China builds record-breaking floating wind turbine: आपल्या सभोवतालचं जग झपाट्याने बदलत आहे. हवामानबदलाचा वाढता धोका, ऊर्जा संकटाची चाहूल आणि शाश्वततेसाठीची धडपड या सर्व पार्श्वभूमीवर चीनने खोल समुद्रात उभारलेली विक्रमी तरंगती पवनचक्की जणू आशेचा नवा किरण ठरली आहे. एका पवनचक्कीतून हजारो घरांना प्रकाश देणारी प्रचंड ऊर्जाशक्ती निर्माण होऊ शकते, ही कल्पनाच रोमांचित करणारी आहे. निसर्गाच्या प्रबळ वाऱ्यांना हाताशी घेत मानवजातीने उर्जेचा हा नवा मार्ग शोधला आहे, तो भविष्यातील स्वच्छ आणि सुरक्षित जगासाठीची एक मोठी झेप ठरू शकतो. एका चिनी अभियंत्यांने एक प्रोटोटाइप तरंगती पवनचक्की तयार केली आहे. या पवनचक्कीमुळे वीज निर्मितीचे अनेक विक्रम मोडले आहेत.
या नव्या पवनचक्कीमुळे ऊर्जानिर्मितीच्या नव्या युगाची सुरुवात होऊ शकते, असे मानले जाते. ही पवनचक्की चीन हुआनेंग ग्रुप आणि डोंगफांग इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन या दोन सरकारी कंपन्यांच्या संशोधनाचे फळ आहे. प्रत्येक पवनचक्की १७ मेगावॅट (MW) स्वच्छ वीज निर्माण करण्यास सक्षम असेल म्हणजेच एका वर्षात सुमारे ६.८ कोटी kWh ऊर्जा तयार होईल. अमेरिकेच्या ऊर्जा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, ही निर्माण होणारी वीज सुमारे ६३०० अमेरिकन घरांना पुरवठा करण्यासाठी पुरेशी आहे. ही वीज निर्माण करण्यासाठी नॅसेल म्हणजेच जनरेटर असलेल्या पवनचक्कीचा मध्यभाग ४८९ फूट (१५२ मीटर) उंच मनोऱ्यावर बसवलेला आहे. त्यावर ८६० फूट (२६२ मीटर) व्यासाची पाती जोडलेली आहेत. प्रत्येक स्वीप म्हणजे पंख्यांची ३६० अंशांतील पूर्ण फेरी तब्बल ५३,००० चौ. मीटर क्षेत्र व्यापते. हे क्षेत्र जवळजवळ आठ फुटबॉल मैदानाइतके आहे.
एका पवनचक्कीतून अधिकाधिक वीज निर्मिती करणे महत्त्वाचे ठरते. कारण यामुळे एका पवनऊर्जा प्रकल्पात बसवाव्या लागणाऱ्या पवनचक्क्यांची संख्या कमी होते. यामुळे एकूण खर्च कमी होतो आणि पवनचक्क्या प्रत्यक्षात वीजनिर्मिती सुरू करण्यापूर्वीचा कालावधीही कमी होतो. परंतु, खोल समुद्रात बसवलेल्या पवनचक्क्यांना मोठ्या वादळांसारख्या अत्यंत तीव्र हवामानाचा सामना करावा लागतो. चायना हुआनेंग ग्रुपने सांगितले की, ही प्रायोगिक पवनचक्की ७८ फूट (२४ मीटर) पेक्षा उंच लाटा आणि ६४ नॉट्स (७३ मैल प्रतितास) वेगाच्या तुफानी वाऱ्यांनाही तोंड देऊ शकते.
या पवनचक्कीच्या चाचण्यांचा येत्या काही महिन्यांत चीनमधील यांगजियांग किनाऱ्याजवळ सुरुवात होईल.
