चीनने स्वच्छ आणि सुरक्षित अणुऊर्जेच्या तंत्रज्ञानात मोठे यश मिळवले आहे. चीनने जगातील पहिली थोरियमवर चालणारी अणुभट्टी यशस्वीरीत्या लाँच केली आहे. हा प्रकल्प गांसु प्रांतातील वुई शहरातील गोबी वाळवंटात उभारण्यात आला आहे. चीनने अणुऊर्जेसाठी थोरियम वापरण्याच्या जागतिक स्पर्धेत मोठी आघाडी मिळवली आहे. विशेषतः चीनचे अमेरिकेबरोबर व्यापार युद्ध सुरू असताना हा विकास झाला आहे, जो चीनकरिता महत्त्वाचा मानला जात आहे. चीनने उभारलेली अणुभट्टी काय आहे? थोरियम म्हणजे काय? त्याचे महत्त्व काय? त्याविषयी जाणून घेऊ.

थोरियमवर चालणारी अणुभट्टी म्हणजे काय?

ऑक्टोबर २०२३ मध्ये थोरियम मोल्टन सॉल्ट रिअॅक्टर (टीएमएसआर) प्रकल्प दोन मेगावॉट वीज निर्माण करण्यासाठी डिझाइन करण्यात आला. या प्रकल्पात २०११ पासून ४४४ दशलक्ष डॉलर्सची मोठी गुंतवणूक करण्यात आली असून हा प्रकल्प थोरियमवर आधारित अणुऊर्जेचा जगातील पहिला प्रकल्प आहे. हा प्रकल्प येथवरच मर्यादित न ठेवता, २०३० पर्यंत चीनला अशा १० अणुभट्ट्या उभारायच्या आहेत. चिनी शास्त्रज्ञांनी कार्यान्वित असलेल्या थोरियम मोल्टन साल्ट अणुभट्टीत यशस्वीरीत्या नवीन इंधन टाकले आहे. त्यामुळे ही जगातील एकमेव चालू थोरियम अणुभट्टी मानली जात आहे.

चीनने जगातील पहिली थोरियमवर चालणारी अणुभट्टी यशस्वीरीत्या लाँच केली आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

थोरियम महत्त्वाचे का?

थोरियम इंधन म्हणून युरेनियमपेक्षा अनेक दृष्ट्या फायदेशीर आहे. कमी किरणोत्सर्गी कचरा, वापरण्यास सुरक्षित, वितळण्याचे धोके कमी यांसारखे थोरियमचे अनेक फायदे आहेत. परंतु, थोरियमचे इंधनात रूपांतर करण्यासाठी एका प्रक्रियेद्वारे त्याचे युरेनियम-२३३ (यू -२३३) मध्ये रूपांतर करावे लागते. त्याचा खर्च अधिक आहे; परंतु सुरक्षितता, शाश्वतता व दीर्घकालीन फायदे यांमुळे थोरियम भविष्यातील ऊर्जा प्रणालींसाठी एक पर्याय ठरू शकतो.

भारतात जगातील सर्वांत मोठा थोरियमचा साठा?

चीनने या प्रकल्पात पुढाकार घेतला असला तरी भारत अनेक दशकांपासून थोरियम संशोधनात आघाडीवर आहे. जगातील थोरियम साठ्यापैकी २५ टक्के साठा भारताकडे आहे. जागतिक स्तरावर सर्वांत मोठा साठा भारताकडे असल्याचे सांगितले जाते. डॉ. होमी भाभा यांच्या नेतृत्वाखाली विकसित केलेल्या देशाच्या अणु प्रकल्पात थोरियमचा वापर मुख्य ऊर्जा संसाधन म्हणून करण्याचे मुख्य उद्दिष्ट भारतासमोर आहे.

