Open relationships India विवाह म्हणजे दोन हृदयांना जोडणारे बंधन असते, असे मानले जाते. आपल्या भारतीय संस्कृतीत विवाहाला विशेष महत्त्व आहे. देव-ब्राह्मणांच्या साक्षीने, तसेच आपल्या नातेवाइकांच्या उपस्थितीत विवाहाचा सोहळा पार पडतो. विवाह हे अगदी पवित्र नाते मानले जाते आणि विवाहबाह्य संबंध या नात्यात गैर मानले जातात. परंतु, आता विवाहाची ही संकल्पना बदलत चालली आहे. तिशीत असणारे लोक आता ‘ओपन मॅरेज’ (Open Marriage) हा पर्याय निवडत आहेत. नुकत्याच व्हायरल झालेल्या इन्फ्लुएन्सर वाग्मिता सिंगच्या एका ‘रील’ने या विषयावर पुन्हा एकदा चर्चा सुरू केली आहे. ओपन मॅरेज म्हणजे नक्की काय? हा ट्रेंड का वाढतोय? विवाहाची संकल्पना आता बदलत आहे का? त्याचा काय परिणाम होणार? याविषयी सविस्तर समजून घेऊयात…

लोक ‘ओपन मॅरेज’चा पर्याय का निवडत आहेत?

  • डेटिंग ॲप ‘ग्लीडेन’च्या (भारत) कंट्री मॅनेजर सिबिल शिडेल यांनी ‘इंडिया टुडे’ला सांगितले, “भारतात ठरवून केलेले विवाह अजूनही मोठ्या प्रमाणात होतात; पण विवाहाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. विशेष म्हणजे तिशीतील लोकांमध्ये हा बदल पाहायला मिळत आहे. या वयातील अनेक लोक आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेत आणि त्यांच्या नात्यांबद्दलच्या अपेक्षा स्पष्ट आहेत.”
  • शिडेल पुढे सांगतात, ” ‘ग्लीडेन’नं केलेल्या एका सर्वेक्षणात असं दिसून आलं आहे की, ३५ टक्के लोक सध्या ‘ओपन रिलेशनशिप’मध्ये आहेत आणि ४१ टक्के लोकांनी सांगितलं की, जर त्यांच्या जोडीदारानं असं सुचवलं तर तेदेखील हा पर्याय निवडतील.
  • “हे दर्शवतं की, पर्यायी नातेसंबंधांबद्दल म्हणजे अगदी ठरवून केलेल्या विवाहामध्येही अधिक मोकळेपणा येत आहे,” असे शिडेल म्हणाल्या.
डेटिंग ॲप ‘ग्लीडेन’च्या (भारत) कंट्री मॅनेजर सिबिल शिडेल यांनी ‘इंडिया टुडे’ला सांगितले, भारतात ठरवून केलेले विवाह अजूनही मोठ्या प्रमाणात होतात; पण विवाहाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

याचदरम्यान, गुप्त नातेसंबंधांसाठी असलेल्या ‘ॲशले मॅडिसन’ (Ashley Madison) या प्लॅटफॉर्मच्या आकडेवारीनुसार लहान भारतीय शहरांमध्येही आता ‘अपारंपरिक’ नातेसंबंधांबद्दल (Non-traditional relationships) अधिक मोकळेपणा दिसून येत आहे. या यादीत कांचीपुरम शहर सर्वांत पुढे आहे. तिथे विवाहबाह्य संबंधांमध्ये (Extra-marital affairs) सर्वाधिक रस दिसून आला आहे. याव्यतिरिक्त दिल्लीतील रिलेशनशिप काउन्सिलर रुची रुह सांगतात की, लोकांना नेहमीच काहीतरी नवीन करण्याची ओढ असते, खासकरून विवाहानंतरच्या टप्प्यात. “पूर्वी अनेक लोक ‘गैर-नैतिक’ पद्धतींचा वापर करीत होते; पण आता ते ‘नैतिक नॉन-मोनोगॅमी’ (Ethical non-monogamy) म्हणजेच ‘ओपन मॅरेज’सारख्या पर्यायांबद्दल अधिक जागरूक झाले आहेत,” असे त्या सांगतात.

त्या पुढे म्हणतात, “आता अनेक जोडप्यांना विवाहाच्या सामाजिक अपेक्षा, स्वातंत्र्य आणि नवीन गोष्टी शोधण्याच्या त्यांच्या वैयक्तिक इच्छा यांचा समतोल साधायचा आहे. भारतात हे अजूनही मुख्य प्रवाहात आलेलं नाही; पण काही ठरावीक वर्तुळात याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.” मात्र, मुंबईतील रिलेशनशिप एक्स्पर्ट व लेखिका शहाझीन शिवदासानी यांना वाटतं की, ‘ओपन मॅरेज’ खूप दुर्मीळ आहेत. “विवाहबंधनात बांधले जाणारे बहुतांश लोक लोक स्थिरता, कुटुंब, समान मूल्यं आणि आयुष्याकडे बघण्याचा समान दृष्टिकोन शोधत असतात. त्यामुळे ‘मोनोगॅमी’ (एकाच व्यक्तीशी निष्ठा) हीच अजूनही लोकांची मुख्य अपेक्षा आहे.”