तरंगत्या पवनचक्क्या: ऊर्जा निर्मितीचा नवा मार्ग
किनाऱ्यापासून दूर खोल समुद्रात पवनऊर्जा प्रकल्प उभारणे महागडे असते आणि त्यातून तयार होणारी वीज जमिनीवरील पवनऊर्जेपेक्षा महाग असते. मात्र, समुद्रात पवनचक्क्या बसवल्यास त्यांना प्रबळ वारे सतत मिळतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ऊर्जानिर्मिती होऊ शकते आणि उत्पादन खंडित होण्याची शक्यता कमी होते.
बहुतेक समुद्रातील पवनचक्क्या या फिक्स्ड बॉटम असतात. म्हणजेच त्या समुद्रतळाशी घट्ट बसवलेल्या असतात. या पद्धतीत उथळ पाण्याच्या समुद्रात, सरासरी खोली फक्त २९५ फूट (९० मीटर) असते. पवनऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी ती किफायतशीर ठरते.
ध्या वापरल्या जाणाऱ्या फिक्स्ड ऑफशोअर पवनचक्क्यांबाबत:
- यूकेमधील डॉगर बँक विंड फार्ममध्ये GE Vernova Haliade-X या पवनचक्क्यांचा वापर होतो, त्यांची प्रत्येकी क्षमता १३ मेगावॅट आहे.
- डोंगफांग इलेक्ट्रिकने २०२५ साली २६ मेगावॅट क्षमतेच्या फिक्स्ड बॉटम पवनचक्कीची यशस्वीरित्या चाचणी केली आहे.
- अमेरिकेतील साउथ फोर्क विंड फार्ममध्ये Siemens Gamesa 11.0-200 DD या पवनचक्क्यांचा वापर होतो. या प्रत्येकी ११ मेगावॅट वीज निर्माण करतात आणि सध्या अमेरिकेच्या पाण्यातील सर्वात जास्त क्षमतेच्या पवनचक्क्या आहेत.
मात्र, नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनने (NOAA) म्हटलं आहे की, जगातील बहुतेक महासागर फिक्स्ड बॉटम पवनचक्क्यांसाठी योग्य नाहीत. कारण त्यांची सरासरी खोली तब्बल ३,६८२ मीटर (१२०८० फूट) आहे. आतापर्यंतची सर्वांत खोल समुद्रातील पवनचक्की SSE’s Seagreen Wind Farm मध्ये बसवली गेली असून, ती स्कॉटलंडच्या किनाऱ्यापासून ५८.६ मीटर खोल पाण्यात उभारली आहे.
पण ही खोली फिक्स्ड बॉटम पवनचक्क्यांसाठी खूपच जास्त मानली जाते. ESMAP ने म्हटले आहे की, ५० मीटरपेक्षा खोल पाणी फिक्स्ड बॉटम पवनचक्क्यांसाठी योग्य नाही. याचबरोबर, ग्लोबल विंड एनर्जी कौन्सिलने (GWEC) अंदाज वर्तवला आहे की, जगातील समुद्रातील ८०% पवनऊर्जा क्षमता १९५ फूट (६० मीटर) पेक्षा खोल पाण्यात आहे. जिथे फिक्स्ड बॉटम पवनचक्क्या उभारता येत नाहीत. म्हणूनच तरंगत्या पवनचक्क्यांचा वापर वाढल्यास, किनारपट्टी असलेले देश खोल पाण्यात पवनचक्क्या उभारून प्रचंड प्रमाणात वीज निर्मिती करू शकतील. उदाहरणार्थ, जपानसारख्या देशांमध्ये, ज्यांना त्यांच्या खोल समुद्री पाण्यामुळे पवनऊर्जा वापरणे कठीण झाले आहे, ते तरंगत्या पवनचक्क्या नवीकरणीय ऊर्जेचा मोठा स्रोत ठरू शकतात. जपानने २०४० पर्यंत ३०-४५ GW पवनऊर्जा निर्मितीचे ध्येय ठेवले आहे. त्यात तरंगत्या पवनचक्क्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असेल.