चीनमध्ये चिकुनगुनियाचा उद्रेक झाला आहे. चीनमध्ये जुलैपासून चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत वेगाने वाढ झाली असून, रुग्णसंख्या ८ हजारांहून अधिक आहे. हा डासांमुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. सर्वसाधारणपणे या आजाराच्या रुग्णाला ताप आणि सांधेदुखीचा त्रास होतो. सांधेदुखीचा त्रास दीर्घकाळ राहत असल्याने त्याचे गंभीर परिणाम रुग्णाच्या जीवनमानावर होतात. रुग्ण अगदी हातात पेन अथवा फोनही पकडू शकत नाही, अशी त्याची अवस्था होते. या पार्श्वभूमीवर जागतिक संघटनेने २० वर्षांपूर्वीच्या चिकुनगुनियाच्या जागतिक उद्रेकाची चिन्हे पुन्हा दिसू लागल्याचा इशारा दिला आहे.
जगभरात प्रादुर्भाव किती?
जगात चिकुनगुनियाचे या वर्षभरात २ लाख ४० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यात दक्षिण अमेरिकेत २ लाख रुग्ण असून, चीनमध्ये ८ हजार रुग्ण आहेत. अमेरिका अथवा कॅनडामध्ये रुग्णसंख्येत वाढ झालेली नाही. मात्र, फ्रान्स आणि इटलीमध्ये रुग्ण आढळून येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने चिकुनगुनिया संसर्गाबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. याआधी २००४ -०५ मध्ये चिकुनगुनियाचा उद्रेक झाला होता. त्यावेळी ५ लाखांहून अधिक जणांना संसर्ग झाला होता. त्याचीच पुनरावृत्ती होण्याची चिन्हे दिसून येत आहेत, असे संघटनेचे म्हणणे आहे.
सर्वाधिक संसर्ग कुठे?
चीनमधील गुआंगडोंग या प्रांतातील फोशान शहरात संसर्ग जास्त आहे. तसेच, फोशान शेजारील १२ इतर शहरांमध्ये रुग्ण वाढत आहेत. फोशानवरून प्रवास करून गेलेल्या हाँगकाँगमधील १२ वर्षीय मुलाला चिकुनगुनियाचा संसर्ग झाला आहे. या रोगाचा संसर्ग थेट एका मनुष्यापासून दुसऱ्या मनुष्याला होत नाही. संसर्ग झालेल्या रुग्णाला चावलेला डास दुसऱ्या व्यक्तीला चावल्यास त्याला संसर्ग होतो. चीनमध्ये ९५ टक्के रुग्णांना आठवडाभरानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. मात्र, अचानक रुग्णसंख्येत झालेल्या वाढीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उपाययोजना काय?
चीनमध्ये मुसळधार पाऊस आणि जास्त तापमान यामुळे डासोत्पत्ती वाढली असून, त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. चिकुनगुनियाच्या उद्रेकानंतर चीनने करोना संकटकालीन उपाययोजना सुरू केल्या आहेत. चिकुनगुनियाच्या रुग्णांना रुग्णालयात दाखल होऊन तिथे सात दिवस राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. रुग्णालयात रुग्णांना मच्छरदाणीत ठेवले जात आहे. आठवडाभर रुग्णालयात राहिल्यानंतर रुग्णाची पुन्हा चाचणी केली जाते. ही चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णाला घरी सोडले जात आहे. याचबरोबर ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने डासोत्पत्ती स्थाने शोधण्यात येत आहेत. डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करण्यावर भर दिला जात आहे. पाणी साठवून डासोत्पत्तीस कारणीभूत ठरणाऱ्या नागरिकांना प्रशासनाकडून १० हजार युआन ( सुमारे १,४०० डॉलर) दंड केला जात आहे. याचबरोबर काही ठिकाणी नियमभंग करणाऱ्या नागरिकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.
पहिल्यांदा कुठे आढळला?
चिकुनगुनियाचा पहिला रुग्ण टांझानियामध्ये १९५२ मध्ये आढळला. त्यावेळी या रोगाचा विषाणू सर्वप्रथम सापडला. तेव्हापासून आतापर्यंत ११० देशांमध्ये या विषाणूचा प्रसार झाला आहे. चिकुनगुनिया हा शब्द दक्षिण टांझानियातील किमाकोंडे या भाषेतून आला आहे. याचा अर्थ ‘वाकविणारा’ असा आहे. या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांना सांधेदुखीमुळे चालणे, बसणे, उठणे यांसारख्या हालचाली करण्यासही त्रास होतो. त्यातून त्याची देहबोली बदलून जाते आणि रुग्ण वाकून चालू लागतो. त्यातूनच या रोगाला हे नाव देण्यात आले.
लक्षणे कोणती?
एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस या डासांच्या माध्यमातून चिकुनगुनियाचा प्रसार होतो. विषाणूबाधित डास चावल्यानंतर तीन ते सात दिवसांत रुग्णामध्ये ताप आणि सांधेदुखी अशी लक्षणे दिसून येतात. याचबरोबर डोकेदुखी, स्नायूदुखी, सांध्यावर सूज आणि अंगावर लालसर चट्टे उठणे अशी लक्षणे दिसतात. बहुतांश रुग्ण हे संसर्ग झाल्यानंतर आठवडाभरात बरे होतात. मात्र, काही रुग्णांमध्ये सांधेदुखी तीव्र स्वरूपाची असते. हा त्रास काही महिने राहतो. यामुळे रुग्णांना दैनंदिन गोष्टी करण्यातही अडचणी येतात. या रोगामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण मात्र नगण्य आहे. नवजात अर्भके, ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधीग्रस्त नागरिकांना या रोगाचा धोका अधिक असतो.
उपचार कोणते?
चिकुनगुनियाच्या विषाणूवर सध्या दोन लसी उपलब्ध आहेत. मात्र, त्या महागड्या असल्याने त्यांचा वापर जगभरात अतिशय मर्यादित स्वरूपात आहे. सर्वसामान्य रुग्णांसाठी अद्याप कोणतेही विशिष्ट औषध उपलब्ध नाही. रुग्णाच्या लक्षणांनुसार डॉक्टरांकडून उपचार केले जात आहेत. रुग्णाला आराम, जास्तीत जास्त द्रवपदार्थ देणे आणि ॲसेटामिनोफेनसारख्या औषधांचा वापर केला जातो. ॲस्पिरीन आणि इतर वेदनाशामक औषधांचा वापर टाळण्याच्या सूचना केल्या जातात. चिकुनगुनिया आणि डेंग्यूचे लक्षणे सुरुवातीला सारखीच असल्याने चाचणी करून त्यानुसार योग्य औषधोपचार करण्यास प्राधान्य दिले जाते. डास चावल्यामुळे हा रोग होत असल्याने डास चावू नयेत, याची खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो.
sanjay.jadhav@expressindia.com