इंटरनेटचे विकेंद्रीकरण : काय आहे वेब ३.० ?

इंटरनेटने अनेक व्यवहार सुलभ आणि जलद केले असले तरी, वापरकर्त्याची गोपनीयता हा कळीचा मुद्दा गेल्या काही वर्षांत सातत्याने चर्चेत राहिला आहे

इंटरनेटने आपल्या जगण्याचा बहुतांश भाग व्यापला आहे. मोबाइल, ॲप, संगणक इतकेच काय पण अन्य स्मार्ट उपकरणांच्या माध्यमातून इंटरनेटशी जग जोडले गेले आहे आणि त्याची उपयुक्तता वादातीत आहे. इंटरनेटने अनेक व्यवहार सुलभ आणि जलद केले असले तरी, वापरकर्त्याची गोपनीयता हा कळीचा मुद्दा गेल्या काही वर्षांत सातत्याने चर्चेत राहिला आहे. वापरकर्त्यांच्या माहितीचा कंपन्यांकडून होणारा वापर (किंवा गैरवापर), खासगीपणात येणारी बाधा, सरकारी नियंत्रणामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर येणारी बंधने अशा सध्याच्या इंटरनेटबाबतच्या तक्रारी दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करू लागल्या आहेत. अशा वेळी इंटरनेटच्या नव्या अवताराकडे अर्थात ‘वेब ३.०’च्या आगमनाकडे लक्ष लागले आहे.

‘वेब ३.०’कडे जाण्याआधी…

इंटरनेटचे युग सुरू झाल्यापासून आतापर्यंत ते दोन टप्प्यांत विभागले जाते. पहिला टप्पा १९९१ ते २००४ या काळातला असून त्याला ‘वेब १.०’ म्हणतात. या टप्प्यात इंटरनेट प्रामुख्याने संकेतस्थळांपुरते मर्यादित होते. त्यावरचा मजकूर हा वेबपेजेसच्या रूपात होता आणि त्यात आमूलाग्र बदल करणे शक्य नव्हते. ते माध्यम बहुतांशी एकतर्फी होते. त्यात वापरकर्ता आणि डेव्हलपर किंवा संकेतस्थळ अशा संवादाची शक्यता नव्हती. ही सुविधा २००४नंतर आलेल्या वेब २.० ने निर्माण केली. सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांनी इंटरनेटचा चेहराच बदलून टाकला. वापरकर्त्यांना ब्लॉग, पॉडकास्ट, फीडबॅक, सोशल मीडिया यांच्या माध्यमातून इंटरनेटद्वारे व्यक्त होता येऊ लागले. ‘कंटेंट’ अर्थात वापरकर्त्याकडून शेअर केली जाणारी माहिती हे या महाजालाचे सामर्थ्य बनले. या माहितीचे पृथक्करण करून त्या आधारे वापरकर्त्याला अपेक्षित मजकूर उपलब्ध करून देता येऊ लागला.

वेब ३.०’ काय आहे?

‘वेब ३.०’ ही संकल्पना अद्याप निर्मितीअवस्थेत आहे. मात्र, ती आधीच्या इंटरनेट आवृत्तीपेक्षा कमालीची वेगळी असणार आहे. या आवृत्तीत वापरकर्ता हा केंद्रस्थानी राहील आणि त्याला अपेक्षित, उपयुक्त असा कंटेंट त्याच्यापर्यंत पोहोचवणे हा ‘वेब ३.०’चा मुख्य हेतू असेल. वापरकर्त्यांच्या माहितीचे नियंत्रण अन्य कुणाकडेही न देता त्याच्याकडेच राहील, अशी व्यवस्था या इंटरनेटमध्ये असेल. यामध्ये वापरकर्त्याची गोपनीयता आणि सुरक्षितता जपणारी अनेक वैशिष्ट्ये समाविष्ट असतील जेणेकडून हॅकिंगसारख्या प्रकारांना आळा बसेल, असे म्हटले जात आहे. ‘वेब ३.०’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये आर्टिफिशियल इंटिलिजन्स अर्थात कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाचा वापर करून ‘मशिन रीडिंग’चा अंतर्भाव करण्यात येईल. त्यामुळे वापरकर्त्याला जेव्हा त्याच्या माहितीची गरज असेल तेव्हा आधीच साठवून ठेवलेली ही माहिती त्याच्यासमोर प्रकट होईल.

कसे काम करणार?

‘वेब ३.०’चा संपूर्ण डोलारा ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असेल. ब्लॉकचेन ही एक इलेक्ट्रॉनिक श्रुंखला असते, ज्यात माहिती छोट्या-छोट्या तुकड्यांत (ब्लॉक) साठवली जाते. हे छोटे ब्लॉक एन्क्रीप्टेड असल्यामुळे त्यातील माहिती अबाधित रहाते. शिवाय या डिजिटल माहितीचे सर्वाधिकार वापरकर्त्याकडेच राहतील. एका प्रकारे इंटरनेटवरील माहिती ठराविक कंपन्या किंवा सर्व्हरवर साठून न राहता ती व्यक्तीगणिक साठवली जाईल. एकाप्रकारे हे माहितीचे आणि पर्यायाने इंटरनेटचे विकेंद्रीकरण ठरेल, असे म्हटले जाते.

विकेंद्रीकरणाची गरज काय?

सध्या जगभरातील इंटरनेटवरील माहितीचा सर्वाधिक ताबा मूठभर कंपन्यांकडे आहे. गुगल, फेसबुक, ट्विटर, मायक्रोसॉफ्ट, ॲपल, ॲमेझॉन या कंपन्या वापरकर्त्यांच्या माहितीचे मालक बनले आहेत. ही माहिती कशी वापरली जावी, तिचा उपयोग कुठे करावा, इतकंच काय ती आपल्या फायद्यासाठी कशी वापरता येईल, हे या कंपन्याच ठरवत असतात, असा आरोप होतो. ब्लॉकचेन आधारित वेब ३.०मुळे इंटरनेटवरील माहितीची या कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात येईल. प्रत्येक वापरकर्त्याकडे त्याच्या माहितीच्या वापराचे नियंत्रण राहील.

मग या कंपन्यांचे काय होईल?

‘वेब ३.०’मुळे इंटरनेट वापरण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल होईल, याबाबत अनेकांना साशंकता आहे. विशेषत: सध्या प्रचंड माहिती बाळगून असलेल्या कंपन्यांनाही याबाबत फार चिंता नाही. मात्र, तरीही त्याची पूर्वतयारी या कंपन्याही करू लागल्या आहेत. फेसबुकचे ‘मेटा’ हे नामकरण त्याचाच एक भाग आहे, असे म्हटले जाते. ट्विटरही याबाबत आतापासूनच काम करत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Decentralization of the internet what is web 3 0 asj 82 print exp 0122

Next Story
असांजला अंशत: दिलासा; न्यायाची प्रतीक्षा कधीपर्यंत?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी