China’s Mosquito Sized Drone : पश्चिम आशियातील देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना चीन सध्या अत्याधुनिक शस्त्रं विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहे. लष्कराला सशक्त करण्यासाठी चीनमधील वैज्ञानिकही पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे. चिनी वैज्ञानिकांनी तयार केलेल्या एका ड्रोनची सध्या संपूर्ण जगभरात चर्चा रंगली आहे. त्यामागचं कारण म्हणजे – हा ड्रोन फक्त डासाच्या आकाराएवढा असल्याचं सांगितलं जात आहे. या ‘मायक्रो’ ड्रोनची यशस्वी चाचणी करण्यात आली असून, तो लवकरच लष्कराच्या सेवेत दाखल होणार आहे. दरम्यान, चिनी वैज्ञानिकांनी हा ड्रोन नेमका कसा तयार केला? त्याचा वापर कोणकोणत्या गोष्टींसाठी केला जाणार? याबाबत जाणून घेऊ…
चीनच्या नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजी (NUDT) येथील संशोधकांनी नुकताच अत्यंत सूक्ष्म आणि डासाच्या (मच्छराच्या) आकाराचा एक ड्रोन विकसित केला आहे, ज्याचा उपयोग मुख्यतः गुप्तचर मोहिमांसाठी (stealth military missions) केला जाणार आहे. हा ड्रोन इतका छोटा आहे की, तो सहजपणे एका बोटामध्ये धरता येतो आणि हवेत उडवता येतो. चीनच्या लष्करी दूरदर्शन वाहिनीवर या ड्रोनचे व्हिडीओ प्रसारित करण्यात आले आहेत. कार्यक्रमात सहभागी झालेल्या लियांग हेझियांग या विद्यार्थ्याने या ड्रोनचे प्रात्यक्षिक करून दाखविले आहे. “माझ्या हातात असलेल्या या ड्रोनचा वापर युद्धकाळात शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी करता येऊ शकतो”, असं त्यानं सांगितलं आहे.
चीनने तयार केलेला ड्रोन कसा आहे?
- डासाच्या आकाराच्या या ड्रोनमध्ये दोन छोटे पंख लावण्यात आलेले आहेत.
- या दोन्ही पंखाचा वापर करून हा ड्रोन अगदी सहजपणे हवेत उडू शकतो.
- तसेच या ड्रोनला डासासारखेच तीन छोटेछोटे पायही बसविण्यात आलेले आहेत.
- या ड्रोनची लांबी (१.३ सेंटीमीटर) रुंदी आणि त्याचा आकार अगदी डासाएवढाच आहे.
- हा ड्रोन हवेत उडविण्यासाठी एक अॅप तयार करण्यात आलं आहे.
- स्मार्टफोनमध्ये हे अॅप इन्स्टॉल करून या ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो.
आणखी वाचा : Iran Attack on Qatar : अमेरिकेच्या सर्वात मोठ्या लष्करी तळाला इराणने कसं लक्ष्य केलं?
डासाच्या आकाराचा ड्रोन कसा तयार करण्यात आला?
चीनच्या नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजी (NUDT)कडून विकसित करण्यात आलेला हा ड्रोन एका व्यापक संशोधन प्रकल्पाचा भाग आहे. या प्रकल्पात विविध प्रकारच्या रोबोटिक प्रणालींचा समावेश आहे. नुकत्याच पार पडलेल्या तांत्रिक प्रदर्शनात केवळ डासाच्या आकाराचे ड्रोनच नव्हे, तर माणसासारखे दिसणारे रोबोट्सही प्रदर्शित करण्यात आले होते, ज्यामुळे चिनी तंत्रज्ञानातील विस्तृत संशोधन आणि विकासाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. प्रात्यक्षिकांदरम्यान दाखविण्यात आलेला डासाच्या आकाराचा ड्रोन हा स्मार्टफोनद्वारे नियंत्रित करता येऊ शकतो. जरी हा ड्रोन आकारानं अत्यंत छोटा असला तरी त्याची अंतर्गत रचना अत्यंत उच्च दर्जाच्या साहित्याद्वारे करण्यात आली आहे. या ड्रोनमध्ये छोटा कॅमेरा, बॅटरी, आवाजाचे उपकरण व सेन्सर बसविण्यात आलेला आहे.
चीनने तयार केलेला ड्रोन कसे काम करतो?
