Baby Care Hospital Fire Tragedy पूर्व दिल्लीतील विवेक विहार येथील बेबी केअर न्यू बॉर्न रुग्णालयामध्ये शनिवारी रात्री भीषण आग लागली, काही वेळातच ती आग लगतच्या दोन इमारतींमध्ये पसरली. या घटनेत सात नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला असून पाच बालके गंभीर जखमी झाली आहेत. रुग्णालयाचे मालक डॉ. नवीन खिची आणि अन्य एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. ‘मिंट’ने दिलेल्या वृत्तानुसार बहुतेक पालकांना त्यांच्या मुलाच्या मृत्यूबद्दल आणि रविवारी घडलेल्या घटनेबद्दल बातम्यांद्वारे, मित्र किंवा कुटुंबाद्वारे कळले. कारण पोलिसांनी आणि रुग्णालयाने त्यांना या घटनेची माहितीच दिली नाही. या घटनेचा तपास सुरू असतानाच मालकाच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक तपशील समोर आला आहे. ही घटना कशी घडली? पोलिसांच्या तपासात काय माहिती समोर आली आहे? याबद्दल जाणून घेऊ या.

वैध परवानाच नाही

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, खाजगी नवजात शिशु रुग्णालयाच्या परवान्याची वैधता संपली होती. अग्निशमन विभागाकडून कोणतीही मंजुरी नसताना हे रुग्णालय सुरू होते. दिल्ली सरकारच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाने (DGHS) बेबी केअर न्यू बॉर्न चाइल्ड रुग्णालयाला जारी केलेल्या परवान्याची वैधता ३१ मार्च २०२४ रोजीच संपली होती. ‘पीटीआय’च्या वृत्तानुसार, “रुग्णालयाला जारी केलेल्या कालबाह्य परवान्यात केवळ पाच खाटांची परवानगी आहे,” असे पोलिस उपायुक्त (शहदरा) सुरेंद्र चौधरी यांनी सांगितले. मात्र, शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास ही घटना घडली, त्यावेळी १२ नवजात बालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पूर्व दिल्लीतील विवेक विहार येथील बेबी केअर न्यू बॉर्न रुग्णालयामध्ये शनिवारी रात्री भीषण आग लागली. (छायाचित्र-पीटीआय)

हेही वाचा : जगभरात थैमान घालणारी झुरळांची ही प्रजाती आली कुठून? नव्या संशोधनात खुलासा

पोलिसांनी सांगितले की, तपासादरम्यान असे आढळून आले की बेबी केअर न्यू बॉर्न चाइल्ड रुग्णालयाच्या आणखी तीन शाखा आहेत, ज्या दिल्लीच्या पंजाबी बाग, हरियाणाच्या फरीदाबाद आणि गुरुग्राममध्ये आहेत.

अग्निशमन विभागाकडून कोणतीही मंजुरी नाही

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालयात अग्निशामक यंत्रणा बसविण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या रुग्णालयात इमर्जन्सी एक्झिटही नव्हती. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयाला विभागाकडून मंजुरीही नव्हती. “इमारतीला फायर एनओसी नाही. आम्ही सोमवारी एनओसीशी संबंधित कागदपत्रेदेखील तपासू,” असे डीएफएसच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याची विनंती करत वृत्तसंस्थेला सांगितले. दुमजली इमारतीत ठेवलेले ऑक्सिजन सिलिंडर फुटल्याने शेजारील इमारतींचे नुकसान झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालयात अग्निशामक यंत्रणा बसविण्यात आली नव्हती. (छायाचित्र-पीटीआय)

अनधिकृत ऑक्सिजन रिफिलिंग

रहिवासी मुकेश बन्सल यांनी दावा केला की, रुग्णालयाच्या इमारतीत अनधिकृत ऑक्सिजन रिफिलिंग सिलिंडरचे काम केले जात होते. “आम्ही स्थानिक नगरसेवकांकडेही याबाबत तक्रार केली होती, पण याकडे दुर्लक्ष करण्यात आले. हे सर्व पोलिसांच्या नाकाखाली घडत होते”, असा दावा बन्सल यांनी केला. बन्सल यांनी असेही सांगितले की, ते रुग्णालयाच्या शेजारी राहत होते, परंतु सिलिंडर रिफिलिंगच्या बेकायदा कामामुळे त्यांना दुसर्‍या ठिकाणी घर शोधावे लागले. २१ वर्षीय देवांश गुप्ता यांनी सांगितले की, पहिल्या मजल्यावर एनआयसीयू होते, हे रुग्णालय तळमजल्यावर ऑक्सिजन रिफिलिंग केंद्रासाठी ओळखले जायचे. पोलिसांनी सांगितले की ते या दाव्यांचादेखील तपास करत आहेत.

अपात्र डॉक्टर

वरिष्ठ अधिकाऱ्याने असेही सांगितले की, या रुग्णालयात बीएएमएस (आयुर्वेदिक औषध आणि शस्त्रक्रिया पदवी) डॉक्टरांचा समावेश होता, जे मुलांची काळजी घेण्यास पात्र नव्हते. “तपासादरम्यान आम्हाला कळले की, नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात नवजात मुलांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर पात्र नव्हते; कारण त्यांनी केवळ बीएमएस ही पदवी प्राप्त केली होती. सेवा दलाच्या सदस्याने दावा केला की, रुग्णालयाच्या इमारतीला आग लागताच रुग्णालयातील कर्मचारी पळून गेले.

