सध्याच्या काळात प्रत्येक जण टेन्शन, स्ट्रेस, जबाबदाऱ्या यामध्ये अडकलेला दिसतो. प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्य यांची सांगड घालताना प्रत्येकाचीच दमछाक होते. त्यात लोकांच्या लाइफस्टाईल, आहारात झालेला बदल हाही या टेन्शन आणि स्ट्रेसमागचं कारण आहेच. यावर काय उपाय काढला जाईल… योगा, आहारात बदल किंवा एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेतली जाईल. पण, स्ट्रेस कमी करण्यासाठी चोखणी म्हणजेच पॅसिफायरचा वापर आपल्या जवळच्याच देशात केला जात आहे. हो, हे खरं आहे. चीनमधल्या लोकांनी स्ट्रेस कमी करण्यासाठी चोखणी हा पर्याय शोधून काढला आहे. साधारणपणे लहान बाळांना शांत करण्यासाठी त्यांच्या तोंडात चोखणी दिली जाते. हीच चोखणी स्ट्रेस कमी करण्यासाठी प्रौढ व्यक्ती वापरू लागले आहेत. पण, चोखणी वापरल्याने खरंच स्ट्रेस कमी होत असेल का? काय आहे यामागचं खरं कारण; ते या विश्लेषणातून जाणून घेऊ…

बाळांच्या चोखणीचा वापर का केला जात आहे?

चोखणीचा वापर करत असलेल्यांकडे ती वापरण्यामागे बरीच कारणं आहेत. तणावाच्या परिस्थितीत शांतता मिळावी म्हणून पॅसिफायरचा वापर केला जात आहे; तर काही जण झोप येण्यास मदत व्हावी म्हणून याचा वापर करत आहेत. असे साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालात सांगितले आहे. अनेक खरेदीदारांनी त्यांना चिंता कमी करण्यासाठी तसंच काहींनी धूम्रपान सोडण्यास मदत होते म्हणून याचा वापर केला.

ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादावरून या उत्पादनांबाबत आकर्षण स्पष्ट दिसून आले. एका वापरकर्त्याने सोशल मीडियावर लिहिले आहे की, पॅसिफायर हे चांगल्या दर्जाचे, मऊ आणि आरामदायी वाटते. हे मला श्वास घेण्यास अडथळा आणत नाही.” दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले की, “हे धूम्रपान सोडण्यास मदत करते. ते मला मानसिक आराम देते आणि धूम्रपान सोडण्याच्या काळात मला अस्वस्थ करत नाही.” आणखी एकाने सांगितले की, “कामामुळे जेव्हा तणाव वाढतो तेव्हा मी चोखणीचा वापर करतो. लहानपणापासूनच मला ते सुरक्षित वाटते.”

गेल्या काही महिन्यांत ताओबाओ आणि जेडी डॉट कॉम यांसारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर प्रौढांसाठीच्या या चोखणी उपलब्ध आहेत. त्यांच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रौढ व्यक्तींच्या तोंडाच्या आकाराची ही उत्पादने आहेत. याच्या किमती वेगवेगळ्या आहेत. या चोखण्या साधारण १० युआन ते ५०० युआन म्हणजेच १२० ते ६००० रुपयांपर्यंतच्या किमतीत उपलब्ध आहेत. चिनी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, काही ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स आता दरमहा हजारो पॅसिफायर्स विकत आहेत. या चोखणीचा प्रचारही तसाच केला जात आहे. आराम वाढवणे, झोपेची गुणवत्ता सुधारणे, मानसिक आराम देणे, धूम्रपान सोडण्यास मदत करणे आणि श्वास घेण्यात अडथळा न येणे अशाप्रकारे याची जाहिरात केली जात आहे.

तज्ज्ञांनी नुकसानाबाबत दिला इशारा

अनेक ग्राहक चोखणीच्या फायद्यांबद्दल सांगत असले तरी आरोग्यतज्ज्ञ संभाव्य शारीरिक नुकसानाबद्दल इशारा देत आहेत. मानसिक आरोग्याच्या विषयावर काम करणाऱ्यांचं म्हणणं आहे की, ही एक मानसिक प्रतिक्रिया आहे. यामध्ये प्रौढ लोक खूप जास्त ताण किंवा भावनिक तणावाचा सामना करताना त्यांच्या लहानपणीच्या आठवणींकडे पुन्हा वळताना दिसत आहेत. त्यांच्या मते ही चोखणी तात्पुरती का होईना सुरक्षिततेची भावना निर्माण करते आणि भावनिक ताण कमी करते. एका मानसशास्त्रज्ञांनी याबाबत सांगितले की, “स्ट्रेसवर खरा उपाय म्हणजे स्वत:ला लहान मुलांसारखे वागवणे नाही तर आव्हानाला थेट तोंड देणे आणि उपाय काढणे हा असू शकतो.”

चेंगडू इथले डेन्टिस्ट तांग काओमिन यांनी याबाबत असा इशारा दिला की, चोखणी दीर्घकाळासाठी वापरली तर तुमच्या दातांची ठेवण बिघडू शकते. तसंच वारंवार याचा वापर केल्याने जबड्याची हालचाल कमी होते आणि अन्न खाताना वेदना होऊ शकतात. आरोग्यतज्ज्ञ असाही इशारा देतात की, तणावाचा सामना करण्यासाठी पॅसिफायरवर अवलंबून राहिल्याने मानसिक परिस्थिती तात्पुरती लपवता येते, मात्र या समस्या कालांतराने वाढू शकतात.

सोशल मीडियावर चर्चा

प्रौढांनी उघडपणे पॅसिफायर वापरल्याने याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. यावर नेटकऱ्यांनीदेखील बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या प्रकाराला वेडेपणा, मूर्खपणाचा कहर म्हटलं आहे; तर काहींनी याला वाढत्या भावनिक संवेदनशीलतेचे लक्षण म्हटले आहे. सोशल मीडियावर काही व्हिडीओंमध्ये अमेरिका आणि दक्षिण कोरियामधील लोक वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये दिवसाच्या मध्येच किंवा झोपण्यापूर्वी आराम करण्यासाठी चोखणीचा वापर करताना दाखवले आहे.