China’s 1,000 km Hypersonic Air-to-Air Missile Test: हवाई लढाईचे पारंपरिक नियम आता बदलण्याच्या मार्गावर आहेत. १,००० किमी अंतरावरही अचूक प्रहार करू शकणाऱ्या हायपरसॉनिक एअर-टू-एअर क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाल्याचा दावा चीनने केला आहे. या घडामोडीमुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली असून, भारतासह अनेक देशांसाठी हे गंभीर चिंतेचे कारण ठरत आहे.
बीजिंगच्या या कथित प्रगत क्षेपणास्त्र चाचणीमुळे स्टेल्थ जेट्सदेखील माऱ्याच्या टप्प्यात येऊ शकतात आणि अनेक देशांना हवाई युद्धनीति नव्याने आखावी लागू शकते. चीनने सुमारे १,००० किमीपर्यंतच्या जबरदस्त मारक क्षमतेसह एक क्रांतिकारी एअर-टू-एअर क्षेपणास्त्राची चाचणी केल्याचे वृत्त समोर आले आहे. हे विद्यमान क्षेपणास्त्रांपेक्षा अनेक पटींनी अधिक क्षमतेचे क्षेपणास्त्र असून हवाई दलांसाठी हा गंभीर चिंतेचा विषय ठरला आहे, असे लष्करी विश्लेषकांना वाटते.
‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार, अद्याप नाव न देण्यात आलेले हे क्षेपणास्त्र मॅक ५ पेक्षा अधिक वेगाने हायपरसॉनिक गती गाठू शकते आणि हवेतल्या हवेत शत्रूपक्षाच्या लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रांना ध्वस्त करण्याची त्याची क्षमता आहे, किंबहुना त्यासाठीच त्याची निर्मिती करण्यात आली आहे. अमेरिकेच्या लढाऊ विमानाच्या ताफ्यांतील सर्वात सुरक्षित मानली जाणारी एफ-२२ रॅप्टर, एफ-३५ लाइटनिंग II आणि नवीन येऊ घातलेले बी-२१ रेडर यांसारखी स्टेल्थ फायटर विमानेही नष्ट करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.
बियॉन्ड व्हिज्युअल रेंज (How Does It Compare to Current BVR Missiles?)
वादग्रस्त क्षेत्रांमध्ये, विशेषतः तैवानची सामुद्रधुनी आणि दक्षिण चीनच्या संवेदनशील सागरी क्षेत्रांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चीन हे क्षेपणास्त्र विकसित करत असल्याची माहिती चिनी संशोधकानेच स्थानिक वृत्तपत्राला दिली. हे नवे क्षेपणास्त्र ‘बियॉन्ड व्हिज्युअल रेंज’ (BVR) श्रेणीत मोडते, ही श्रेणी आधुनिक हवाई युद्धातील एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. मात्र, या क्षेपणास्त्राने ही संकल्पना त्याच्या मारक क्षमतेने अधिक विस्तारल्याची चर्चा संरक्षण क्षेत्रामध्ये आहे.

परिणाम काय होईल?
सध्या सेवेत असलेल्या सर्वात लांब पल्ल्याच्या BVR क्षेपणास्त्रांमध्ये रशियाचे R-37M आणि अमेरिकेचे AIM-174B यांचा समावेश होतो. त्यांची क्षमता सुमारे ३५०-४०० किमी आहे. भारताचे अस्त्र Mk-3 अद्याप विकसित होण्याच्या प्रक्रियेत आहे, त्याचे उद्दिष्टही ४०० किमीचे आहे. परंतु चीनने विकसित केलेले हे क्षेपणास्त्र तब्बल १,००० किमी अंतरावर प्रहार करण्याची क्षमता असल्याने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील ही एक मोठी झेप असल्याचे मानले जात आहे. याचा परिणाम चीनशी संबंधित देशांच्या लष्करी धोरणांवर होणे अपेक्षित असून त्यात भारताचाही समावेश होतो. याशिवाय या क्षेपणास्त्र निर्मितीमुळे प्रादेशिक समतोल बिघण्याची क्षमता असल्याचे मतही संरक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
स्टेल्थ आता सुरक्षित नाही?
अशा क्षेपणास्त्राचा सर्वात धोकादायक परिणाम म्हणजे स्टेल्थ विमानांच्या पारंपरिक फायद्यांना निष्प्रभ करण्याची त्याची क्षमता. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, इतक्या लांब पल्ल्यामुळे लपण्याची क्षमता असलेल्या AWACS आणि AEW\&C सारख्या विमानांनाही (जी लवकर इशारा देण्यासाठी आणि नेटवर्क केंद्रित युद्धप्रणालीसाठी अत्यावश्यक असतात) धोक्याची जाणीव होण्याआधीच ध्वस्त करता येवू शकते. अशा प्रकारचे क्षेपणास्त्र भारत, जपान, तैवान आणि अमेरिका यांसारख्या देशांना त्यांची हवाई संरक्षण धोरणे आणि कॉम्बॅट एअर पेट्रोलच्या पारंपरिक प्रक्रियेपेक्षा वेगळा विचार करण्यास भाग पाडेल.
भारताची चिंता वाढली
भारतातील दृष्टीने ही बातमी स्वदेशी क्षेपणास्त्र विकास गतीमान करण्याची तातडीची गरज अधोरेखित करते. अस्त्र Mk-1 सध्या कार्यरत आहे आणि Mk-2 पूर्णतेच्या जवळ पोहोचले आहे, मात्र Mk-3 आणि हायपरसॉनिक प्रकल्प अद्याप बहुतांश कागदावरच आहे. संरक्षण तज्ज्ञांनी हायपरसॉनिक गती, टार्गेट ट्रॅकिंग आणि काउंटर-स्टेल्थ प्रणालींमध्ये जलद प्रगती करण्यासाठी DRDO आणि ISRO यांच्यातील सहकार्य वाढविण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
बीजिंगकडून धोरणात्मक संदेश
या क्षेपणास्त्राचे अस्तित्व स्वतंत्रपणे पडताळले गेलेले नसले तरी, तज्ज्ञांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. “हा मानसिक युद्धाचा भाग असो वा धोरणात्मक संदेश, अशी प्रणाली वास्तवात अस्तित्वात असण्याची शक्यता गांभीर्याने घ्यावी लागेल,” असे एका वरिष्ठ संरक्षण संशोधकाने सांगितले. आधीच तणावग्रस्त असलेल्या या प्रदेशात या कथित क्षमतेने थरकाप उडवणारा संदेश दिला आहे: हवाई वर्चस्वासाठीची शर्यत नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे आणि मागे राहण्याची किंमत अत्यंत भीषण ठरू शकते, असेही त्यांनी सांगितले.
चीनच्या या कथित हायपरसॉनिक क्षेपणास्त्र चाचणीने हवाई युद्धनीति आणि जागतिक सामरिक समीकरणात नव्या अध्यायाची सुरुवात केली आहे. हे तंत्रज्ञान वास्तवात आले तर स्टेल्थ फायटरसारख्या आधुनिक विमानांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल. भारतासह आशिया-पॅसिफिकमधील प्रमुख राष्ट्रांनी आपली रणनीति, संरक्षण क्षमता आणि तांत्रिक प्रगती यांचा वेगाने पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे.
भविष्यातील हवाई वर्चस्वाची शर्यत केवळ वेग आणि अंतरावरच अवलंबून नसेल, तर तंत्रज्ञानातील आघाडीवर असेल. मागे राहण्याची किंमत केवळ आर्थिक नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते, असे तज्ज्ञांना वाटते.