चीनमध्ये डासाच्या आकाराच्या या सूक्ष्म ड्रोनच्या विकासासाठी विविध शाखांतील शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे सामूहिक योगदान घेतले जात आहे. त्यामध्ये मायक्रोसिस्टीम अभियांत्रिकी, प्रगत साहित्य विज्ञान आणि जैव-संवेदित (बायो-इन्स्पायर्ड) डिझाईन या क्षेत्रांचा समावेश आहे. हे सूक्ष्म ड्रोन गुप्तचर व माहिती संकलनाच्या मोहिमा पार पाडण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. या ड्रोनचा आकार डासासारखाच असल्यानं त्याला सहजगत्या ओळखणं अशक्य आहे. त्यामुळे शत्रूची नजर चुकवून हा ड्रोन युद्धभूमीवरील परिस्थितीची सहजपणे माहिती मिळवून, ती लष्कराला देऊ शकतो.

सूक्ष्म ड्रोन तंत्रज्ञानात चीनसह इतर देशांचीही आघाडी
सध्या चीनने तयार केलेल्या डासाच्या आकाराच्या ड्रोनने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले असले तरी यापूर्वी अनेक देशांनी सूक्ष्म ड्रोनचे संशोधन व त्याचा लष्करी वापर सुरू केला आहे. याआधी नॉर्वेतील Teledyne FLIR Defence या कंपनीने ‘ब्लॅक हॉर्नेट’ विकसित केलेला आहे. हेलिकॉप्टरसारखा दिसणारा हा ड्रोन फक्त तळहाताच्या आकाराएवढा आहे. २०२५ मध्ये ड्रोन विकसित करणाऱ्या या कंपनीला अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून ‘Blue UAS Refresh’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. सध्या जगभरातील अनेक देश सूक्ष्म ड्रोनचा लष्करी दलांमध्ये वापर करीत आहेत, ज्याचा उपयोग त्यांना शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी होत आहे. या सूक्ष्म ड्रोनमध्ये बसविण्यात आलेल्या बॅटरीचे आयुष्य वाढविणे, कठीण हवामान व वारा यांचा सामना करण्याची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा : इराणच्या एविन तुरुंगावर इस्रायलचा भीषण हल्ला; या तुरुंगाला जगातील धोकादायक तुरुंगांपैकी एक का म्हटले जाते?
अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठनेही रोबोबी (RoboBee) हा सूक्ष्म आकाराचा ड्रोन तयार केला आहे. या ड्रोनची निर्मिती करणाऱ्या ‘Wyss Institute’ या कंपनीने मोठी प्रगती केली आहे. त्यांनी तयार केलेला ड्रोन हा चीनमध्ये नुकत्याच सादर झालेल्या डासाच्या आकाराच्या ड्रोनसारखाच असल्याचं सांगितलं जात आहे. रोबोबी हा सूक्ष्म आकाराचा ड्रोन पाण्यावर तरंगतो आणि हवेतही उडू शकतो. त्याशिवाय तो जमिनीवरही अगदी सहजपणे चालू शकतो, असं सांगण्यात आलं आहे. २०२१ मध्ये अमेरिकन हवाई दलानं जाहीर केलं होतं की, ते सूक्ष्म ड्रोन विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यांनी या क्षेत्रात नेमकी काय प्रगती केली याबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही.
सूक्ष्म ड्रोनमुळे इतर क्षेत्रांमध्येही क्रांतिकारक बदल होणार
सूक्ष्म ड्रोनचा वापर केवळ लष्करी क्षेत्रापुरता मर्यादित नाही, तर त्यामुळे इतरही क्षेत्रांमध्ये क्रांतिकारक बदल घडू शकतात, असं संशोधकांचं म्हणणं आहे. चीन, अमेरिका व नॉर्वे यांसारख्या देशांत सूक्ष्म ड्रोनचा वापर मुख्यतः संरक्षणासाठी केला जातो. मात्र, या ड्रोनचा वापर वैद्यकीय, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रांमध्येही केला जाऊ शकतो. प्रदूषणाचे मोजमाप, पिकांची तपासणी, आरोग्याचे परीक्षण, तसेच नैसर्गिक आपत्तीनंतर धोकादायक भागात प्रवेश करण्यासाठी या सूक्ष्म ड्रोनची मदत घेता येऊ शकते, असा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे हे ड्रोन भविष्यातील युद्ध आणि इतर क्षेत्रांतही क्रांतीचे साधन ठरू शकतात, असं सांगितलं जात आहे.