China military Parade Robotic Wolves : चिनी सैन्याने अलीकडच्या काळातील सर्वांत मोठी लष्करी परेड बुधवारी (३ सप्टेंबर) आयोजित केली होती. या परेडमध्ये नवीन अत्याधुनिक शस्त्रं, ड्रोन आणि इतर लष्करी उपकरणं सादर करून त्यांनी जगाला आपलं सामर्थ्य दाखवलं. विशेष म्हणजे या प्रदर्शनातील रोबोटिक लांडग्यांनी (रोबोट वुल्व्ह) सर्वांनाच चकित करून सोडलं. हा रोबो लांडगा एका मिनिटाला बंदुकीतून ६० गोळ्या झाडताना दिसून आला. चीनच्या या वाढत्या लष्करी क्षमतेवर भारतासह अमेरिका आणि जगभरातील इतर देश बारकाईनं लक्ष ठेवून होते. दरम्यान, चीनचा हा रोबोटिक लांडगा कसा आहे? तो सैन्याला युद्धात नेमकी कशी मदत करणार? त्या संदर्भात घेतलेला हा सविस्तर आढावा…

चीनने दुसऱ्या महायुद्धात जपानच्या पराभवाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त बीजिंगमध्ये एक भव्य लष्करी परेड करण्यात आली होती. या परेडमध्ये शंभरहून अधिक विविध स्वदेशी शस्त्रे आणि ४५ पेक्षा जास्त लष्करी तुकड्यांचा समावेश होता. चिनी महिला सैनिकांचा एक गटदेखील लष्करी परेडमध्ये सहभागी झाला होता. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख असीम मुनीर यांसह २५ देशांचे नेते या महत्त्वाच्या कार्यक्रमास उपस्थित होते. चीनने विविध प्रकारची शस्त्रे तयार करण्याची क्षमता वेगानं प्राप्त केल्याचं या प्रदर्शनातून स्पष्ट झालं आहे.

चीनचे रोबोटिक लांडगे कसे आहेत?

बीजिंगमध्ये नुकत्याच झालेल्या लष्करी परेडमध्ये चीनने अत्याधुनिक क्षेपणास्त्रे, पाण्याखालील ड्रोन, लेझर संरक्षण प्रणाली आणि आण्विक क्षमतेच्या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसह अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची झलक दाखवली. मात्र, या प्रदर्शनातील रोबोटिक लांडग्यांनी (रोबोट वुल्व्ह) सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. हा चार पायांचा रोबो चीनच्या साऊथ इंडस्ट्रीज ग्रुप कॉर्पोरेशनने तयार केला आहे. चिनी वृत्तवाहिन्यांच्या माहितीनुसार- या रोबोचे वजन सुमारे ७० किलो (१५४ पौंड) आहे. युद्धाच्या काळात शत्रूंवर थेट हल्ला करणे, सैनिकांपर्यंत हत्यारं तसेच इतर मदत पोहोचवणे यांसारखी कामे हा रोबो सहजपणे करू शकतो.

आणखी वाचा : India US trade: अमेरिकेशी संबंध सुधारण्यात लॉबिंग फर्मने बजावली महत्त्वाची भूमिका; भारताने त्यांची नियुक्ती का केली होती?

चीनकडून रोबोटिक लांडग्यांचा युद्धसराव

या कार्यक्रमाआधी प्रदर्शित करण्यात आलेल्या एका व्हिडिओत एका रोबोच्या पाठीवर रायफल बसवलेली दिसली. हा रोबो धुराने भरलेल्या रणांगणावरून पुढे सरकत होता. त्याचबरोबर पायऱ्या चढताना, जड सामान वाहताना आणि बनावट लक्ष्यांवर गोळीबार करतानाही त्याची झलक दाखवण्यात आली. चिनी लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, हा रोबो लांडग १०० मीटर (३२८ फूट) अंतरावरून शत्रूंवर अचूकपणे हल्ला करू शकतो. या रोबोची ओळख ही चीनच्या लष्करी दलाच्या धोरणात्मक परिवर्तनाचा एक भाग असल्याचं चिनी माध्यमांनी म्हटलं आहे. याआधी चिनी वैज्ञानिकांनी अशाच प्रकारचे रोबो तयार केले होते, ज्याला रोबोटिक डॉग्स असं नाव देण्यात आलं. मात्र, या नव्या आवृत्तीत रोबोच्या क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्या आहेत, त्यामुळे या रोबोचा वापर चिनी सैन्याला थेट युद्धभूमीत करता येणार आहे.

