जर्मन फुटबॉल संघटनेने आदिदास या स्पोर्ट्सवेअर कंपनीबरोबर असलेला ७७ वर्षांचा करार मोडीत काढायचे ठरवले आहे. गेली अनेक वर्षे जर्मनीचा फुटबॉल संघ आणि आदिदास हे समीकरण फुटबॉल चाहत्यांच्या परिचयाचे झाले होते. परंतु जर्मन फुटबॉल संघटनेने ‘किट स्पॉन्सर’ म्हणून अमेरिकेच्या नायके कंपनीशी करार केला आहे. जर्मन कंपनीशी काडीमोड घेऊन अमेरिकन कंपनीला जवळ करण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला आहे. या निर्णयाविरोधात जर्मन जनमत प्रक्षुब्ध झाले आहे.  

आदिदासबरोबर करार कधी संपुष्टात?

मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जर्मन फुटबॉल संघटनेने (डीएफबी) याविषयी घोषणा केला. आदिदास कंपनीबरोबर करार २०२७मध्ये संपुष्टात येईल आणि त्या वर्षापासून पुढील सात वर्षे (२०३४) अमेरिकेची नायके स्पोर्ट्सवेअर कंपनी ही संघटनेची अधिकृत किट स्पॉन्सर असेल. याचा अर्थ जर्मन फुटबॉल संघटनेशी संलग्न सर्व उपसंघटना – पुरुष, महिला, ज्युनिअर फुटबॉलपटूंच्या – नायकेचा लोगो असलेले पोशाख सर्व महत्त्वाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमध्ये वापरतील. अर्थात तोपर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये जर्मन संघ आदिदासचाच पोशाख वापरतील.

हेही वाचा >>> विश्लेषण : अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी का होत नाही?

आदिदासशी करार का मोडीत?

जर्मन फुटबॉल संघटना ही ना-नफा स्वरूपाची संस्था आहे. या संघटनेचा निधी सरकारी अनुदान आणि स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून येतो. गेल्या काही वर्षांमध्ये संघटनेच्या तिजोरीत खडखडाट दिसून येऊ लागला होता. आदिदासबरोबरचा करार २०२६मध्ये संपुष्टात येत आहे. त्याच्या दोन वर्षे कराराचे नूतनीकरण वा नवीन करार करणे जर्मन फुटबॉल संघटनेवर बंधनकारक होते. आदिदासने नवीन कराराअंतर्गत ५ कोटी युरो (५.४ कोटी डॉलर) देऊ केले होते. नायकेने त्याच्या दुप्पट म्हणजे १० कोटी युरो (१०.८ कोटी डॉलर) देऊ केले. ही ऑफर जर्मन फुटबॉल संघटनेसाठी नाकारण्यासारखी नव्हतीच. जर्मन फुटबॉल संघटनेने निव्वळ आर्थिक विचार करत नायकेच्या ऑफरला होकार कळवला. विशेष म्हणजे अलीकडेच जर्मन संघासाठीचा नवा पोशाख आदिदासने जगासमोर आणला. येत्या जून महिन्यात जर्मनीतच होत असलेल्या युरो २०२४ स्पर्धेसाठी जर्मन संघ आदिदासने बनवलेल्या नव्या पोशाखात खेळताना दिसेल. 

हेही वाचा >>> विश्लेषण: केसांमधील उवांचा आणि माणसाच्या अंग झाकण्याचा काय संबंध? उत्क्रांतीचा इतिहास व नवे संशोधन काय सांगते?

नायके विरुद्ध आदिदास…

स्पोर्ट्सवेअरच्या दुनियेत या दोन बलाढ्य कंपन्यांमध्ये नेहमीच स्पर्धा असायची. आता ती नाही. कारण नायकेचा पसारा खूपच वाढलेला आहे. या कंपनीचा वार्षिक नफाच ६०० कोटी डॉलर इतका आहे. त्या तुलनेत दुसऱ्या क्रमांकावर असूनही आदिदासचा वार्षिक नफा जवळपास २८९ कोटी डॉलर इतका आहे. त्यामुळे जर्मन फुटबॉल संघटनेसाठीचा सौदा नायकेला परवडतो. पण १०.८ कोटी डॉलर जर्मन फुटबॉल संघटनेला देणे आदिदाससाठी तितके सोपे ठरले नसते. यापूर्वी २००६मध्येही नायकेने जर्मन फुटबॉल संघटनेला ऑफर दिली होती. त्यावेळी आपण आदिदासला तोंडी आश्वासन दिल्याचे सांगून जर्मन फुटबॉल संघटनेने वेळ मारून नेली होती. 

प्रतिक्रिया कशा?

जर्मनीतील झाडून सगळ्या राजकीय पक्षांनी (या डावे, उजवे, मधले असे सगळेच येतात) या निर्णयावर टीका केली. आदिदास आणि जर्मन फुटबॉल हे नाते सत्तर वर्षांहूनही अधिक जुने आहे, याचे स्मरण बहुतेकांनी करून दिले. आदिदास हा अस्सल जर्मन ब्रँड, फुटबॉल हा जर्मनीतील सर्वाधिक लोकप्रिय खेळ. मग या नात्यास बाधा आणण्याचे कारणच काय, अशा आशयाच्या प्रतिक्रियांचा पाऊस समाजमाध्यमांवर पडला. जर्मन सरकारमधील अनेक मंत्रीही टीकामोहिमेत सहभागी झाले. जर्मन फुटबॉल संघाच्या अलीकडील अपयशाकडून आणि विशेषतः दोन महिन्यांत सुरू होत असलेल्या युरो स्पर्धेत जर्मन संघाकडून लक्ष इतरत्र वळवण्यासाठी फुटबॉल संघटनेने नेमका याच वेळी सौदा केला अशीही टीका होत आहे. २०१४मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर जर्मनीच्या पुरुष फुटबॉल संघाची मुख्य स्पर्धांमधली कामगिरी अतिशय सुमार झालेली आहे. ती यंदा मायदेशातील स्पर्धेत तरी सुधारेल अशी आशा लाखो जर्मन फुटबॉलचाहत्यांना वाटते. 

पुढे काय?

जर्मन फुटबॉल संघटनेच्या निर्णयाला त्यांच्या संचालक मंडळाकडून अंतिम मंजुरी मिळायची आहे. ती मिळेल, अशीच शक्यता आहे. सध्याच्या घडीला जर्मनी, अर्जेंटिना, स्पेन, इटली हे प्रमुख संघ आदिदासचे स्पोर्ट्सवेअर सर्व प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये वापरतात. या यादीतून जर्मनी हे नाव तीन वर्षांनी कमी होईल.