच्या स्वागताच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध होते, मात्र आता कॅनडात स्थलांतरविरोधी विधाने आणि हल्ले वाढले आहेत.