जागतिक पातळीवर तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा थेट परिणाम शेतीवर होत आहे. त्यामुळे आगामी काळात अन्नधान्याची महागाई मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती एका संशोधनातून मांडण्यात आली आहे. मासिक सरासरी तापमानात होणारे बदल हे सातत्याने पिकांच्या उत्पादन क्षमतेवर प्रतिकूल परिणाम करीत आहेत. जर्मनीतील पोस्टडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्च आणि युरोपियन सेंट्रल बँकेने हे संशोधन केले आहे. कम्युनिकेशन्स अर्थ अँड एन्व्हायर्नमेंट या संशोधनपत्रिकेत हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. संशोधकांनी १२१ देशांतील १९९१ ते २०२० या कालखंडातील मासिक चलनवाढ निर्देशांक आणि तापमान यांचा अभ्यास केला आहे. त्याआधारे तापमानातील बदल आणि त्याचा महागाईवर होणार परिणाम मांडण्यात आला आहे. त्याचाच आधार घेत संशोधकांनी २०३० ते २०६० या कालखंडात तापमानातील बदलामुळे महागाईत कसा बदल होईल, याचा आडाखा बांधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमके संशोधन काय?

विभिन्न कालखंडात आणि वेगवेगळ्या तापमान स्थितीत विविध प्रकारच्या अन्नधान्याच्या किमतीवर कसा परिणाम होतो, याचे संशोधन करण्यात आले. याचबरोबर तापमानातील बदलामुळे अन्नधान्याच्या महागाईत झालेले बदलही शोधण्यात आले आहेत. भविष्यातील तापमान बदलामुळे अन्नधान्याच्या महागाईवर होणारा परिणामावरही त्यात भाष्य करण्यात आले आहे. भविष्यातील महागाईचा संबंध थेट प्रतिकूल हवामान स्थितीशी असणार आहे. कारण संवेदनशील जागतिक अर्थव्यवस्थेवर नैसर्गिक आपत्तींचा मोठा परिणाम होत आहे. वारंवार नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीच्या उत्पादकतेला मोठा फटका बसत आहे. तापमानातील वाढीमुळे २०३५ पर्यंत अन्नधान्याच्या महागाईत वर्षाला ३.२ टक्क्यांपर्यंत वाढ होईल आणि त्यामुळे एकूण महागाईत वर्षाला १.१८ टक्क्यांची भर पडेल, असे संशोधकांनी म्हटले आहे.

हेही वाचा : जर्मन फुटबॉल संघटनेची पसंती जर्मन Adidas ऐवजी अमेरिकन Nike ला… या निर्णयाविरोधात जर्मनीत जनक्षोभ कशासाठी?

सर्वाधिक फटका कोणाला?

जगभरात सध्या उष्ण वातावरणाचे महिने वाढले असून, त्यामुळे महागाईही दिसून येत आहे. भविष्यातही तापमान बदलाचा जगभरातील महागाईवर परिणाम दिसून येणार आहे. उच्च आणि अल्प उत्पन्न गटातील देशांना ही समस्या सारखीच जाणवणार आहे. असे असले तरी दक्षिणेकडील आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील देशांना याचा मोठा फटका बसेल, असे संशोधनात म्हटले आहे. कारण दक्षिणेकडील देशांमध्ये आताच तापमानाने उच्चांकी पातळी गाठली आहे. त्याचा परिणाम अन्नपुरवठा साखळीवर मोठ्या प्रमाणात होत आहे. सध्या या देशांमध्ये उच्चांकी तापमान असल्याने आणखी तापमान वाढल्यास त्याचा मोठा फटका पिकांना बसेल, असेही संशोधनात नमूद करण्यात आले आहे. शीत कटिबंधात उष्ण हवामानाच्या कालखंडात सरासरी मासिक तापमान वाढल्यास काही काळ महागाई वाढेल. याउलट थंड हवामानाच्या कालखंडात सरासरी मासिक तापमान वाढल्यास काही काळ महागाई कमी होईल. याचवेळी उष्ण कटिबंधात सरासरी मासिक तापमान वाढल्यास संपूर्ण वर्षभर महागाई कायम राहील.

एक अंशाने तापमान वाढल्यास?

सरासरी मासिक तापमान एक अंश सेल्सियसने वाढल्यास त्याचा परिणाम महागाईवर वर्षभर दिसून येईल. केवळ तापमानाचा वाढलेला पारा हा महागाई वाढविण्यास कारणीभूत ठरणार नसून, यात पाऊसही तेवढीच महत्त्वाची भूमिका बजावेल. जास्त पाऊस पडल्यास ओल्या दुष्काळामुळे वर्षभर महागाईतील वाढ कायम राहील. दुष्काळी परिस्थितीचा अल्पकाळ परिणाम महागाईवर होत असल्याचे निरीक्षणही संशोधकांनी नोंदविले आहे. त्यांनी यासाठी युरोपातील २०२२ मधील कडक उन्हाळ्याचे उदाहरण दिले आहे. त्यावेळी युरोप खंडात अन्नधान्याची महागाई ०.४३ ते ०.९३ टक्के वाढली. सध्या तापमानात होणारी वाढ गृहित धरल्यास २०३५ पर्यंत महागाईत ३० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ होईल, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : विश्लेषण : एकाच वेळी ११ पाणबुड्या हिंद महासागरात तैनात… भारतीय नौदलाचे चीनवर लक्ष?

हरित वायू उत्सर्जन कमी केल्यास?

हरित वायू उत्सर्जन कमी केल्यास नैसर्गिक आपत्तींची तीव्रता कमी होण्यास मदत होईल, असा संशोधकांचा अंदाज आहे. ही तीव्रता कमी झाल्यास आपोआप अन्नधान्याची महागाई नजीकच्या भविष्यात आटोक्यात राहील. मानवी उत्सर्जनामुळेच भविष्यात प्रतिकूल नैसर्गिक घटनांची तीव्रता वाढणार आहे. तापमानात दिवसेंदिवस होणारी वाढ सर्वच घटकांवर प्रतिकूल परिणाम करणारी ठरणार आहे. त्याचा फटका प्रामुख्याने शेतीच्या उत्पादकतेला बसणार असल्याने भविष्यातील हे संकट टाळण्यासाठी उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेने प्रयत्न करायला हवेत. याचबरोबर तंत्रज्ञानाधारित पर्यावरणपूरक बदल स्वीकारल्यासही तापमानातील बदल काही प्रमाणात कमी होऊन जागतिक अर्थव्यवस्थेचा धोका कमी होईल, असा आशावादही संशोधकांनी व्यक्त केला आहे.

sanjay.jadhav@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changes in temperature and its impact on inflation findings from new research print exp css
First published on: 31-03-2024 at 08:19 IST