विवाहाची बदलती संकल्पना आणि वयाचा संबंध काय?

मुंबईतील जोडप्यांच्या आणि कुटुंबांच्या समुपदेशक (counselor) प्रियांका कपूर स्पष्ट करतात की, लोक तिशीत पोहोचेपर्यंत त्यांचा भर करिअर घडवणे आणि कुटुंब नियोजन करण्यावर असतो. या टप्प्यात त्यांना आलेल्या अनुभवांचा त्यांच्या विवाहाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर परिणाम होतो. या वयात व्यावहारिकता जास्त महत्त्वाची ठरते. कौटुंबिक अपेक्षा व जबाबदाऱ्या निर्णय घेण्यावर मोठा प्रभाव टाकतात.

त्यामुळेच जेव्हा ‘ओपन मॅरेज’ होतात, तेव्हा ते तिशीतील लोकांमध्ये जास्त सामान्य असतात. कारण- ते त्यांच्या वैयक्तिक गरजा आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करीत असतात. रुची रुह यांनीही वयाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. तिशीपर्यंत अनेक जोडप्यांना विशेषतः विशीत लग्न केलेल्यांना विवाहातला उत्साह कमी झाल्याचा अनुभव येऊ लागतो. त्यामुळे काहींना इतर लोकांशी लैंगिक किंवा भावनिक संबंध जोडण्याची इच्छा होते.

‘ओपन मॅरेज’चा ट्रेंड भारतात वाढतोय का?

शिडेल म्हणतात, “भारतात ‘ओपन मॅरेज’ अजूनही काही ठरावीक लोकांपर्यंत मर्यादित असले तरी त्यांना हळूहळू स्वीकारले जात आहे.” ‘ग्लीडेन’च्या आकडेवारीनुसार, टियर १ शहरांमध्ये याचा स्वीकार अधिक आहे; पण टियर २ शहरांमध्येही ‘नॉन-मोनोगॅमी’बद्दल (अनेक लोकांशी संबंध ठेवणे) उत्सुकता वाढत आहे. शिडेल स्पष्ट करतात की, या बदलाची कारणं म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य, जागतिक संस्कृती व विचारांचा प्रभाव आहे. रुची रुह सांगतात की, ‘ओपन मॅरेज’साठी पारदर्शकता, विश्वास व भावनिक परिपक्वता आवश्यक आहे. भारतात जिथे कुटुंबाचा सहभाग, सामाजिक दबाव व गोपनीयतेचा अभाव आहे, तिथे ‘ओपन मॅरेज’ टिकवून ठेवणं आव्हानात्मक असू शकतं.

“हे शक्य आहे आणि अनेक लोक भारतात ‘ओपन मॅरेज’चा पर्याय निवडत आहेत; पण बहुतेक जण अजूनही ते गुप्त ठेवतात,” असे त्या म्हणतात. शिवदासानीही या मताशी सहमत आहेत की, ‘ओपन मॅरेज’ संकल्पना भारतात अजूनही मुख्य प्रवाहात आलेली नाही. काही प्रगतिशील किंवा विशिष्ट वर्तुळात ती संकल्पना स्वीकारली गेली असली तरी देशाच्या खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक मूल्यांमुळे ती मोठ्या प्रमाणात पसरेल, अशी शक्यता फारच कमी आहे.

‘ओपन मॅरेज’मधील भावनिक धोके कोणते?

‘ओपन मॅरेज’मध्ये दोन विवाहित जोडीदार एकमेकांच्या विवाहबाह्य संबंधांना सहमती देतात. लग्नानंतरही बाहेर अफेअर असल्यास ती फसवणूक मानली जात नाही. रुची रुह स्पष्ट करतात की, ‘ओपन मॅरेज’मध्ये ईर्षा, असुरक्षितता व जोडीदाराच्या प्रेमाची भीती यांसारखी आव्हाने येतात. स्पष्ट संवाद आणि पारदर्शकता असूनही काहींना आपुलकी कमी झाल्याचे जाणवू शकते. स्पष्ट मर्यादा निश्चित नसतील, तर एका जोडीदाराला दुर्लक्षित किंवा फसवले गेल्यासारखे वाटू शकते. भारतासारख्या संस्कृतीमध्ये ही गोष्ट अपमानास्पद वाटू शकते. काही लोक मानतात की, ‘ओपन मॅरेज’मुळे त्यांना स्वातंत्र्य मिळते, तर काही याला प्रामाणिकपणाचे प्रतीक मानतात. मात्र, भारतीय संस्कृतीत या संकल्पनेचा परिणाम कसा होईल, हे येणारा काळच सांगेल.