Is China’s PLA the World’s Most Powerful Army?: चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (PLA) शुक्रवारी ९८ वा वर्धापन दिन साजरा केला. पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) अलीकडच्या काही वर्षांत जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यदलांपैकी एक म्हणून उदयास आली आहे. या सैन्यात अंदाजे २० लाख सक्रिय सैनिक आहेत. हे सैनिक अत्याधुनिक शस्त्रास्त्र तंत्रज्ञानात पारंगत आहेत. विशेष म्हणजे ते वापरत असलेले बहुतेक तंत्रज्ञान स्वदेशी म्हणजे चीननिर्मितच आहे.
चीनची PLA किती शक्तिशाली आहे?
पीपल्स लिबरेशन आर्मीत (PLA) अंदाजे २० ते २२ लाख सक्रिय सैनिक आहेत. त्यामुळे ते जगातील सर्वात मोठे खडे सैन्य आहे. चीनकडे जगातील सर्वात मोठी भूसेना आहे. या दलात हजारो रणगाडे, तोफदळ आणि शस्त्रसंभार अधिक असलेल्या पायदळाच्या मोठ्या ब्रिगेड्सचा समावेश आहे. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, चीनकडे अंदाजे ६८०० रणगाडे (५४४० सक्रिय) आहेत. त्यात २७५० रॉकेट लाँचर्स आणि ३४९० शस्त्रसंभार अधिक असलेल्या संख्येने पायदळाच्या मोठ्या असलेल्या ब्रिगेड्सचा समावेश आहे.
रोबोटिक्स व कृत्रिम बुद्धीमत्तेचा (AI)वापर

याशिवाय, बीजिंग पीपल्स लिबरेशन आर्मीच्या भूसेनेत रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमतांचाही वापर केला जातो. अलीकडील पुनर्रचनेत पारंपरिक शस्त्रसंभार अधिक असलेल्या पायदळातील बटालियनऐवजी अधिक गतिमान हालचाली करण्याची क्षमता असलेल्या ब्रिगेड-आधारित संरचना लागू करण्यात आली असून, ही रचना कोणत्याही संभाव्य सीमावादाच्या परिस्थितीत जलद हालचाल आणि तत्पर कृती करण्यास सक्षम आहे

चिनी वायुदलाबद्दल तज्ज्ञ काय सांगतात?

चिनी वायुदल म्हणजेच PLA एअर फोर्स (PLAAF) ला जगातील सर्वात सक्षम वायुदलांपैकी एक करण्यासाठी चीनने मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रीत केले आहे. विशेषत: गेल्या दशकात बीजिंगने अत्याधुनिक स्वदेशी लढाऊ विमाने विकसित करण्यावर भर दिल्यामुळ त्यांच्या हवाई दलाच्या क्षमतेत अनेक पटींनी वाढ झाली आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

PLAAF कडे सुमारे ३३०० लढाऊ विमानांचा ताफा आहे. या ताफ्यामध्ये प्रगत चौथ्या पिढीतील (४.५ पिढीतील) आणि ५ व्या पिढीतील लढाऊ विमाने, वाहतूक विमाने, लष्करी हेलिकॉप्टर्स आणि विशेष मोहिमांसाठीची विमाने यांचा समावेश आहे. सध्या, PLAAF हे तंत्रज्ञानदृष्ट्या जगातील सर्वात प्रगत वायुदलांपैकी एक मानले जाते. यात J-10 सारख्या ४.५ पिढीतील लढाऊ विमानांचा मोठा ताफा याचाही समावेश आहे. तसेच दोन प्रकारची ५ व्या पिढीतील स्टेल्थ विमाने J-20 आणि J-35 यांचाही या ताफ्यात समावेश करण्यात आला आहे.

याशिवाय, चीन सध्या J-36 हे आपले पहिले ६ व्या पिढीतील लढाऊ विमान विकसित करत आहे. तसेच त्यांनी आपल्या वायुदलाला नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर आणि स्पेस वॉरफेअर क्षमतांनीही सिद्ध केले आहे.

चीनकडे अत्याधुनिक स्वदेशी विकसित हवाई संरक्षण प्रणाली आहे. यात अत्याधुनिक HQ-29 क्षेपणास्त्र प्रणालीचा समावेश आहे. असे म्हटले जाते की, ही प्रणाली हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांना ध्वस्त करण्याची क्षमता राखते.

चिनी नौदलाचे सामर्थ्य किती ?

चिनी नौदल म्हणजेच PLA नेव्ही (PLAN) हे जगातील सर्वात मोठे नौदल आहे. या नौदलाने युद्धनौकांच्या एकूण संख्येत अमेरिकन नौदलालाही मागे टाकले आहे. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सनुसार, चिनी नौदलाकडे अंदाजे ७३० युद्धनौका आहेत. त्यात तीन विमानवाहू युद्धनौका, ६१ पाणबुड्या तसेच डझनभर विनाशिका आणि फ्रिगेट्सचा समावेश आहे.

PLAN ला ब्लू वॉटर नेव्ही मानले जाते. म्हणजेच या नौदलाची जगभरातील कोणत्याही समुद्रांमध्ये कारवाई करण्याची क्षमता आहे.

जगात चीनची लष्करी ताकद कोणत्या क्रमांकावर आहे?

ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स-२०२५ नुसार, चीनची PLA १४५ देशांपैकी तिसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु तज्ज्ञांचे मत आहे की, अमेरिकेनंतर चीन हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा लष्करी शक्तिमान देश आहे. तर रशिया तिसऱ्या क्रमांकावर आणि भारत चौथ्या क्रमांकावर आहे.

चीनचे संरक्षण बजेट २६७ अब्ज डॉलर्स आहे, जे भारताच्या ७५ अब्ज डॉलर्सच्या संरक्षण बजेटपेक्षा अनेक पटींनी जास्त आहे.

२० लाख सैनिक, ३३०० विमानं आणि ७३० युद्धनौकांसह चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी केवळ संख्येनेच नव्हे तर तंत्रज्ञानाच्या बाबतीतही जगातील सर्वात सामर्थ्यवान सैन्यांपैकी एक म्हणून उदयास आली आहे. अत्याधुनिक स्वदेशी शस्त्रास्त्रे, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित लढाऊ क्षमता, स्टेल्थ फायटर जेट्स आणि प्रगत हवाई व सागरी सामर्थ्यामुळे चीन आज केवळ आशियातच नव्हे तर संपूर्ण जगासाठी एक मोठे सामरिक आव्हान ठरतोय.

भारतासाठी ही बाब अधिक गंभीर आहे, कारण सीमा वाद, इंडो-पॅसिफिकमधील सामरिक संघर्ष आणि वाढते संरक्षण खर्च यामुळे भू-राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची होत आहेत. अमेरिका आणि त्याचे सहयोगी चीनच्या या वाढत्या सामर्थ्याला आवर घालण्यासाठी कोणती रणनीति आखतात आणि भारत या बदलत्या समीकरणात आपली भूमिका कशी मजबूत करतो, हे आगामी काळात जागतिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे