-राखी चव्हाण

‘बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय गोरेवाडा प्राणिसंग्रहालया’त सलग तीनवेळा ‘ली’ या वाघिणीचे प्रजनन अपयशी ठरल्यामुळे बंदिस्त प्रजनन प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नैसर्गिक अधिवासात ही प्रक्रिया सहजपणे पार पाडली जाते, पण बंदिस्त प्रजनन प्रक्रियेत त्या प्रशासनाला विशेष काळजी घ्यावी लागते. ती घेतली जात नसल्यानेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असो वा गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय, वाघांचे बंदिस्त प्रजनन अपयशी ठरत आहे.

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?

बंदिस्त प्रजनन म्हणजे काय?

नैसर्गिक अधिवासात किंवा प्रयोगशाळेत बंदिस्त पिंजऱ्यात प्रजनन घडवून प्राण्यांची उत्पत्ती करणे म्हणजेच बंदिस्त प्रजनन आहे. १९६०च्या दशकात या पद्धतीने ‘अरेबियन ऑरिक्स’ या प्राण्याच्या उत्पत्तीद्वारे ही सुरुवात झाली. आता तर कोल्हे, बिबट, चित्ते, सिंह व अनेक पक्ष्यांच्या प्रजातींची उत्पत्ती या पद्धतीने करण्यात येत आहे. नामशेष होण्याच्या प्रजातीच्या संवर्धनासाठी बंदिस्त प्रजनन महत्त्वाचे मानले जाते व अनेक प्रजातींचे संवर्धन करण्यात येत आहे.

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात नेमके काय झाले?

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात ‘ली’ या वाघिणीच्या प्रजननाचा प्रयोग एकदा, दोनदा नव्हे तर तीनदा फसला. पहिल्यांदा तिने चार बछडे गमावले. त्यानंतर दुसऱ्या प्रयोगात गोरेवाडा प्रशासनाने काळजी घेणे अपेक्षित होते, पण तेथेही प्रशासन अपयशी ठरले. या पहिल्या दोन प्रयोगात ‘ली’ ने बछड्यांना जन्म दिला. मात्र, त्यांना उचलताना डोके आपटल्याने त्यांचा मृत्यू झाला. तिचा प्रजननासाठी असणारा पिंजराच मुळात लहान असल्याने ही घटना घडली. तिसऱ्या प्रयोगाच्या वेळी अति पर्यटन, वाहनांचा आवाज आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे तिच्या गर्भावर परिणाम झाला आणि बछडे मृत जन्माला आले.

वन्यजीवप्रेमींचे आक्षेप काय आहेत?

जैवविविधतेच्या दृष्टीने प्राण्यांचे बंदिस्त प्रजनन धोकादायक आहे. बंदिस्त प्रजननानंतर जन्माला येणारी प्रजाती नैसर्गिक प्रजातीपेक्षा अशक्त आणि रोगट असते. जनुकीयदृष्ट्या कमकूवत पिल्लू जन्माला आल्यामुळे ते पुन्हा नामशेष होण्याचा धोका असतो. बंदिस्त प्राणी आणि जन्माला येणाऱ्या पिलांमध्ये आनुवंशिक बदल होऊ शकतात. अशा प्राण्यांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका देखील असतो.

बंदिस्त प्रजनन अयशस्वी होण्याची कारणे काय?

प्रजनन यशस्वी होण्यासाठी ज्या नैसर्गिक वातावरणाची गरज प्राण्यांना असते, ते त्यांना मिळत नाही. प्रामुख्याने प्राणीसंग्रहालयात पर्यटकांमुळे, पर्यटक वाहनांमुळे प्राण्यांवर प्रचंड ताण येतो. या कृत्रिम वातावरणामुळे शरीरातील संप्रेरकांत (हार्मोन्समध्ये) बदल झालेला असू शकतो. वाहनांच्या आवाजाचा, त्या वाहनांमुळे होणाऱ्या कंपनाचा परिणाम गर्भावर होतो. त्यामुळे बरेचदा गर्भातच त्या पिल्लांचा मृत्यू होतो. प्रशासनाकडूनही त्याबाबत विशेष गांभीर्याने काळजी घेतली जात नाही.

बंदिस्त प्रजनन यशस्वी करण्यासाठी कशाची गरज?

मादी गर्भवती राहिल्यानंतर तिला पर्यटकांपासून पूर्णपणे दूर ठेवणे आवश्यक आहे. वाहनांचा आवाज तर नकोच, पण माणसांचाही कमीतकमी सहवास हवा. पिंजरा मोठा आणि स्वच्छ असायला हवा, जेणेकरून गर्भवती असताना मादीला मोकळेपणाने फिरता येईल. तिची वेळोवेळी तपासणी आणि प्रसूतीची वेळ जवळ आल्यानंतर तिची अधिक काळजी आवश्यक आहे. त्यांना सावली आणि पाणी आवश्यक आहे. मेंदूला सक्रिय ठेवण्यासाठी खेळणी आणि नैसर्गिक वस्तुंनी तयार केलेले आच्छादन हवे, कारण त्यांच्या पायाच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी ते महत्त्वाचे ठरते.

बंदिस्त प्रजननाची गरज का‌?

बंदिस्त प्रजननाच्या आवश्यकतेचा शास्त्रीयदृष्ट्या विचार केला तर दुर्मिळ प्रजातींच्या प्राण्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, बंदिस्त अवस्थेतल्या प्राण्यांच्या शारीरिक गरजांची पूर्तता करण्यासाठी, प्राण्यांच्या नैसर्गिक भावना आणि क्षमता टिकून राहण्यासाठी, तसेच प्राण्यांचे अनुवांशिक वैविध्य टिकवून ठेवण्यासाठी बंदिस्त प्रजनन आवश्यक आहे. प्रजनन झाले नाही तर नर आणि मादी या दोन्हींमध्ये शारीरिक समस्या उद्भवण्याची दाट शक्यता असते.