रोबोटिक लांडगा असं नाव कसं पडलं?

आधीच्या ‘रोबोटिक डॉग’ डिझाइनचा वापर प्रामुख्याने पाळत ठेवणे आणि वाहतुकीसाठी केला जात होता. मात्र, नव्या आवृत्त्यांना ‘लांडगा’ (Wolves) असं नाव देण्यात आलं आहे. त्यामागचे कारण म्हणजे- हे रोबो अगदी लांडग्यांच्या कळपाप्रमाणेच शत्रूंवर हल्ला करतात. यातील प्रत्येक रोबोची वेगवेगळी भूमिका असते. कळपातील काही लांडगे शस्त्रास्त्र व दारुगोळा वाहून नेण्याचं काम करतात, तर काहीजण थेट शत्रूंवर हल्ला करतात. यातील ‘पॅक लीडर’ म्हणजेच गटप्रमुख लांडगा हा शत्रूंची माहिती गोळा करून इतर युनिट्सना पाठवतो. यामुळे युद्धभूमीवर समन्वय साधून अनेक पद्धतींनी आक्रमण शक्य होते.अलीकडेच चिनी सैनिकांनी या रोबो लांडग्यांचा युद्धसराव घेतला होता. डोंगराळ भागात झालेल्या या सरावात हे रोबो सैनिकांबरोबर पुढे सरकताना, अडथळे पार करताना आणि रायफल्स व पोर्टेबल रॉकेट लॉन्चर्स घेऊन समन्वय साधताना दाखवण्यात आले. यातील काही रोबोच्या पाठीवर रायफल्स बसविण्यात आलेल्या होत्या, तर काही दारुगोळा व पुरवठा वाहून नेत होते.

‘रोबोटिक लांडगे’ सैनिकांची जागा कशी घेतील?

चीनने तयार केलेले हे रोबोटिक लांडगे युद्धावेळी सैनिकांच्या जीवाला धोका असलेल्या ठिकाणी पाठवले जाणार आहेत. शत्रूंवर पाळत ठेवून त्यांच्यावर थेट हल्ला करणे, सैनिकांपर्यंत वेळेवर वैद्यकीय उपचार पाठवणे, यांसारखी कामे ही रोबोटिक लांडगे करू शकतात. डोंगराळ आणि उंच पठारी भागातही ते सहजपणे टेहळणी करू शकतात. या यंत्रांमुळे शत्रूंच्या मनोबलावर मोठा आघात होऊ शकतो, असं एका चिनी लष्करी अधिकाऱ्यानं सांगितलं. “रोबोटिक लांडग्यांचा कळप शत्रूंवर सोडला, तर त्यांचे मनोबल कमी होईल. युद्धावेळी काही रोबो नष्ट झाले तरी इतर रोबो शत्रूंच्या दिशेने पुढे सरकतील. हवाई हल्ल्यापेक्षाही रणांगणांवरील रोबो अधिक उपयुक्त ठरू शकतात”, असं मतही त्यांनी मांडलं आहे.

शी जिनपिंग म्हणाले- चीनला कोणीही रोखू शकत नाही

चीनने रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात प्रचंड गुंतवणूक केली आहे. तज्ज्ञांच्या मते- काही बाबतीत चीनने अमेरिकेलाही मागे टाकलं आहे. लष्करी परेडदरम्यान राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग म्हणाले, “चीनला कोणीही रोखू शकत नाही आणि परकीय शत्रूंनाही आमचे सैन्य घाबरत नाहीत.” दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उनही यांनीही चीनच्या लष्करी परेडला उपस्थिती दर्शवल्याने जगभरातील अनेक देशांच्या नजरा या कार्यक्रमावर खिळल्या होत्या. “रशिया आणि कोरिया चीनला हाताशी धरून अमेरिकेविरोधात कट रचत आहे”, असा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.