सध्या देशातील वेगवेगळ्या भागांत वेगवेगळे वातावरण पाहायला मिळत आहे. हवामान बदलाचा परिणाम देशाच्या प्रत्येक भागात दिसून येत आहे. कुठे तीव्र उष्णतेची लाट; तर कुठे अवकाळी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मात्र, आता देशावर आणखी एक संकट घोंगावत आहे. पश्चिम किनारपट्टी भागात आज तीव्र चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) दिला आहे. ‘रेमल’ चक्रीवादळ आज संध्याकाळी ६ च्या सुमारास पश्चिम बंगालच्या सागर बेट आणि बांगलादेशच्या खेपुपारा किनार्‍यावर धडकण्याची शक्यता आहे, असे शुक्रवारी (२५ मे) ‘आयएमडी’ने सांगितले आहे.

चक्रीवादळामुळे २६ व २७ मे रोजी दक्षिण व उत्तर २४ परगणा, पूर्वा मेदिनीपूर, कोलकाता, हावडा व पश्चिम बंगालच्या हुगळी या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असेही ‘आयएमडी’ने सांगितले आहे. याचा परिणाम २६ व २७ मे रोजी उत्तर ओडिशावरही होऊ शकतो. तसेच ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते. पश्चिम बंगालमधील पश्चिम मेदिनीपूर, पूर्वा बर्धमान व नादिया या जिल्ह्यांमध्ये २६ व २७ मे रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ‘रेमल’ चक्रीवादळ किती तीव्र आहे? चक्रीवादळ म्हणजे काय? त्याचे प्रकार काय? याविषयी सविस्तर समजून घेऊ.

पश्चिम किनारपट्टी भागात आज तीव्र चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) दिला आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : अकरावी बारावीत आता इंग्रजीची सक्ती नाही; काय आहे नवीन अभ्यासक्रम आराखडा?

‘रेमल’ चक्रीवादळ

‘रेमल’ चक्रीवादळातील वाऱ्याचा वेग ११०-१२० किमी प्रतितास आहे. हे वादळ १३५ किमी प्रतितास वेगाचे वारे निर्माण करेल. हे एक उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) चक्रीवादळांचे विस्तृतपणे दोन श्रेणींमध्ये वर्गीकरण करते. पहिले आहे समशीतोष्ण चक्रीवादळ आणि दुसरे आहे उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ.

चक्रीवादळ म्हणजे काय?

चक्रीवादळ हवेची एक मोठी प्रणाली आहे. चक्रीवादळ हे कमी दाबाचे केंद्र असते. ही वादळे अनेक दिवस आणि शेकडो किलोमीटरचा प्रवास करू शकतात. ‘एनडीएमए’नुसार, उत्तर गोलार्धात घड्याळाच्या उलट्या दिशेने आणि दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या सरळ दिशेने वाहणार्‍या वार्‍यांमुळे हवेमध्ये भोवरा तयार होतो. चक्रीवादळांचा आकार गोल किंवा लंबवर्तुळाकार असतो.

चक्रीवादळ हे कमी दाबाचे केंद्र असते. (छायाचित्र-रॉयटर्स)

समशीतोष्ण चक्रीवादळ (एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लोन्स) काय आहेत?

समशीतोष्ण चक्रीवादळास मध्य-अक्षांश किंवा बॅरोक्लिनिक चक्रीवादळ म्हणूनही ओळखले जाते. अतिउष्ण कटिबंधीय चक्रीवादळे उष्ण कटिबंधाच्या बाहेर उदभवतात. यूएस नॅशनल ओशनिक अॅण्ड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (एनओएए)नुसार, या वादळांच्या आतल्या बाजूला थंड हवा असते. उत्तर गोलार्धात उत्तरेकडून थंड हवा वाहते आणि दक्षिणेकडून उबदार हवा वाहते. हवेचा दाब कमी झाल्यावर उत्तरेकडील वारे दक्षिणेकडे सरकतात आणि दक्षिणेकडील वारे उत्तरेकडे सरकतात. त्यामुळे समशीतोष्ण चक्रीवादळ तयार होते.

बंगालच्या उपसागरात उष्ण कटिबंधीय चक्रीवादळे जास्त प्रमाणात तयार होतात. (छायाचित्र-रॉयटर्स)

उष्ण कटिबंधीय चक्रीवादळे (ट्रॉपिकल सायक्लोन्स) काय आहेत?

बंगालच्या उपसागरात उष्ण कटिबंधीय चक्रीवादळे जास्त प्रमाणात तयार होतात. ही वादळे पृथ्वीवरील सर्वांत विनाशकारी वादळे आहेत. अशा चक्रीवादळांचा आकार वाढत जातो; ज्यामुळे गडगडाटी वादळे, जोरदार वारे व मुसळधार पाऊस पडतो. त्यांना उत्तर अटलांटिक आणि पूर्वोत्तर पॅसिफिक महासागरात ‘हरिकेन’ म्हटले जाते. विषुवृत्ताच्या दोन्ही बाजूंना असणाऱ्या भागाला उष्ण कटिबंधीय प्रदेश म्हणतात. या प्रदेशात सूर्याची किरणे थेट समुद्रात पडतात; ज्यामुळे पाणी तापते आणि पाण्याची वाफ होते. ही वाफ वरवर जाते, तसा समुद्राजवळ दाब कमी होतो. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यावर पोकळी भरण्यासाठी आजूबाजूची हवा एका ठिकाणी येते. या वार्‍यांचा वेग वाढत जातो आणि चक्रीवादळ तयार होते.

हेही वाचा : ‘मॅकडोनाल्ड’ कंपनीला दणका देणारे मॉर्गन स्परलॉक कोण होते?

उष्ण कटिबंधीय चक्रीवादळांना त्यांच्या स्थान आणि शक्तीनुसार वेगवेगळी नावे दिली गेली आहेत. उदाहरणार्थ- कॅरेबियन समुद्र, मेक्सिकोचे आखात, उत्तर अटलांटिक महासागर आणि पूर्वेकडील व मध्य उत्तर पॅसिफिक महासागरात या वादळाला ‘हरिकेन’ म्हणून संबोधले जाते; तर पश्चिम उत्तर पॅसिफिकमध्ये ‘टायफून’ म्हणतात.