भारतात युरेनियमचा साठा मर्यादित प्रमाणात असल्यामुळे थोरियम भारतासाठी महत्त्वाचे ठरू शकते. भारतातही या तंत्रज्ञानावर काम होऊ शकते. १९५० च्या दशकात थोरियम संशोधनाला सुरुवात झाली. तीन टप्प्यांच्या अणु कार्यक्रमाने ही सुरुवात करण्यात आली होती. या कार्यक्रमातील शेवटचा टप्पा थोरियम इंधनयुक्त अणुभट्ट्यांवर केंद्रित होता. चीनचा थोरियम मोल्टन सॉल्ट अणुभट्टी प्रकल्प १९७० च्या दशकात सुरू झाला होता.

भारताचे अणुऊर्जा प्रकल्पाचे उद्दिष्ट

२०२५ ते २०२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात विकसित भारतासाठी अणुऊर्जा प्रकल्पावर भर देण्यात आला आहे. २०४७ पर्यंत १०० गिगावॉट अणुऊर्जा क्षमता साध्य करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टांमध्ये थोरियम, स्मॉल मॉड्युलर रिअॅक्टर्स (एसएमआर) यांचा समावेश आहे. २०३३ पर्यंत पाच स्वदेशी मॉडेल्स विकसित करण्याची योजना भारताने आखली आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात २०,००० कोटी रुपयांचे बजेट मंजूर करण्यात आले आहे. कल्पक्कम येथील प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर अणुभट्ट्या (पीएफबीआर) भारताच्या थोरियम रोडमॅपसाठी महत्त्वाच्या आहेत.

भारताच्या अणुप्रकल्पाचा विस्तार

जानेवारी २०२५ पर्यंत भारताची अणुऊर्जा क्षमता ८,१८० मेगावॉट इतकी आहे. २०३२ पर्यंत ही क्षमता २२,४८० मेगावॉटपर्यंत वाढवण्याची योजना आहे. भारतातील नवीन प्रकल्पांमध्ये पुढील प्रकल्पांचा समावेश आहे. त्यात काक्रापार येथे ७०० मेगावॉट क्षमतेचा स्थानिक अणुऊर्जा प्रकल्प, अमेरिकेच्या सहकार्याने कोव्वाडा येथे ६ x १२०८ मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प, राजस्थानमधील माही-बांसवारा प्रकल्प आदींचा समावेश आहे. अणु सुरक्षेच्या बाबतीत भारताचा रेकॉर्ड चांगला आहे. किरणोत्सर्गाचे प्रमाण जागतिक मानकांपेक्षा खूपच कमी आहे. जादुगुडा खाणींमध्ये अतिरिक्त युरेनियम साठ्यांचा अलीकडेच शोध लागल्याने येत्या काही दशकांमध्ये अणुइंधनाच्या बाबतील भारताचा आत्मविश्वास वाढला आहे.

थोरियम काय आहे?

थोरियम हा असा किरणोत्सर्गी पदार्थ आहे की, ज्यामुळे फार कमी कचरा निर्माण होतो. चीनने तयार केलेल्या अणुभट्टीमध्ये थोरियमचे द्रवरूप इंधन वापरले जात आहे. थोरियमच्या साह्याने जास्तीत जास्त आणि जलद वीज निर्माण करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यावर चीन भर देत आहे. थोरियम हे पृथ्वीच्या पृष्ठभागावर आढळणारे किरणोत्सर्गी तत्त्व आहे, ज्याचा इंधन म्हणून उपयोग होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तज्ज्ञांचे असे सांगणे आहे की, मंगोलियातील फक्त एक थोरियमने समृद्ध असलेली खाण चीनच्या ऊर्जा गरजा हजारो वर्षांपर्यंत पूर्ण करू शकते आणि मुख्य म्हणजे त्यामुळे खूप कमी किरणोत्सर्गी कचरा तयार होईल. थोरियम अणुभट्टी तंत्रज्ञान भविष्यात ऊर्जा उत्पादनाचा एक महत्त्वाचा भाग ठरू शकते. हे तंत्रज्ञान अत्यंत सुरक्षित आणि अधिक टिकाऊ आहे.