दिल्लीच्या या रुग्णालयाला यापूर्वी नवजात बालकावर अत्याचार केल्याच्या आरोपांचाही सामना करावा लागला होता. (छायाचित्र-पीटीआय)

दिल्लीच्या या रुग्णालयाला यापूर्वी नवजात बालकावर अत्याचार केल्याच्या आरोपांचाही सामना करावा लागला होता. २०२१ मध्ये रुग्णालयाचे मालक डॉ. कीची यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आणि रुग्णालयाच्या नर्सने नवजात अर्भकाला मारहाण केल्याच्या आरोपावरून त्याच्याविरुद्ध नोंदवलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली. या प्रकरणात डॉक्टरने असा युक्तिवाद केला होता की, या आरोपांशी आपला काहीही संबंध नाही आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये फक्त नर्स नवजात मुलांशी गैरवर्तन करत असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी आरोपपत्रात आरोपी म्हणून किंवा साक्षीदार म्हणून नाव न दिल्याने त्याने आपली याचिका नंतर मागे घेतली.

‘त्या’ रात्री नक्की काय घडलं?

दिल्ली अग्निशमन सेवा (DFS) च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बेबी केअर न्यू बॉर्न रुग्णालयात शनिवारी रात्री ११.३० वाजता आग लागली. मालक नवीन खिची हे बालरोग औषधाचे एमडी आहेत आणि ते दंतचिकित्सक असलेल्या पत्नी डॉ. जागृती यांच्याबरोबर हे रुग्णालय चालवतात. आणखी एका अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की, इमारतीच्या बाहेर उभी असलेली रुग्णवाहिका आणि स्कूटी याशिवाय दोन बुटिक, इंडसइंड बँकेचा एक भाग, शेजारच्या इमारतीचा काही आणि तळमजल्यावरील दुकानाचेही नुकसान झाले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, स्थानिक लोक आणि शहीद सेवा दल या स्वयंसेवी संस्थेचे सदस्य मदतीसाठी सर्वप्रथम धावून आले.

रहिवासी रवी गुप्ता म्हणाले की, काही स्थानिक लोक इमारतीच्या मागील बाजूने चढले आणि एक एक करून मुलांना बाहेर काढले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या १६ गाड्या वापरण्यात आल्याचे विभागीय अग्निशमन अधिकारी राजेंद्र अटवाल यांनी सांगितले. जिल्हा दंडाधिकारी (शाहदरा) यांनी दिल्ली विभागीय आयुक्तांना सादर केलेल्या अहवालानुसार, घटनेच्या वेळी रुग्णालयात १२ नवजात बालकं होती. एकाचा जागीच मृत्यू झाला, तर ११ जणांना आजूबाजूच्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले, तेथे पोहोचताच सहा बालकांना मृत घोषित करण्यात आले.

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक कारण सांगितले जात आहे. (छायाचित्र-पीटीआय)

मृत मुलांमध्ये चार मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे. २५ दिवसांचा एक मुलगा वगळता सर्व बालक १५ दिवसांचे होते. शवविच्छेदनासाठी मृतदेह जीटीबी रुग्णालयात हलवण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. विवेक विहार पोलिस ठाण्यात आयपीसी कलम ३३६ (इतरांचा जीव आणि वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणारे कृत्य) आणि ३०४ अ (मृत्यूस कारणीभूत कृत्ये किंवा निष्काळजीपणामुळे मृत्यू), ३०४ (ज्ञात वा अज्ञातपणे केलेले मृत्यूला करणीभूत ठरणारे कृत्य) आणि ३०८ (हत्या करण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक कारण सांगितले जात असले तरी तपास सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त चौधरी यांनी सांगितले. या घटनेनंतर शाहदरा येथील जिल्हा दंडाधिकारी रितीशा गुप्ता जीटीबी रुग्णालयात पोहोचल्या असता, ‘हमे इंसाफ चाहिये (आम्हाला न्याय पाहिजे)’ अशा घोषणा मृत नवजात बालकांच्या कुटुंबीयांनी दिल्या.

हेही वाचा : ‘रेमल’ चक्रीवादळ आज किनार्‍यावर धडकणार; चक्रीवादळ म्हणजे काय? ही वादळं कशी तयार होतात? सविस्तर जाणून घ्या…

दंडाधिकारी चौकशी सुरू

दिल्ली सरकारने आगीच्या दुर्घटनेच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत. विभागीय आयुक्त अश्वनी कुमार यांनी एका आदेशात शाहदराच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान मोदींनी प्रत्येक मृत बालकांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये आणि जखमींच्या नातेवाईकांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, निष्काळजीपणासाठी जबाबदार असलेल्यांना सोडले जाणार नाही. राज्याचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांनीही निष्काळजीपणा दाखविणाऱ्या किंवा कोणत्याही चुकीच्या कामात सहभागी असलेल्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, असे सांगितले.