तुम्ही आतापर्यंत पॅन्डेमिक असं ऐकलं असेल पण मागील काही दिवसांपासून भारत एन्डेमिक फेजमध्ये आहे असं अनेक तज्ज्ञ सांगताना दिसत आहेत. यासंदर्भात अनेक बातम्याही आल्यात. पण आठवडाभरापासून सतत कानावर पडणारं , एन्डेमिक म्हणजे नक्की काय? तो काय सूचित करतो? यावरच टाकू एक नजर…

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतासह सर्वच देशात आत्तापर्यंत करोनाच्या दोन लाटा आल्या आहेत. त्याचवेळी आता सर्वच देश या विषाणूच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणतात की, भारतातील करोना प्रसाराने आता एन्डेमिक स्थितीमध्ये प्रवेश केला आहे.
एन्डेमिक म्हणजे आता भारतात कोरोना संपण्याच्या मार्गावर आहे, असं अजिबात नाही, तर त्याऐवजी जागतिक आरोग्य संघटना असे संकेत देत आहे की सध्या करोना अशा एका स्थितीत आहे जी कधीही संपणार नाही.

हेही वाचा -‘सी.१.२’ विषाणू अधिक संसर्गजन्य

स्वामीनाथन यांनी एन्डेमिक स्टेजचा अर्थ स्पष्ट केला आहे. त्या म्हणाल्या की हा एक असा टप्पा आहे जिथे भारतात करोनाचा प्रसार कमी होण्याच्या किंवा काही प्रमाणात नियंत्रणात येण्याच्या मार्गावर आहे. तसेच भारतातील करोना विषाणू आता कमकुवत झालेला असून या आजारासोबत जगणं भारतीय लोकांनी शिकून घेतलं आहे आणि लसीकरण देखील होत असल्याने ते शक्य होत आहे.

स्वामीनाथन यांनी भारताची लोकसंख्या, लोकांची रोगप्रतिकारक शक्ती आणि वेगवेगळ्या भागांमध्ये करोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता काही महत्त्वाच्या गोष्टीही सांगितल्या आहेत. त्या म्हणाल्या की देशाच्या विविध भागांमध्ये रुग्णसंख्येत असाच चढउतार राहू शकतो.
आरोग्य संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, भारतातील करोनाच्या स्थितीचे कारण हे त्याची व्याप्ती आणि देशाच्या विविध भागातील लोकांची रोगप्रतिकारक शक्ती आहे. एवढेच नाही तर भविष्यात करोना रुग्णसंख्या अशीच कमी जास्त होत राहील. त्याचबरोबर या अधिकाऱ्यांनी हेही सांगितलं की, ज्या भागात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत करोनाचा प्रादुर्भाव झाला नाही किंवा जिथे पुरेशा प्रमाणात लसीकरण झालेलं नाही, तिथे तिसऱ्या लाटेत करोनाचा प्रादुर्भाव अधिक असू शकतो. त्यामुळे भारतात करोनाचा प्रसार बराच काळ होत राहणार असल्याचंही डॉ. स्वामिनाथन यांनी स्पष्ट केलं.