-राखी चव्हाण
देशातील व्याघ्र प्रकल्पात चांगले संरक्षण होऊ लागल्याने वाघांची संख्या वाढली. परंतु कमी होत चाललेली जंगले, वाघांचे खंडित झालेले भ्रमण मार्ग, मानवाचा आणि गुराढोरांचा जंगलातील मुक्त वावर, जंगलाच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत वाघांची वाढलेली संख्या, जंगलातील गावाची संख्या अशा अनेक कारणांमुळे वाघ-मानव संघर्षात वाढ होत आहे. दरवर्षी वाघांची संख्या सहा टक्के दराने वाढते आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार २०१४-२०२० दरम्यान वाघांच्या हल्ल्यात देशात ३२० जणांचा मृत्यू झाला. त्यात महाराष्ट्रातील ९९ जणांचा समावेश आहे. यावरून विदर्भात हा संघर्ष किती वाढला आहे आणि त्यावर उपाययोजना करणे किती गरजेचे आहे, हे अधोरखित होते.

उन्हाळ्यातच हल्ले का होतात ?

उन्हाळ्यात मोठ्या संख्येने गावकरी जंगलात तेंदूपान, मोहफुले व इतर वनोपज गोळा करण्यासाठी जातात. यापूर्वीही गावकरी जंगलात जाऊन ही कामे करत होते, मात्र गरजेपुरत्या या वस्तू गोळा करुन ते परतायचे. आता मात्र व्यावसायिक उद्देशाने ते तेंदूपान, मोहफुले वेचतात. त्यासाठी भल्यापहाटे जंगलात जातात. यातील बहुसंख्य कामे वाकलेल्या अवस्थेत करावी लागतात. त्या अवस्थेतील माणूस हा माणूस नसून लहान आकाराचे सावज आहे, असे वाघाला वाटते. त्यामुळे हल्ला होतो. एवढेच नाही तर उन्हाळ्यात जंगलातील पाणवठे आटतात. झाडांची पाने गळतात. वाघांनाही भक्ष्यही सापडत नाही आणि पाणीदेखील मिळत नाही. सावजाच्या शोधात वाघ बाहेर पडतात आणि गावातील माणूस व जनावरांची शिकार करतात.

विदर्भात देशातील सर्वाधिक बळी का जातात ?

देशातील सर्वाधिक बळींमध्ये विदर्भ आघाडीवर आहे. राज्यात सुमारे ३५०हून अधिक वाघ आहेत. त्यातही विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात २००पेक्षा अधिक आहेत. विदर्भात जंगलाचे प्रमाण अधिक असले तरी वाघांची संख्या सातत्याने वाढत असल्याने त्यांना लागणारा अधिवास कमी पडतो आहे. त्याचबरोबर जंगलालगतच्या गावांमधील लोकसंख्येची घनता देखील वाढली आहे. वाढती लोकसंख्या, विकास, रोजगाराचा अभाव यामुळे ग्रामीण लोकांचे जंगलावरील अवलंबित्व वाढले आहे. राज्यात सुमारे ८०० गावे जंगल आणि जंगलालगत आहेत. जंगलालगतच शेती आहे. वेकोलीच्या खाणी आणि उद्योग व्याघ्रप्रकल्पालगत आहेत. यातच वाघांचे भ्रमणमार्ग खंडित झाल्याने मानव-वन्यजीव संघर्ष उद् भवतो आणि त्यात  माणसे व जनावरे मृत्युमुखी पडतात.

वाघांचे हल्ले बफर क्षेत्रात अधिक की गाभा क्षेत्रात ?

वाघांचे हल्ले गाभा क्षेत्रात कमी आणि बफर क्षेत्रात अधिक होतात. अद्याप बफर क्षेत्रात अनेक गावे आहेत. त्यांचे पूनर्वसन करण्यात वनखात्याला अद्याप यश आले नाही. वाघांची वाढती संख्या आणि सातत्याने होणारा गावकरी व त्यांच्या जनावरांचा सामना, यामुळे हा संघर्ष तीव्र झाला आहे. जंगलालगतच्या गावकऱ्यांसाठी राज्याच्या वनखात्याने गॅस सिलेंडर योजना आणली. काही वर्षे ती सुरळीत चालली, पण वाढत्या किंमतीमुळे गावकरी सिलेंडर घेऊ शकत नाहीत. त्यामुळे सरपणासाठी गावकऱ्यांची पावले जंगलाकडे वळतात आणि ते बळी पडतात. गुराखी त्याची गुऱे जंगलात चरायला नेतात. वाघाने जनावरांवर हल्ला केला तर त्याला वाचवण्याच्या नादात गुराख्याचाही अनेकदा बळी जातो. वाघांच्या हल्ल्यात सर्वात पहिल्या क्रमांकावर गुराखी, त्यानंतर सरपणासाठी जाणारा गावकरी, मोहफुले व तेंदूपाने उचलण्यासाठी जाणारा गावकरी आणि नंतर शेतकरी व शेतात काम करणारा शेतकरी आहे.

वाघांकडून होणारे हल्ले कुठे आणि अलीकडे वारंवार का होत आहेत ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाघांकडून होणारे हल्ले जंगलात किंवा गावातच नाही तर सर्वत्र होत आहेत. शहरी आणि औद्योगिक क्षेत्रातही ते होत असून वाघांच्या नव्या पिढीकडून ते होत आहेत. संख्या वाढल्याने वाघांनी शहरी आणि औद्योगिक क्षेत्राकडे वाट वळवत या क्षेत्राचा अधिवास म्हणून स्वीकार केला आहे. याठिकाणी प्रजनन होऊन त्यांची नवी पिढी येथेच मोठी होत आहे. या नव्या आणि धोकादायक अधिवासाची त्यांना सवय झाली आहे. काही वर्षांपूर्वी दोन-अडीच वर्षाचे होईपर्यंत ते शिकार करत नव्हते, आता मात्र एक ते दीड वर्षातच त्यांना शिकारीची सवय लागली आहे. शिकारीचे तंत्र अवगत करण्यापूर्वीच त्यांचे प्रयत्न सुरू झाल्याने ती जनावरे असो वा माणूस, ते हल्ला करतात.  ब्रम्हपूरी क्षेत्रातील ८० टक्के वाघ तृणभक्षी प्राण्यांऐवजी गावातील जनावरे मारतात, असे लक्षात आले आहे.